शूटर डावखुरा आहे, हे समजलं नसतं तर संदीप नंगलची मर्डर मिस्ट्री कधी उलगडलीच नसती…
जिंदगीत आपली एखादी गोष्ट इतरांपेक्षा वेगळी असली की खतरनाक अटेन्शन मिळतं, पण कधीकधी हीच गोष्ट आपल्याला अडचणीत आणू शकते. कारण लोकांना हाच एक वेगळा फरक लक्षात राहतो. या किस्स्यात असाच एक इतरांपेक्षा वेगळा कार्यकर्ता आहे, ज्याला या वेगळेपणामुळं अटेन्शन मिळालं आणि इंटनॅशनल कनेक्शन असलेली मर्डर मिस्ट्री उलगडली गेली.
संदीप नंगल, नावाजलेला कबड्डी प्लेअर. राज्याच्या टीमपासून सुरुवात करत त्यानं व्यावसायिक लिग्समध्ये थेट भारताच्या कबड्डी टीमचं नेतृत्व केलं. पुढं जाऊन तो अनेक युनायटेड किंगडममध्ये स्थायिक झाला, मात्र तिथंही त्याचं कबड्डीवरचं प्रेम कमी झालं नाही. त्यानं युनायटेड किंगडमच्या कबड्डी टीमचंही नेतृत्व केलं.
मात्र आंतरराष्ट्रीय कबड्डीपेक्षा तो जास्त रमला, व्यावसायिक कबड्डी लिग्समध्ये. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि युनायटेड किंगडममधल्या लिग्समध्ये त्याच्या नावाची आणि त्याच्या खेळाची प्रचंड चर्चा होती. मात्र भारतामध्ये संदीपचं नाव चर्चेत येण्यासाठी एक दुर्दैवी घटना कारणीभूत ठरली होती.
मार्च २०२२. संदीप नंगल आपल्या कुटुंबासह भारतात आला होता.
तेव्हा जालंधरमधल्या मल्लिया नावाच्या एका छोट्या गावात संदीप गेला, कारण होतं कबड्डी मॅच. संदीप मेजर लीग कबड्डीचा सर्वेसर्वा होता. ही लीग प्रामुख्यानं पंजाबमध्ये आणि युनायटेड किंगडममध्ये खेळवली जायची. तब्बल २५० पेक्षा जास्त प्लेअर्स या लीगशी जोडले गेले होते.
तो दिवस होता १४ मार्चचा, संदीप ज्या मॅचसाठी आला होता, त्यात लोकल प्लेअर्ससह आंतरराष्ट्रीय कबड्डी प्लेअर्सही सहभागी झाले होते. त्यामुळं या सामन्याला प्रचंड गर्दी झाली होती. त्यात संदीपसारखा मोठा प्लेअर आल्यानं गर्दी आणखीनच वाढली.
मात्र कबड्डी खेळापेक्षा ही मॅच गाजली, ती एका खुनामुळे आणि हा खून दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाही, तर संदीप नंगलचा होता.
मॅचला झालेल्या गर्दीचा फायदा घेत, संदीप नंगलचा खून करण्यात आला. त्याच्यावर तब्बल ५० गोळ्या झाडण्यात आला आणि या हल्ल्यात संदीपचा मृत्यू झाला. एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा त्याच्यात गावात निर्घृण खून झाला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
संदीपच्या घरातल्यांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली.
साहजिकच पोलिसांवर प्रेशर वाढलं, त्यांनी तपासासाठी सूत्र हलवली. पण त्यांच्या हातात कुठलाच पुरावा सापडला नव्हता. त्यांनी संदीपला भेटलेली लोकं, रेकॉर्डवरचे गुन्हेगार सगळ्यांची चौकशी केली, मात्र तरीही तपासाची पाटी कोरीच राहिली होती.
अशातच पोलिसांच्या हाती एक व्हायरल व्हिडीओ लागला.
जेव्हा संदीपवर हल्ला झाला आणि आजुबाजुला गोंधळ उडाला त्या सगळ्या घटनांचा कुणीतरी मोबाईलवर व्हिडीओ काढला होता. पोलिसांनी निरखून पाहिलं, तेव्हा त्यांना समजलं की संदीपवर गोळ्या झाडणारे दोन शूटर्स आहेत आणि त्यातला एक डावखुरा आहे.
या शुटरचं डावखुरं असणं हाच पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला. त्यांनी आता डावखुऱ्या शूटर्सचा शोध घायला सुरुवात केली.
या डावखुऱ्या शुटरच्या तपासात पोलिस पोहोचले गुन्हेगार कौशल चौधरीपर्यंत, मात्र हा चौधरी तिहार जेलमध्ये बंद होता. फतेह सिंग, सिमरनजीत सिंह आणि अमित डांगर या तिघांची नावंही पुढं आली, मात्र हे तिघही वेगवेगळ्या जेलमध्ये होते.
साहजिकच पोलिसांना प्रश्न पडला की खून केला कुणी ?
त्यांनी तिहार जेलमध्ये जाऊन कौशल चौधरीकडं चौकशी केली, तेव्हा त्यानं सांगितलं की विकास माल्हे नावाच्या माझ्याच शूटरनं संदीपचा खून केलाय, हा विकास डावखुरा आहे. पोलिस त्याच्यावर विश्वास ठेवणारे नव्हतेच, पण पुढं तपासात जे काही उलगडलं त्यामुळं त्यांच्याही फ्युजा उडाल्या.
कौशल चौधरी हा फार मोठा गँगस्टर नव्हता, तरीही त्यानं संदीप नंगलला मारण्याची सुपारी घेतली होती आणि ही सुपारी मिळाली होती कॅनडामधून. संदीप हा मोठा कबड्डी प्लेअर, त्यात मेजर लीगमुळं त्याचं सामाजिक आणि आर्थिक वजनही चांगलंच वाढलं होतं.
त्याच्या मृत्यूचं कारण हाच पैसा ठरला होता…
संदीपला बॅकअप होता, जेलमध्ये असलेल्या जग्गू भगवानपुरिया या गँगस्टरचा. त्यामुळं संदीपची सुपारी घेणाऱ्याला भगवानपुरियाला आव्हान निर्माण करायचं होतं. कौशल चौधरीनं डेरिंग केली आणि त्याला सुपारी दिली कॅनडामधल्या सनोवर ढिल्लोनं.
हा ढिल्लो साधासुधा असामी नव्हता, तर कबड्डी माफिया म्हणून ओळखला जात होता.
त्यानं कॅनडाच्या ओंटारियोमध्ये स्वतःचं कबड्डी फेडरेशन सुरू केलं आणि स्पर्धा भरवायला सुरुवात केली. मात्र झालं असं की जसा प्रतिसाद मेजर लीगला मिळत होता, तसा काय ढिल्लोच्या स्पर्धेला मिळेना. त्यानं थेट संदीप नंगलला ऑफर दिली की मेजर लीग सोडून माझ्याकडे ये. मात्र संदीपनं या ऑफरला नकार दिला.
त्यामुळं ढिल्लोला एक गोष्ट कळून चुकली होती, जोवर संदीप नंगलचं कबड्डीवर वर्चस्व आहे, तोवर आपली डाळ काय शिजत नाही. अखेर त्यानं संदीपची सुपारी द्यायची ठरवली आणि कॅनडामध्ये बसून तिहारमध्ये बंद असलेल्या कौशल चौधरीपर्यंत लिंक लावली.
ज्या कबड्डी खेळानं अनेकांना प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यातल्या पैशामुळं एका नावाजलेल्या खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला.
असंही सांगण्यात येतं की, कबड्डीच्या लीग कल्चरमध्ये आलेल्या ड्रग्सच्या वापराला संदीपचा विरोध होता, त्याला आपला खेळ बदनाम करायचा नव्हता आणि त्यातूनच त्याच्या हत्येची कहाणी लिहिली गेली.
पंजाबमध्ये झालेला मर्डर, त्याचे कॅनडा आणि तिहारमधले सूत्रधार सगळं कनेक्शन पोलिसांना फक्त त्या व्हायरल व्हिडीओमधल्या डावखुऱ्या शूटरमुळं लावणं शक्य झालं. पुढं पोलिसांनी त्या विकास माल्हेला पाठलाग करुन अटक केली, थोडक्यात त्याचं वेगळेपणच त्याला अडचणीत आणणारं ठरलं…
हे ही वाच भिडू:
- गुन्हेगारांनी चकवा दिलाच होता, पण पोलिसांनी दोन शब्दांच्या जोरावर मास्टरमाईंड हुडकले…
- वडीलांनी गिफ्ट म्हणून अंगठी दिली, पोरीनं तिच अंगठी वडीलांची सुपारी द्यायला वापरली
- कर्नाटकचा सिरीअल किलर महिलांवर बलात्कार करुन खून करायचा, तेही त्यांच्या अंतर्वस्त्रांसाठी