याआधी कधीच भारतानं श्रीलंकेचा विजय साजरा केला नाही, याचं कारण हा लंकेचा रावण होता…

श्रीलंकेनं पाकिस्तानला हरवत एशिया कप जिंकला, टीम टेन्शनमध्ये असताना भानुका राजपक्षे नावाचा लेफ्टी बॅट्समन क्रीझवर उभा राहिला आणि त्यानं पाकिस्तानची पार पिसं काढली. ४५ बॉलमध्ये ७१ रन्स मारत राजपक्षेनं श्रीलंकेचा विजय सोपा केला. भारत या स्पर्धेत पाकिस्तानकडून हरलेला, त्यामुळं फायनलमध्ये श्रीलकांच जिंकावी असं कित्येक फॅन्सना वाटत होतं. श्रीलंका जिंकली आणि त्यांच्या फॅन्स इतकाच आनंद भारतीय फॅन्सनंही साजरा केला.

पण भारतीय फॅन्सनं श्रीलंका जिंकल्याचा आनंद साजरा करणं ही तशी दुर्मिळ गोष्ट कारण एक काळ होता, जेव्हा भारताची श्रीलंकेविरुद्ध मॅच असली की आपल्याला एका माणसाची भीती वाटायची. तोही लेफ्टी आणि बॉलर्सची पिसं काढण्यात एक्स्पर्ट…                 

त्याची हवा भले १९९६ च्या वर्ल्ड कपपासून जास्त झाली असेल ओ, पण तो त्याआधीपासूनच प्रचंड घातक होता. ते वर्षच घातक माणसांसाठी सुपरहिट होतं.

वर्ल्डकप खेळताना मैदानात तो आणि भारतातल्या थिएटर्समध्ये सनी देओल. हा सनी तारीख पे तारीख, अडीच किलोग्रॅम हातधारक म्हणून आपल्याला जसा माहीत, तसाच तोही सिक्सर पे सिक्सर, अडीचपेक्षा अंमळ जास्तच किलोग्रॅमचा हातधारक म्हणून क्रिकेटजगताला माहीत झाला होता. नाहीतर काय, पुढे एकदा कधीतरी फलंदाजी करताना ब्रेट लीचा १५१ किमी/तास च्या वेगाने पंजावर आदळलेला चेंडू, पण गडी फक्त ग्लोव्हज काढतो, फिजीओची हालचाल दिसताच त्याला क्रीझमधूनच उभ्या उभ्या ‘तू बस रे तिथेच, आराम कर’ अशी खूण करतो, एक दोनदा हातावर फुंकर मारतो, ग्लोव्हज घालतो आणि मग पुढच्याच चेंडूवर कडक टिप्पिरा चौकार मारतो.

आमच्या पिढीने जे क्रिकेट पाहिलं त्यात खऱ्या अर्थाने सातत्याने वादळ म्हणावं अशी पहिली बॅटिंग याचीच वाटली होती.

आमच्या काही वर्ष आधी क्रिकेट पाहिलेले काहीजण यासाठी न्यूझीलंडच्या मार्टिन क्रोचं नाव घेतात, त्याधीचे व्हिव रिचर्ड्स. पण याची बॅटिंग म्हणजे.. बॅटिंगला गेलं की ‘दोनच फिल्डर्स सर्कलच्या बाहेर’ या नियमाचा गैरफायदा घेत पहिल्या पंधरा ओव्हर्समध्येच हाण की बडीव कुठंपण घुमीव करत रपारप एवढं झोडपायचं की समोरचे सगळेच खेळाडू असे हतबल झाले पाहिजेत असे हतबल झाले पाहिजेत (चांगला इफेक्ट येण्यासाठी हे वाक्य अजून २-३ दा वाचून पुढचे वाचावे) की झक मारत त्यांना वाटलं पाहिजे

च्यायला घरचे म्हणत होते ‘गप इंजिनियर हो, सरकारी नोकरी कर, बँकेत लाग, यूपीएससी कर, पोलिसात जा, तलाठी कार्यालयात चिकट, पानपट्टी टाक वगैरेपैकी एकतरी सल्ला सिरियसली घ्यायला पाहिजे होता. कुठं नरकात येऊन पडलो राव. असं एवढं बदाबद नॉनस्टॉप कोण मारतायत व्हय, जरा तरी माणुसकी..’

अर्थात रावणाच्या देशातून तयार झालेलं रसायन हे. एक वेगळीच सुपरपॉवर, वेगळाच सुपरमॅन.

सलामीला येऊन रोमेश कालुविथरणासोबत बघता बघता ५०-१०० ची सलामी द्यायचा तेव्हा त्यात रोमेशचा वाटा कित्येकदा पासिंग मार्क्सपुरताही नसायचा, अर्थात ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला की वाण नाही पण गुण लागतोच असं श्रीलंकेतही त्यांच्या सिंहली भाषेत म्हणत असावेतच. कारण पुढे याच्या संगतीत राहून रोमेशही कालू विथ रना झाला.

मजा म्हणजे हा सुपरमॅन सुरुवातीला नंबर ५ ते ८ कुठेतरी सतत दुर्लक्ष होणाऱ्या, अनुल्लेखाने मारल्या जाणाऱ्या टॅक्सपेइंग मध्यमवर्गात किंवा क्वचित दारिद्र्यरेषेखालीही खेळायचा. मग सलामीला येऊ लागल्यावर मात्र त्याच्यातला अंबानी जागा झाला.

नाहीतर ८९ साली सचिननंतर महिन्याभरात पदार्पण करणाऱ्या असल्या जगावेगळ्या स्फोटक ज्वालाग्राही पदार्थाला पहिलं वनडे शतक मारायला ९४ उजाडलं नसतं. मला तर वाटतं, ९६ कपला त्यानं नुकत्याच पाकविरुद्ध हरलेल्या सिंगर कप फायनलचा राग काढला असावा.

९६ साली २१६ चेस करताना २८ मध्ये ७६ हाणलेल्या यानं,

पण बाकीचे महानुभाव सकलेन मुश्ताक आणि वकारला येस सर येस सर म्हणत हजेरी लावून गेल्यामुळं हकनाक हरलेली लंका.

आपला निलेश कुलकर्णी तर आजन्म माफ करणार नाही बहुतेक ह्याला.

कसोटीत पदार्पण आणि आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन कसलं ड्रीम डेब्यू केलं होतं राव निलूदादाने, असा एकमेव भारतीय गोलंदाज आहे तो अजूनही

आणि मग हा सुरु करतो दांडपट्टा, ठोकतो ३४०, किती – ३४०..

जोडीला तो रोशन महानामा दोनशे मारतो.. काय फालतूगिरी.. ५७६ म्हणे – पार्टनरशिप का मोठ्या प्रमाणावर चेष्टा! अरे एवढे मार्क पडले की त्या काळात बारावीला माणूस राज्यात पहिला यायचा अख्ख्या महाराष्ट्रात, इथे दोघेच तेवढा सडा सांडत होते.

मग तो डिसिल्वा तर तसाही मॅडमॅक्सच, तोही शंभर मारून गेला तर त्याची काय चूक.

आधी खेळताना आपल्याही सिद्धू, सचिन, अझर या तिघांनीही शतक केलं होतंच की.. 

बाकी हात धुवायला, साफ करायला तेव्हा जगातल्या अनेक फलंदाजांना हँडवॉश किंवा सॅनिटायझरपेक्षा भारतीय गोलंदाजी जास्त आवडायची. आणि या कसोटीत तर प्रसाद, कुरुविला हा तोफखाना होता आपला आणि कुंबळे, राजेश चौहान, निलूदादा यांनी आपापसात पाच तीन दोन खेळत तब्बल २२० ओव्हर्स टाकलेल्या.

जगातली एकमेव कसोटी ज्यामध्ये दोन फलंदाज सलग अख्खे दोन दिवस बाद न होता खेळले.

निलूदादाला फक्त तीन कसोट्या खेळताच शाल श्रीफळ मिळालं.

भारतीय गोलंदाजी तर त्याची विशेष लाडकी..

कधी त्याचा बॅटिंगचा फॉर्म गेलाय असं वाटलं की श्रीलंका क्रिकेट बोर्ड बीसीसीआयची मनधरणी करायचं बहुतेक – ओ प्लिज ओ प्लिजच, चला की २-४ मॅचेस खेळूया. मग हा पठ्ठ्या मॅचच्या दिवशी सकाळी उठून आपली एक सापशिडी उघडायचा आणि फासे टाकायचा, त्यात बहुतेकदा फक्त शंभरच्या पुढचेच आकडे असायचे.

स्वभावात इंटेग्रिटी बघा किती असावी, जो आकडा येईल त्याला तो जागायचाही, फासे टाके तैसा खेळे त्याची वंदावी पाऊले जरी फुटवर्क फार खास नसले तरी. हां तर आकडे, मग काय.. मैदानात त्याच्या वाटेला आपल्या गोलंदाजीचे साप जायचेच नाहीत फारसे, बक्कळ शिड्या होलसेलमध्ये उपलब्ध करून द्यायचे त्याला.

मग गडी सुटला की सुटलाच,

कधी १५१ काय मारायचा, कधी थेट १८९ काय मारायचा, १०५, १०७, १२०, १२५, १३०.. भारताविरुद्ध खूप व्हरायटी आकडे दिले त्याच्या सापशिडीने.. यातले १२० तर ९६ सिंगर वर्ल्ड सिरीजला आपल्या सचिनच्या ११० झाकोळून टाकत मॅच जिंकून देणाऱ्या याची स्प्रिंगयुक्त बॅट रिक्या पॉंटिंगनेही २००३ फायनलला वापरली आपल्याविरुद्ध.

(शुक.. स्प्रिंग नव्हती असे मनातसुद्धा मानणे अंधश्रद्धा आहे.. होतीच).

पण हा फार पीडायचा, छळायचा, त्रास द्यायचा, म्हणजे इतका त्रास की आपल्यासमोर तर फलंदाजीला जणू काही हा उशी घेऊन जायचा आणि चिंध्या काढून काढून उडवायचा.. कुत्रं हाल खात नाही म्हणतात अशावेळी, पण हा लंकेचा म्हणून त्या संदर्भाने जटायूही हाल खायचा नाही.

तांडवसा युद्ध कर युद्ध कर भयंकर.. रा रा रा रा. म्हणूनच भारतीय गोलंदाजांना खरं तर त्याने स्वखर्चाने आजन्म पेन्शन दिली पाहिजे.. पण म्हणालो ना – माणुसकी म्हणून काय ती नाहीच ओ.. नकोच ते.. तो खेळत असताना आपल्या गोलंदाजांचे आकडे, चेहरे, नशीबं, निवडलेल्या करियरबद्दलचे मनातले विचार वगैरे सगळंच आठवताना, कल्पना करताना त्रास होतो.

पण एक आठवतं, आम्ही शाळेत असताना सांगलीत शिवाजी स्टेडियमला एक प्रदर्शनीय तत्सम सामना खेळवला गेला होता.

आपले सचिन, कांबळी आणि लंकेकडून हा आणि मॅडमॅक्स. तुफान गर्दी झालेली म्हणतात यांचा खेळ पाहायला. सचिन आणि हा दोघेही निरमा, रिन, सर्फ, टाइड, एरियल सगळं घेऊन आले होते.

आयपीएल सुरु झालं तेव्हा अपेक्षेप्रमाणे सचिनने याला आपल्याकडे घेतलं आणि त्याच्या विश्वासाला जागत त्या पहिल्या आयपीएलला सर्वात जास्त षटकारही हाच मारून गेला. शेर बुढा हुआ तो भी शेरच होता है. तीस षटकार – २००८ हां.. अगागागा.. रा रा रा रा..

बरं फक्त फलंदाजीत घातक म्हणून आपण फलंदाजीला गेल्यावर जरा निवांत रहावं म्हटलं तर तेही करू द्यायचा नाही हा.

३०० विकेट्स पण घेऊन बसलाय वनडेत आणि १३००० धावा, वर १०० झेल.. असलं युनिक त्रैराशिक जुळवलेला अजूनही हा एकटाच आहे जगात. असल्या खेळाडूंची कसोटीत ४० आणि वनडेत ३२ ची सरासरी बघण्यात अर्थ नाही, खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट प्लेयर्स, मॅचविनर्स असतात हे. क्रिकेट बदलून टाकणारे.. ट्रेन्डसेटर्स.

आजपासून मी जे जसं खेळेन ते बघून घ्या, किती दिवस व्हिव रिचर्ड्स आठवत बसणार तुम्ही. फुल धुरळा स्वॅग होता याचा.

निवृत्तीनंतर राजकारणात गेला, तिथेही बऱ्यापैकी यशस्वी झाला.

श्रीलंका क्रिकेट बोर्डातही योगदान दिलं. पण २०१८ ला त्याचा फोटो बघवला नाही, गुडघ्याची दुखापत बळावली होती, वॉकरशिवाय चालता येत नव्हतं. आपल्याला भारतीयांना इतक्या जखमा दिलेला माणूस जेव्हा त्याच्या गुडघ्याच्या जखमांनी बेजार झाला तेव्हा माझ्यासारखे अनेक भारतीय क्रिकेटप्रेमी खरंच मनापासून म्हणत होतो –

लवकर बरा हो रे बाबा. कालांतराने तो बरा झालाही.

त्याच्यानंतर जयवर्धने, संगकारा, दिलशान असेपर्यंत लंकेची फलंदाजी चांगलीच होती.. पण पुढे होत गेलेली वाताहत बघवत नाही. नाही म्हणायला कुशल परेराची फलंदाजी पाहताना अनेकदा याचाच भास होतो. तीच स्टाईल, तसेच शॉट्स.. खास करून फिल्डर्सच्या डोक्यावरून तर तस्सेच बिनधास्त फटके मारतो तो. टॅलेंट नक्कीच आहे, या सुपरमॅनच्या दहा टक्के तरी कमवावं त्यानं खरंच.

अगणित जखमा दिल्यास तू आम्हाला, बघ शेवटपर्यंत तुझं नाव लिहावंसं वाटलं नाही..

  • भिडू पराग पुजारी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.