अहिंसावादी साने गुरुजी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देश पेटवायला उठलेत अशी टीका झाली

महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी. त्यांच्या श्यामची आई या पुस्तकातील भावनिक बोलण्याने आणि लिखाणाने त्यांची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आजही मनात घर करून आहे.

पण ते जेवढे भावनिक होते तेवढेच अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला कचरत नसत. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची बंडखोर वृत्ती त्यांच्यात पहिल्यापासूनच होती. म्हणूनच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभावातून त्यांनी अंमळनेर येथील शिक्षकाची नोकरी सोडून देशकार्यात उडी घेतली.

यानंतर त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. सोबतच वेगवेगळ्या आंदोलन आणि मोर्चांमध्ये सहभागी व्हायला, त्याचे नेतृत्व करू लागले. यात सविनय कायदेभंगाची चळवळ, धुळे मधील कामगारांच्या न्यायासाठी उभारलेले ‘प्रताप मिल आंदोलन अशा आंदोलनाचा समावेश होता.  

यापैकीच एक होते खानदेशातील शेतकऱ्यांचा आणेवारी माफ व्हावी म्हणून उभारलेलं ५० हजार शेतकऱ्यांच आंदोलन.

१९३८ च्या पावसाळ्यात संपूर्ण खानदेशात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक बुडाली होती. सगळीकडे ओल्या दुष्काळामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती झाली होती. अशातच त्याचवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे दौरे काढण्यात आले व पिकांची आणेवारी अतिशय कमी असल्याचे निरीक्षण करण्यात आले.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतसारा माफ व्हावा अशी जवळपास सर्वच गावांमार्फत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही आणेवारी ६ आणे लावली.

सोबतच सामुदायिक सारा वसुली स्थगितीच्या अर्जाची दखल न घेता त्यांनी प्रत्येकाने वैयक्तिक अर्ज करावा, असे आदेश काढले. त्याकाळातील गरीब व अज्ञानी शेतकऱ्यांना वैयक्तिक अर्ज करणे गैरसोयीचे आणि जाचक होते.

शेतकऱ्यांच्या हेच गाऱ्हाण मांडण्यासाठी जागोजागी परिषद – सभा भरवण्यात आल्या.

२८ डिसेंबर १९३८ रोजी पारोळा तालुक्यातील देवगांव येथे हजारो शेतकऱ्यांची मोठी सभा भरविण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कॉ. डांगे होते. सभेत कॉ. सरदेसाई, साने गुरुजी, लालजी पैंडसे इत्यादी नेत्यांची भाषण झाली.

याच सभेत २६ जानेवारी १९३९ रोजी पूर्व खानदेशातील हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा जळगांवच्या जिल्हाधिकारी बंगल्यावर नेण्याच ठरले.

या आंदोलनाचं नेतृत्व साने गुरुजींनी स्वतःकडे घेतले. त्यांनी जागोजागी प्रचार सभा घ्यायला सुरुवात केली. प्रचारासाठी त्यांनी गाणी देखील रचली.

येथून तेथून सारा पेटू दे देश, पेटू दे देश ।

हे किसान गीत विशेष गाजले.

त्याचप्रमाणे जो किसान मोर्चा निघणार होता, त्या मोर्चासाठी देखील साने गुरुजींनी गीत तयार केलं होतं.

आता उठवू सारे रान । आता पेटवू सारे रान ।

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण ।

खानदेशातील गाव खेड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडी ही गाणी म्हणली जावू लागली. शेतकऱ्यांमध्ये  जागृती निर्माण झाली. २३-२४ जानेवारीपासूनच गावा-गावातील शेतकरी तिरंगी झंडा फडकवत
जळगांवच्या दिशेनं येऊ लागले.

पण साने गुरुजींनी उभारलेल्या या आंदोलनात बहुतेक स्थानिक नेत्यांची नाराजी होती. यात आघाडीवर होते पूर्व खानदेशातील देवकीनंदन नारायण, अण्णासाहेब दास्ताने, धनाजी नाना, शंकरभाऊ काबरे, हरिभाऊ पाटसकर (हे पुढे मध्यप्रदेशचे राज्यपाल झाले होते), राजमल लखीचंद इत्यादी पुढारी.

या सगळ्यांच्या मते, प्रांतिक सरकार आपलेच आहे, त्यामुळे असा मोर्चा काढणे अयोग्य आहे. प्रांतीय नेते देव, जेधे यांचे देखील काहीसे असेच मत होते. या पुढाऱ्यांनी मोर्चाच्या गीता बद्दलही आक्षेप घ्यायला सुरुवात झाली.

अहिंसेचा पुरस्कार करणारे साने गुरुजी देश पेटवायची भाषा करीत आहेत, अशीही टिका सुरु झाली.

मोर्चाला विरोध करण्याचा या मंडळींचा प्रयत्न मोर्चेवाल्यांनी मात्र सहन केला नाही. अखेरीस हे प्रकरण सेवाग्रामला मुक्कमी असलेल्या महात्मा गांधींपर्यंत पोहोचले.

अशातच मोर्चाच्या दिवशी कलेक्टर काही महत्वाच्या कामानिमित्ताने बाहेर जाणार आहेत. त्यामुळे मोर्चवाल्यांचे निवेदन कोण स्विकारणार? असे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या साने गुरुजींनी दोन दिवस आधी कळवण्यात आलं. मोर्चाच्या संयोजकांना या गोष्टीचा फार राग आला, पण इलाज नव्हता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे अमळनेरच्या ‘काँग्रेस’ या वृत्तपत्राने त्यांच्यावर तीव्र शब्दात टिका केली.

हजारो शेतकरी आपलं गाऱ्हाणं घेऊन तुमच्याकडं येत असतांना आपण त्यांना भेटू शकत नाहीत. याचा नेमका अर्थ काय?  इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये सेवा भावना अजिबात नाही, अशी टीकाही त्यात करण्यात आली.

इकडे नेमके याच्या विरुद्ध जळगांवच्या काँग्रेस विरोधी ‘बातमीदार’ साप्ताहिकाने देखील साने हे आमचेच, विरोधी पक्षाचं काम करत आहेत. अशी टीका करुन काँग्रेसच्या नेत्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला.

नेमक मोर्चाच्या एक दिवस आधीच साने गुरुजी यांना महात्मा गांधी यांनी तार केली. त्या तारेत

“Morcha on Collector’s Bungalo is a mad idea and it should be abandoned”

गांधीजींच्या तारेमुळे ऐनवेळी मोर्चा रद्द करण्यात आला. अर्थात गांधीजीचा हेतु अधिक व्यापक व वेगळा होता. पण स्थानिक नेत्यांना साने गुरुजींना माघार घ्यावी लागली यातच आनंद वाटत होत.

तोपर्यंत लांबचे लोक पायी जळगावच्या आसपास येऊन पोहोचले होते. आता तर त्यांना परत फिरवणे ही शक्य नव्हते. जेष्ठ नेत्याचे सहकार्य नसले तरी जळगावमधील तरुण मंडळींमध्ये खूपच उत्साह होता.

जळगावच्या लोकांना जागोजागी शेतकऱ्यांना भाकरी खाण्यासाठी निवारे उभारुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तर व्यापाऱ्यांनी चणे- मुरमुरे देण्याची व्यवस्था केली होती.

आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत जळगांवच्या आसपास मोर्चाच्या नेत्यांच्या मते ५० हजार मोर्चकरी येऊन दाखल झाले होते.

संयोजकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कळकळ होती, पण मोर्चा रद्द झाला तर लोकांची किती निराशा होईल व त्यांचा संघटनेवरचा विश्वासच उडून जाईल. म्हणून मोर्चाचे जागी अखेरीस २६ जानेवारीला शेतकरी परिषद घेण्यात आली.

या परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष जेधे यांची निवड करण्यात आली.

परिषदेत केशवराव जेधे व शंकरराव देव वगैरे जेष्ठांची भाषणे झालीत. साने गुरुजींना बोलू द्यावे, हे वरिष्ठांच्या मनात नव्हते. पण सभा सुरु असतांना अनेकांनी त्यांना बोलू देण्याची मागणी केली, मात्र ती मान्य करण्यात येत नव्हती.

व्यासपीठावरील पुढाऱ्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांकडून खूपच आरडा-ओरडा सुरु झाला. दोन शेतकरी वर चढले व अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले. अखेरीस साने गुरुजींनी व्यासपीठावर जाऊन मध्यस्थी केली व लोकांना बाजूला नेले. पण साने गुरुजींना बोलू दया, अशा घोषणा काही बंद होत नव्हत्या.  त्यामुळे वरिष्ठांची इच्छा नसताना देखील साने गुरुजींना बोलू दिले.

अखेरीस साने गुरुजींच्या आंदोलनामुळे ६ फेब्रुवार १९३९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून २ आणे पीक आणेवारी कमी केल्याची घोषण केली. जळगांव, चाळीसगांव, पाचोरा, चोपडा, जामनेर, यावल, रावेर, भडगांव या तालुक्यात व पेठयात सरकारनं रुपयाला २ आणे सुट दिली.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.