शेतकरी संघटनांचं भारत बंद यशस्वी झालं कि अपयशी ठरलं ?

गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाची धग आपण पाहतोच आलो आहोत. केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज म्हणजेच, २७ सप्टेंबरला  दिवसभरात सकाळी ६ पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत भारत बंद चे आवाहन केले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होत आले त्यामुळे हा भारत बंद पुकारण्यात आला होता.

देशाच्या इतिहासात राजधानीत इतक्या दीर्घकाळ चाललेलं हे कदाचित पहिलंच आंदोलन. या आंदोलनाला आणि आजच्या भारत बंद ला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व, ऐतिहासिक होता असंच म्हणावं लागेल. 

या भारत बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी सहित  बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, स्वराज इंडिया यांनीही आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. 

 

पंजाबचे मुख्यमंत्री रणजीत सिंग चन्नी यांनी या बंदला पाठिंबा असल्याचं सांगितलं तर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते राजद नेते तेजस्वी यादव यांनी आपण या देशव्यापी बंदमध्ये सहभागी आहोत असे स्पष्ट केले होते. आंध्र प्रदेश सरकारने भारत बंदला संपूर्णपणे पाठिंबा दिला होता. फक्त पाठिंबा दिला नसून रविवारी मध्यरात्रीपासूनच सोमवारच्या दुपारपर्यंत राज्य परिवहन महा मंडळाच्या बस गाडी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील राज्याचे परिवहन मंत्री परभणी व्यंकट रामय्या यांनी जाहीर केला होता.

देशभरात या भारत बंद ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे चित्र दिल्ली – गुरुग्रामच्या हायवे वर पाहायला मिळालं. भारत बंदमुळे वाहतुकीला फटका बसला होता. यामुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर वाहतूक कोंडी झाली होती. 

भारत बंदमुळे सुमारे दोन डझन गाड्या ठप्प पडल्या होत्या.  भारत बंद दरम्यान दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर विभागात २० हून अधिक ठिकाणी रेल्वे  ब्लॉक करण्यात आल्या होत्या. देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय राजधानीकडे जाणारे प्रमुख मार्ग सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रोखले होते.

नोएडात देखील चक्काजाम झाल्याचं पाहायला मिळालं. 

कर्नाटक मध्ये देखील शेतकरी संघटनांनी या ३ कृषी कायद्यांविरोधात आज भारत बंदची हाक दिली म्हणून विविध संघटनांनी कलबुर्गी सेंट्रल बस स्थानकाबाहेर निदर्शने केली.

 

आंध्र प्रदेशमध्ये सीपीआय पक्षाचे कार्यकर्ते देखील या भारत बंद ला आवाहन स्वीकारत रस्त्यावर उतरले. 

तर तेलंगणामध्ये काँग्रेस, डावे, टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली.  केंद्रातील एनडीए सरकार आणि तेलंगणातील टीआरएस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बसेस चालवण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी बस स्थानकांच्या बाहेर निदर्शने केली. वानपर्थी, नालगोंडा, नगरकर्णूल, आदिलाबाद, राजन्ना-सिरसिल्ला, विक्रबाद आणि इतर जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार राममोहन रेड्डी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलन केले.

तर गाझीपूर सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधातील निदर्शने सकाळी ७ च्या आधीपासूनच सक्रीय झाले होते. 

भारत बंदच्या आवाहनाला राजस्थानमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. जयपूर, कोटा आणि बिकानेरसारख्या भागात, काही व्यापारी आणि व्यावसायिकांनी बंदच्या समर्थनार्थ स्वैच्छिकपणे आपली दुकाने बंद ठेवली होती.

तर पंजाब मध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, लिंक रोड आणि रेल्वे ट्रॅक अडवल्याने पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. आंदोलकांनी किराणा दुकाने आणि इतर व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले होते. दुपारी ४ च्या सुमारास नाकाबंदी हटवल्यानंतरच वाहतूक संथ गतीने सुरू झाली.

तसेच रोहतकमध्ये आंदोलकांनी राज्य महामार्ग बंद ठेवला होता.

तर तामिळनाडू मध्ये देखील आंदोलन तीव्र झालेले दिसून आले.  शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ तीन शेतकी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी चेन्नईच्या अण्णा सलाई भागात पोलिसांचा अडथळा आणला होता, हिंसक वातावरण होत असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना  ताब्यात घेतले होते.

तर बिहार मध्ये राजद नेते मुकेश रौशन आणि पक्षाचे इतर सदस्य आणि कामगारांनी भारत बंदच्या समर्थनार्थ हाजीपूरमध्ये निदर्शने केली. हाजीपूर-मुजफ्फरपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी, महात्मा गांधी सेतूवरील आंदोलनावरही परिणाम झाला.

 

तसेच या भारत बंद ला महाराष्ट्रात देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. 

 

वरील सर्व बातम्या पाहता असं एकंदरीत चित्र दिसून आलं कि, आजचा भारत बंद हा ऐतिहासिक आणि उस्फुर्त प्रतिसादात पार पडला आहे. त्यामुळे  शेतकरी संघटनांचं भारत बंद यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.