देश स्वतंत्र होण्याच्या आधी साने गुरुजींनी विठोबाला जातीपातीच्या बंधनातून स्वतंत्र केलं.

मे १९४७. भारताचं स्वातंत्र्य अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल होतं.

अनेक वर्षांची गुलामीची बेडी तुटणार, आता आपल राज्य येणार म्हणून देशभर लोक उत्साहात होते.

पण पंढरपूरच्या विठोबाच्या प्रांगणात मात्र खळबळ उडाली होती. उभ्या महाराष्ट्राचे लाडके साने गुरुजी उपोषणाला बसले होते. विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून हे आंदोलन सुरु होतं.

पंढरपूर म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्र. कित्येक वर्ष राज्यभरातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात. ज्ञानोबा तुकोबाच्या बंडखोर संतपरंपरेचा वारसा या वारीला आहे. तरीही समाजाचा मोठा घटक असलेल्या दीनदलित समाजाला या दर्शनापासून वंचित ठेवलं जात होत.

विठोबाच्या या बडव्यांनी खुद्द संत चोखोबांना दारावरून आत येऊ दिलं नव्हतं. इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचं साने गुरुजींनी ठरवलं.

सर्वात आधी राज्यभर या विषयावरून रान उठवलं. राष्ट्र सेवा दलाची पथके “घ्यारे घ्यारे, हरिजन घरात घ्यारे ” ही पदे गाऊन समाजप्रबोधनाचा प्रयत्न करत होती.

सेनापती बापट, आचार्य कर्वे असे अनेक गांधीवादी नेते त्यांच्या सोबत आले. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साने गुरुजी सेनापती बापटांना बरोबर घेऊन उभा महाराष्ट्र पिंजून काढत होते.

ऊन-वारा-पावसाची तमा न करता एका ध्यासाने गुरुजी गावोगाव हिंडत होते. हरिजन मंदिर प्रवेशासाठी जनमत जागृती करीत होते. अस्पृश्यता हा कायद्याने दूर होणार नाही तर ती पाळणाऱ्याच्या मनातून दूर झाली पाहिजे या वर गुरुजींचा ठाम विश्वास होता. गुरुजींची भाषणे लोकांच्या मनाचा ठाव घेत होती.

संतांचे अभंग, स्वत:च्या कविता, सुभाषिते, गोष्टी यांनी गुरुजींची भाषणे सुश्राव्य होती. गावागावातून लोकमत झपाटयाने बदलत होते. अशाच एका गावातील सभेत गुरुजी म्हणतात,

 ‘‘बंधुभगिनींनो! मी तुमच्या पाया पडून विनवीत आहे. प्रेमधर्माने वागा. बंधुभावाची मला भीक घाला. मला पाठिंबा द्या. मी एकटा काहीच करू शकत नाही, तुमची साथ मिळाली तरच काही साध्य करू शकेन.”

लाखो लोकांची सही घेण्यात आली तरी मंदिर प्रशासनाने अस्पृश्य समाजाला प्रवेश देण्याचं नाकारलं होतं.

अखेर दि. १मे १९४७ रोजी एकादशीच्या मुहूर्ताने साने गुरुजींनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात प्रायोपवेषणाला सुरवात केली.

पण या उपोषणाच्या विरोधात देशभरातून सनातनी मंडळी पंढरपूरला गोळा झाली. स्वातंत्र्याच्या तोंडावर गुरुजी हा कसला अपशकून करत आहेत असं काही जणांनाच म्हणण होतं.

समाजवादी विचारांच्या साने गुरुजीना कशाला हवा मंदिरप्रवेशाचा मुद्दा वगैरे टीका झाली.

“जावो साने भीमापार नही खुलेगा विठ्ठलद्वार”

अशा घोषणांनी साने गुरुजीना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. खुद्द गांधीजींना साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गैरसमज करून देण्यात आला. गांधीजीनी गुरुजीना ताबोडतोब हे उपोषण थांबवा अशी तार पाठवली.

पण गुरुजी आपल्या गुरुंचही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी गांधीजींना उलट तार पाठवून आपली भूमिका मांडली,

“आत्मक्लेशाने जर ब्रिटीशांच मन वळवू शकत असेल तर बडवे मंडळीचं का बदलणार नाही? “

राज्यभरातल्या ग्रामीण भागातून लाखो तरुण कार्यकर्ते साने गुरुजीना पाठींबा देण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले. खुद्द आचार्य अत्रे, मावळंकर ,ठक्कर बाप्पा असे मोठमोठे व्यक्तिमत्व गुरुजींच्या सोबत उभे होते. या सगळ्यांच्या दबावाखाली बडवे आणि मंदिर प्रशासनाने मंदिरप्रवेशाचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला.

१० मे १९४७ रोजी  गुरुजींनी आपल्या उपोषणाची सांगता केली. पुण्याचे दलित समाजाचे कार्यकर्ते सोनवणकर यांनी दिलेला मोसंबीरसाचा ग्लास गुरुजींनी अत्यंत कृश झालेल्या थरथरत्या हाताने तोंडास लावताच लोकांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ या जयघोषाबरोबर ‘साने गुरुजी झिंदाबाद’च्या घोषणांनी सारा तनपुरे मठ व परिसर दणाणून टाकला.

देश स्वतंत्र होण्याच्या आधी गुरुजींनी विठोबाला बंधनातून स्वतंत्र केलं.

पांडूरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी. कवीमनाचा लेखक,ध्येयवेडा स्वातंत्र्यसैनिक, आदर्शवादी विचारवंत, सच्चा समाजवादी, हळवा मातृभक्त अशी त्यांची अनेक रूपे सगळ्यांना परिचित आहेत. गेली कित्येक वर्ष त्यांनी लिहिलेलं शामची आई हे मराठी मूलामुलीसाठी पुस्तकांच्या विश्वातलं पहिलं पाऊल समजलं जात.

या देशकार्याच्या घडामोडीमध्ये त्यांच्यातला शिक्षक जिवंत होता. साधना सारखं मासिक असो अथवा राष्ट्रसेवादलासारखी संस्था असो राष्ट्रासाठी झटणारे समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते घडवण्याचं काम गुरुजींनी निरंतर चालू ठेवलं.  प्राताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग केला.

स्वातंत्र्यानंतर मात्र हळूहळू त्यांचा अपेक्षाभंग होत गेला. गांधीजींचा खून त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेली प्रतिक्रियात्मक दंगल या सगळ्यानी ते खूप दुखावले होते. आपली माणसे सत्ता आल्यावर  बदलताना त्यांनी पाहिली होती. बलसागर भारताचा स्वप्न डोळ्यासमोर भंग होताना दिसत होतं. या सगळ्याला कंटाळून त्यांनी निर्वाणाचा निर्णय पक्का केला.

११ जून १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. पुल देशपांडे आपल्या एका भाषणात म्हणतात,

“गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही.  गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो…” 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.