साने गुरुजी म्हणाले, “हा धडपडणारा मुलगा राजाराम महाराष्ट्राचा महान पुढारी बनेल.”
राजाराम बापू पाटील. कोणी त्यांना लोकनेता म्हणत तर कोणी सहकारमहर्षी. कृष्णेच्या तीरावरच्या भागात साखर कारखाना, विविध उद्योगाच्या माध्यमातून सहकाराची गंगा आणणारा नेता ते राज्याच्या खेड्यापाड्यात वीज पोहचवणारा ऊर्जा मंत्री अशा वेगवेगळ्या कार्यांनी त्यांना ओळखलं जातं.
पण त्यांची वाळवा तालुक्यासाठीची मुख्य ओळख म्हणजे हातातली कुऱ्हाड टाकून हातात पती पेन्सिल घ्यायला लावणारा नेता. राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा एकेकाळी फक्त कुऱ्हाडीसाठी प्रसिद्ध होता . खून, मारामाऱ्या, आक्रमक आणि संतापी अशी या तालुक्याची ओळख होती. या भागाला माणसात आणायचं काम राजाराम बापूंनी केलं.
राजाराम बापू जन्मले वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे शेतकरी कुटूंबात. वडील अनंतदादा आणि भाऊ ज्ञानू बुवा हे दोघेही स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. ते गांधीजींचे अनुयायी असल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचा वारसा बापूना शालेय जीवनात असल्यापासून मिळाला.
त्याकाळी कासेगाव येथे फक्त मराठी सहावी पर्यंतच शाळा होती. राजाराम बापू सहा किलोमीटरची वाट पायी तुडवून शेजारच्या गावात असलेल्या शाळेत जात असत. त्यांच्या बरोबरची गावातली कित्येक मुलांनी शाळा लांब आहे म्हणून शिक्षण सोडून दिलं. या रस्त्यातून ये जा करतानाच बापूंनी स्वप्न बघितलं की,
एवढं मोठं व्हायचं की आपल्या भागातल्या कुठल्या मुलाला लांब पडते म्हणून शाळा सोडायला लागू नये.
ते शाळेत हुशार होतेच. घरच्यांनी देखील राजारामला तो जेवढं शिकतोय तेवढं शिकू द्यायचं ठरवलेलं. बापू माध्यमिक शिक्षणासाठी म्हणून पुण्याला आले. महाविद्यालीयन शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांची शिष्यवृत्ती मिळाली. कॉलेज साठी राजाराम बापू बडोद्याला गेले. पुढे एल.एल.बी साठी म्हणून शाहू महाराजांची नगरी असणाऱ्या कोल्हापूरला आले.
आपल्या हुशारीने आणि कठोर मेहनती त्यांनी कायद्याचं शिक्षण चांगल्या मार्कांनी पूर्ण केलं. कासेगावचे पहिले वकील बनले.
त्याकाळी वकिलांना मोठा मान होता. अंगठेबहाद्दर असणाऱ्या बहुजन समाजाला कोर्ट कचेर्यांच्या पायऱ्यांवर लुटलं जायचं. शेतीचे खटले आणि इतर केसेस मधून वकील खोऱ्याने पैसे छापायचे. राजाराम बापू देखील आता वकिली सुरु करणार आणि घरादाराला सुबत्तेचे दिवस आणणार असच सगळ्यांना वाटत होतं.
पण बापूंच्या डोक्यात वेगळंच होतं.
कोल्हापुरात शिकत असताना त्यांची भेट स्वातंत्र्यलढ्यातील भूमिगत क्रांतिकारक बाबूजी पाटणकर आणि धन्वंतरी दादा यांच्याशी झाली होती. बापूंशी बोलताना त्यांनी वाळवा तालुक्यात शिक्षणाची आबाळ आहे आणि या भागातल्या मुलांना चांगल्या मार्गावर आणायचं असेल तर शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचवायला हवं हे बोलून दाखवलं.
लहानपणापासून बापुना देखील हेच स्वप्न पडायचं. पैसे वाली वकिली करायची कि शिक्षण संस्थेच्या जबाबदारीचा जोखड अंगावर घ्यायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. पण स्वातंत्र्यलढ्याचा, त्यागाचा वारसा असल्यामुळे त्यांनी काही क्षणातच उत्तर मनाशी ठरवलं.
साध्या शिक्षणासाठी आपल्याला जे कष्ट करावे लागले ते आपल्या बांधवाना करायला लागू नये म्हणून वकिलीवर पाणी सोडून कासेगाव येथे शिक्षण संस्था सुरु केली. ते वर्ष होते १९४५.
बापू स्वतः खेडेगावात शिकलेले असल्यामुळे इथल्या समस्या काय असतात, इथल्या मुलांना कोणते प्रश्न भेडसावतात याची त्यांना कल्पना होती. खेड्यांचा विकास करायचा असेल तर पहिल्यांदा तिथल्या लोकांना सुशिक्षित बनवावे लागेल आणि त्यासाठी या गावांमध्ये दर्जेदार शिक्षण पोचवावे लागेल हे त्यांनी ओळखलं होतं. ते नेहमी म्हणायचे,
शिक्षणाची गंगा झोपडी पर्यंत पोहचली पाहिजे म्हणून शिक्षण संस्था खेड्यातच सुरु केल्या पाहिजेत.”
वयाच्या पंचविसाव्या वर्षी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केल्यावर त्यांनी गावात आझाद विद्यालयाची सुरवात केली. या शाळेत विनावेतन शिकवण्याचे काम आपल्या डोक्यावर घेतले. आपल्या कॉलेजमधील मित्र गोपाळराव उफळेकर आणि दत्तोबा घोरपडे यांना कासेगाव सारख्या आडमार्गाच्या गावात शिक्षक म्हणून येण्यास राजी केलं.
फक्त शाळा सुरु करून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत होणार नाही, यासाठी वसतिगृह देखील सुरु करावे लागेल याची त्यांना कल्पना होती.
त्याकाळात विनोबा भावे यांची सर्वोदयी चळवळ सुरु होती. राजाराम बापूंनी या चळवळीला साक्षी ठेवून आपल्या गावात मोफत बोर्डिंग सुरु केलं,
नाव दिल सर्वोदय वसतिगृह
या संस्थेचा खर्च चालवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खळ्यावर बापू पोते घेऊन पोहचायचे आणि तिथून धान्य गोळा करून शाळेचा खर्च चालवायचे. शाळा वसतिगृह चालवताना आर्थिक झळ तर सोसलीच पण प्रचंड शारीरिक कष्ट देखील केले. फक्त कासेगावचं नाही तर आसपासच्या भागात देखील या ध्येयवेड्या तरुणाचं नाव जाऊन पोहचलं.
त्यांच्या वसतिगृहात जवळपास ४०० मुलांच्या राहण्या खाण्याची मोफत सोया केली होती. दूरदूरवरून विद्यार्थी शिकण्यासाठी कासेगावला येऊ लागले होते.
वाळवा तालुक्यात सुरु असलेला हा अभिव प्रयोग पाहण्यासाठी खुद्द परमपूज्य साने गुरुजी कासेगावला आले. विशीतला हा तरुण या कार्याचा एक हाती किल्ला लढवतोय हे पाहून त्यांना कौतुक आणि अभिमान दोन्ही वाटला. बापूंची जिद्द आणि धडपड पाहून ते आपल्या जाहीर भाषणात म्हणाले,
“हा धडपडणारा मुलगा राजाराम महाराष्ट्राचा महान पुढारी बनेल.”
हा कुठल्या राजकीय नेत्याने व्यासपीठावरील भाषणात केलेली खुशामत नव्हती तर साने गुरुजींसारख्या कर्मयोग्याने दिलेला आशिर्वाद आणि राजाराम बापूंच्या कार्याला पोचपावती होती.
बापूंनी आयुष्यभर साने गुरुजींनी दिलेला वसा पुढे चालवला. राजकारणात त्यांनी अनेक भराऱ्या मारल्या पण तत्वाशी तडजोड कधी केली नाही. मंत्रीपदी असूनही एसटी बसने प्रवास करायला न लाजणारा हा सहकार महर्षी महाराष्ट्राने पहिला. बापूंचे इंजिनीअरिंग कॉलेज, बापूंचा साखर कारखाना, बापूंची सूत गिरणी आणि त्यांचे पुत्र जयंतराव पाटील यांनी त्यापुढे जाऊन उभी केलेली गारमेंट फॅक्टरी हे वाळवा तालुक्यात समृद्धी घेऊन आले. हे सगळं घडलं राजरं बापू पाटील या नेत्याच्या जिद्दीमुळं.
हे ही वाच भिडू.
- राजारामबापूंच ऐकलं असतं तर असले महापूर कधीच आले नसते…?
- वाळवा तालुक्याला बापूंनी हातातून कुऱ्हाड टाकून पुस्तक घ्यायला लावली.
- शेताच्या बांधावर असणारी झाडे पुर्वी सरकारच्या मालकीची असत, बापूंमुळे ती शेतकऱ्यांच्या मालकीची झाली