सांगलीत गोंधळ दिल्लीत नजरा.

नाऱ्या नाऱ्या नाऱ्या !!!

कोळसेवाडीचे सरपंच बाजीराव डोळे आणि आमदार चंद्रकात टोपे यांचा माणूस असणारा नाऱ्या उर्फ नारायण वाघ इलेक्शनला उभा राहतो. सदैव मी तुमचाच आहे म्हणत दोघांना आपटतो आणि निवडून येतो. निवडून आल्यानंतर देवाला देलेला शब्द पाळतो. त्याने पांडुरंगाला सांगितलेलं असतय निवडून आलो की सोन्याची टोपी घालील. टोपी घालायची वेळ येते तेव्हा नारायण वाघ सोन्या नावाच्या पोराची टोपी देवाला घालतो.

पिक्चर संपतो. 

महाराष्ट्रातल्या ग्रामिण राजकारणाचे एकसे एक किस्से भरून वाहिलेला पिक्चर म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. गल्लीत गोंधळ मधला हा नारायण वाघचं वैशिष्ट राजकारणातलं टायमिंग. चूक की बरोबर या गोंधळात न पटता योग्य वेळ साधून डाव मांडण्यात नारायण वाघ हूशार. तस पहायला गेलं तर नारायण वाघ लोकांना निगेटिव्ह पात्र देखील वाटू शकतो. बोलणारे लोक याला संधीसाधू राजकारण देखील म्हणू शकतात तरिही लोक नारायण वाघला सपोर्ट करतात कारण नारायण वाघच्या गोंधळामुळे लोकांचा नुकसान होत नसतं. सरपंच बाजीराव डोळे आणि आमदार चंद्रकांत टोपे यांच्या राजकारणाला कंटाळलेले लोक सहज नारायण वाघसोबत जातात, कारण नारायण वाघ तुमच्या आमच्यासारखाच असतो. 

सध्या सांगलीच्या राजकारणात अशाच एका नारायण वाघची चर्चा सुरू आहे. वातावरणात आलेला जोर पाहून लोक खाजगीत का होईना शंका घ्यायला लागलेत, दोघांच्या भांडणात नारायण वाघ बाजी मारतोय वाटतं हि चर्चा जोर घ्यायला लागल्या.  

सांगली जिल्ह्याच्या राजकारणाबरोबर सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत असणारा हा नारायण वाघ म्हणजे, 

गोपीचंद पडळकर. 

सांगली जिल्हात पक्ष नसतो. नेते म्हणतात तोच पक्ष. नशीब इतकच की जून्या जाणत्या मंडळींनी कोणतातरी एकच पक्ष जपला. तरिही पक्षाहून आपला नेता खूप मोठा आहे हे धोरण सांगली जिल्ह्याने जपलं, ते वाढवलं. 

सांगली प्रमाणेच खानापूर मतदार संघातही अनेक गट आहेत. इथे पक्षांतर कुणालाच नवे नाही. मतदारसंघात खानापूर, आटपाडी व तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल हा भाग येतो. विटा नगरपालिकेवर पिढीजात काँग्रेसच्या पाटील घराण्याची सत्ता आहे. आटपाडी तालुक्यात जुने काँग्रेसचे व सद्या भाजपावासी झालेल्या देशमुखांचा एक गट, तानाजी पाटील यांचा आमदार बाबर यांना मानणारा एक गट व काँग्रेस निष्ठावंत भोसले याचा एक गट आहे. खानापूर तालुक्यात पूर्वीचे राष्ट्रवादी चे व सद्या शिवसेनेचे आमदार बाबर यांचा एक गट आहे.

आत्ता या खानापूर विधानसभेचा आमदार अशा मोजक्या गटांच्या भूमिकेवर ठरत असतो. 2009 सालचं सांगायच झालं तर कॉंग्रेसचे सदाशिव पाटील आणि राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असणारे अपक्ष अनिल बाबर यांच्यात मुख्य लढत झाली. तेव्हा आटपाडीचे देशमुख घराणे सदाशिव पाटील यांच्या सोबत होते. तेव्हा धनगर समाजातील एक नवखा तरुण निवडणुकीला उभा राहिला. त्याला 19 हजार मते मिळाली होती. तो तरुण म्हणजे हाच गोपीचंद पडळकर. 

2009 च्या या निवडणुकीत सदाशिव पाटील यांना 77 हजार 965 मते मिळाली होती. बाबर यांना 74 हजार 976 मते मिळाली होती. पडळकर तिसऱ्या क्रमांकावर होते. पडळकर उभा राहण्याचा फटका राष्ट्रवादीच्या अनिल बाबर यांना बसला आणि ते पराभूत झाले. सदाशिव पाटील गांधी टोपी वापरतात. तेव्हा मतदारसंघात चर्चा रंगली, 

“होता गोपी म्हणून वाचली टोपी”.

जाती आधारीत मतदान होवू शकतं पण त्यालाही एक मर्यादा असतात हे पडळकर यांच्या तेव्हाच लक्षात आलं असावं. मग त्यांनी दूध संघ सुरू करण्याचा प्रयत्न देखील करुन पाहीला, दुर्देवाने हा प्रयत्न अयशस्वी झाला. खानापूर आटपाडी हा दुष्काळग्रस्त भाग. या भागात शेतकऱ्यांच्या पोरांना कामाला लावण्यासाठी कस राजकारण करता येवू शकतं ते गोपीचंद पडळकरांनी पाहीलं. देशमुख, पाटील यांनी समाजावर केलेल्या अन्याया विरोधातील आक्रोश त्यांच्या भाषणातून व्यक्त होत असे. मध्येच मनसे उदयाला आली. तेंव्हा ते मनसेत जाणार अशा बातम्याही छापून येत. तेंव्हा ते महादेव जानकर यांच्या रासपमध्ये जिल्हाध्यक्ष झाले. नंतर त्यांचे जानकर यांच्याशी बिनसले. व त्यांनी स्वतः ची RSP काढली. त्याचे ते प्रदेशाध्यक्ष होते.

तेंव्हा विरोधी पक्षात असलेल्या विनोद तावडे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. विट्यात तावडेंच्या हस्ते गाडीप्रदान सोहळा घेण्यात आला होता. त्यात समाजाने लोकवर्गणी काढून पडळकर यांना गाडी भेट दिल्याचे सांगण्यात आले.

2012 ला स्वाभिमानी शेतकरी संघटना फॉर्म मध्ये होती. सदाभाऊ खोत व राजू शेट्टी सिंचन घोटाळा व दुष्काळ या विषयावर महाराष्ट्रभर फिरत होते. परिषदा घेत होते. तेंव्हा खानापूर तालुक्यात ही संघटना वाढवावी म्हणून राजू शेट्टी यांनी पडळकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत या म्हणून निमंत्रण दिले होते. निवडणुकीला “रिडालोस” सारखा प्रयत्न झाल्यास आपण सोबतच असू असे भाषण चांदोली ला स्वाभिमानी च्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात पडळकर यांनी ठोकले होते. पण पद्धतशीर पणे स्वाभिमानी जॉईन करण्याच्या विषयाला त्यांनी बगल दिली होती.

झेड. पी. ला अमरसिंह देशमुख यांच्या विरोधात ते लढले, पडले. नंतर त्यांनी भावाला झेड. पी. वर पाठवण्यासाठी देशमुखांशी जुळवून घेतले. 2014 ला भाजपाच्या तिकिटावर आमदारकी लढवली. त्यावेळी प्रचार करत असताना ते पाटील व बाबर यांच्यावर जहरी टिका करत. विट्यात महात्मा गांधी शाळेच्या मैदानावर सभा होत. आमदारकीच्या निवडणूकीवेळी ज्या मैदानावरून बाबर पाटील यांच्या वर टिका केली त्याच मैदानावर विटा नगरपालिका निवडणुकीवेळी बाबर यांना पाठिंबा दिला होता.

काही दिवसांनी खासदार संजय काका पाटील यांच्या सोबत मैत्री जाहीर केली. 2014 साली संजयकाका पाटील निवडून येण्यासाठी त्यांनी आपली तोफ डागली. आर.आर. पाटलांवर सर्वाधिक टिका कोणी केली असेल तर ते पडळकरच होते. 

आत्ता मात्र ते सांगली लोकसभेसाठी वंचित बहूजन आघाडीची उमेदवार आहेत. वंचित आघाडीकडून उमेदवारी घोषित होताच संघाच्या गणवेशातील त्यांचे फोटो महाराष्ट्र भर व्हायरल झाले. तेव्हा फॉटोशॉप सारखी वेळ मारून न देता त्यांनी  “हो, ते माझेच फोटो आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जेंव्हा पत्रकार तुमची भिडे गुरुजी यांच्या विषयीची भूमिका काय? असा प्रश्न विचारतात तेंव्हा ते जी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका तिच माझी भूमिका असे उत्तर देतात. संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही शब्द काढत नाहीत.

या टिपीकल नारायण वाघ स्टाईल भूमिका जाहीर करताना त्यांच एक वाक्य ठरलेलं असत ते म्हणजे, 

”परिवर्तन ही संसार का नियम है..!”

ते घराणेशाहीवर टिका करतात. पोरं टाळ्या वाजवातात, शिट्या मारतात पण झेड.पी. ची इलेक्शन लागली तेव्हा आपल्याच सख्ख्या भावाला पडळकर उभा करतात. अॅडजेस्टमेंन्ट करुन निवडून आणतात आणि सांगली जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती देखील करतात. इथे गंम्मत अशी असते की त्यांच्या या घराणेशाहीवर देखील त्यांच्याकडे उत्तर असत. विशेष म्हणजे लोक त्यांना प्रश्न विचारण्यासाठी जात देखील नाहीत. कारण त्यामध्ये कोणांच वाईट झाल्याची भावना नसते.

परिवर्तन ही संसार का नियम हैं या वाक्यात लोक सगळं काही अॅडजेस्टमेंट करुन पडळकरांना खांद्यावर घेतात. 

इतिहास सांगतो ते कधिही कुठेही असतात. पण पदरी काही ना काही पाडूनच तिथून उठतात. समोरचा किंग झाला तर ते किंगमेकर म्हणून घेतात. गरिब आणि वंचितांची लढाई लढतात लढता ते श्रीमंताचे देखील होतात. पण या प्रवासात आपल्यासोबत तेच समर्थक सोबत ठेवतात. आणि पुढे जातात.

आत्ताही दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या धोरणात त्यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. लोकही नेहमीप्रमाणे टाळ्या शिट्यांच्या गजरात त्यांना सपोर्ट करू लागलेत. संजय काका पाटील आणि भाजपवर टिका करणारे गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यावर टिका करण्याचे का टाळतात हे मात्र कोणीच विचारू शकत नाहीत. कारण निवडणुकीच्या मैदानात मुरलेला अस्सल नारायण वाघच प्रश्नांना दूर सारून लढाई जिंकू शकतो. पडळकरांकडे ते स्कील निश्चितच आहे. इतकं की उद्या ते खासदार झाले तर कॉंग्रेसच्या तंबूत दिसतील, भाजपच्या तंबूत दिसतील.

सत्तेत कोणिही आलं तर ते त्यांच्याकडून देखील जातील आणि पदरात काहीतरी पाडून घेतली, किंवा विरोधात राहून पुन्हा रान पेटवतील. दूसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर ते आपण किंगमेकर झाल्याचे सांगतील. आणि पुन्हा त्याच जोशात म्हणतील,

”परिवर्तन ही संसार का नियम है..!”

हे ही वाचा. 

2 Comments
  1. Madhukar says

    दादा किती ती लाचारी….???

  2. Bandgar maruti says

    Tumach pan kahi tham ekmat yamadhun disun yet nahi

Leave A Reply

Your email address will not be published.