वर्ल्डकपचा टॉस जिंकण्यासाठी संगकाराने एक नालायकपणा केला होता.

२ एप्रिल २०११. सगळ्या जगाचं लक्ष मुंबईच्या वानखेडे स्टेडियमकडे लागलेलं होत. कारणच तसं होतं. भारत श्रीलंका या संघा दरम्यान वनडे वर्ल्ड कपची फायनल होणार होती.

आजवरच्या क्रिकेट इतिहासातला सर्वात हाय व्होल्टेज सामना म्हणून या फायनल कडे बघितलं जात होतं.

भारतासाठी तर ही मॅच प्रचंड महत्वाची होती. सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा वर्ल्ड कप असणार होता. २००३ ला हाता तोंडाशी आलेला घास आपण घालवला होता. कमीतकमी सचिन साठी का असेना हा वर्ल्ड कप आपल्याला जिंकायचा होता.

दर वेळी फायनल मध्ये कच खाण्याचा आपला इतिहास मोठा आहे, पण यावेळी फायनल आणि आपल्यामध्ये एकजण उभा होता.

कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनी.

गेल्या दोन तीन वर्षात धोनीने टीम चांगली उभी केली होती. तरुण व अनुभवी खेळाडूंच योग्य मिश्रण टीममध्ये होतं. समोरची श्रीलंकेची टीम देखील तगडी होती.

त्यांचा कप्तान कुमार संगकारा याच धोनीशी विशेष वैर होतं. दोघेही समवयीन. दोघेही विकेट किपर बॅट्समन. हा वर्ल्डकप जिंकून क्रिकेट विश्वाचा अनभिषिक्त सम्राट बनण्याचं स्वप्न दोघेही पाहत होते.

दोघांनीही आपआपली स्ट्रॅटेजी बनवली होती.

वानखेडे स्टेडियम समुद्रकिनाऱ्या जवळ आहे. संध्याकाळी तिथून सुसाट वारे वहात असतात. खेळपट्टी देखील बॅटिंग ला साथ देणारी होती. यामुळे शक्य तो टॉस जिंकणारा कप्तान पहिली बॅटिंग निवडणार यात शंका नव्हती.

धोनी आणि संगकारा आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या टॉस साठी मैदानात उतरले.

रवी शास्त्री अनाऊन्सर होता. सोबत मॅच रेफ्रि सुद्धा होते. मॅच सुरू व्हायला अजून थोडा वेळ असला तरी वानखेडे स्टेडियम खचाखच भरलं होतं. रवी शास्त्रीने खास या मॅच साठी बनवलेला कॉईन दाखवला.

या मॅचनंतर त्या कॉइनचा लिलाव होणार होता.

यजमान टीमचा कॅप्टन या नात्याने धोनीने टॉस उडवणार आणि संगकाराने छापाकाटा सांगणार ही जुनी पद्धतच या नाणेफेकीत अवलंबली जाणार होती.

त्याप्रमाणे धोनीने टॉस उडवला. पण लबाड संगकाराने एक टॉस जिंकायसाठी एक शक्कल लढवली.

तो हेड किंवा टेल्स म्हणण्याऐवजी तोंडातल्या तोंडात हेल्स असे पुटपुटला.

स्टेडियममध्ये प्रचंड मोठा गजर सुरू होता त्यामुळे संगकारा काय म्हणाला हे कोणालाही नेमके ऐकू गेले नाही.

टॉस मध्ये हेड्स चा कौल आला. संगकारा विजयी अविर्भावात रवी शास्त्रीशी बोलायला निघाला. पण त्याला धोनीने अडवले. त्याने संगकाराला थेट विचारलं की,

तू टेल्स म्हणाला होतास ना?

संगकारा मी हेड्स म्हणालो असच सांगत होता. बिचाऱ्या मॅच रेफ्री आणि अनाऊन्सर रवी शास्त्री यांना देखील स्टेडियममधल्या गोंधळामुळे नेमकं काय झालं हे ऐकू आला नव्हतं.

संगकाराला वाटलं की आपण जे करतोय ते खपून जाईल पण एरव्ही नम्र व शांत समजला जाणारा धोनी मात्र हा फालतूपणा सहन करण्याच्या मूडमध्ये नव्हता.

दोघांचे मोठे वाद होतील असं वाटत असतानाच रेफ्रीनी हस्तक्षेप केला आणि परत टॉस करायचं ठरलं.

परत टॉस झाला आणि यावेळी संगकारा खरोखर हेड्स म्हणाला. कॉइनदेखील हेड्सच पडलं. जग जिंकल्यासारखा चेहरा करून संगकाराने बॅटिंग निवडली.

भारताच्या दृष्टीने सुरवातच कमनशिबी ठरली होती. पण धोनी नेहमीप्रमाणे स्थितप्रज्ञ होता. या वादामुळे तो जराही विचलित झाला नाही.

काही झालंच नसल्याप्रमाणे त्याने टीमला मैदानात बोलावलं.

एका मुलाखती मध्ये झहीर खान सांगतो,

टॉस वेळी एवढं काय काय घडलं होत ते आम्हाला ठाऊकही नव्हतं. पहिली बॅटिंग असो नाही तर बॉलिंग ही मॅच जिंकायचीच या प्रेरणेने आम्ही उतरलो होतो.

आणि घडलंही तसंच. श्रीलंकेने 275 धावांचा डोंगर उभा केला. भारताची सुरवात फसली. सेहवाग दुसऱ्याच बॉल ला आउट झाला, सचिन देखील मोठी खेळी करू शकला नाही. २००३ सारखीच परिस्थिती होईल असं वाटत होतं.

पण गौतम गंभीरने केलेल्या जबरदस्त ९७ धावा व त्याला धोनीने दिलेली ९१ धावांची साथ यामुळे संगकाराच्या लंकन टीमकडून आपण वर्ल्ड कप अक्षरशः हिसकावून घेतला.

धोनीने मारलेला शेवटचा सिक्स हा अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभा करणारा ठरला.

कितीही वाईट कंडिशनमध्ये मॅच असू दे, कसलही प्रेशर असू दे, समोरचा कितीही ठग असू दे ही नवी भारतीय टीम प्रत्येकाला उत्तर देणारी आहे आणि म्हणून ती जगज्जेती आहे हे या मॅच मुळे सिद्ध झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.