सांगलीत उष्णतेची लाट : “शिवसुर्यजाळ” तेजीत…
चलो सांगली ! चलो सांगली !! चलो सांगली !!!
सांगलीला येण्याचे आदेश धारकऱ्यांना पोहच झाल्यानंतर सांगलीच्या वातावरणातं आत्ता चांगलाच रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दिनांक २८ तारखेला भिडे गुरूजींच्या संभाव्य अटकेच्या विरोधात सांगलीत मोर्चाचे नियोजन करण्यात आलेलं असून त्याची टॅगलाईन “दडपलेलं सत्य बाहेर आणण्यासाठी” अशाप्रकारे कॅची ठेवून क्रियेटिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सदरच्या मोर्चाचं आयोजन बुधवारी दिनांक २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता करण्यात आलं असून उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात शिवसुर्यजाळ निघणार असल्याने वातावरणाने उष्णतेच्या कडा ओलांडल्या असून पुरागामी व्यक्तींकडून सदरच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पाहूया मोर्चातील प्रमुख मागण्या –
- आदरणीय गुरूवर्य संभाजीराव वि. भिडे गुरूजी यांच्यावरील तथाकथित गुन्हे सरकारने तात्काळ मागे घ्यावेत व या सर्व खोट्यानाट्या आरोपातून सरकारने सन्मानपुर्वक मुक्तता करावी.
- पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीवाद्यांवर कडक कारवाई करावी.
- दि. ३ जानेवारी २०१८ च्या दंग्यात बंद पुकारणाऱ्याकडूनच झालेली नुकसान भरपाई.
(सदरचे वाक्य पुर्ण करण्यात आले नसल्याने नेमकं या मागणीचं काय करायचं यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बुद्धीचा कस लागणार आहेत अशी प्रतिक्रिया विचारवंत देत आहेत).
सदरील मोर्चा राजमती भवन या ठिकाणाहून नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार असून जूने जिल्हाधिकारी कार्यालय सेम उलट्या दिशेने गेल्यास लागते परिणामी अंतिम क्षणी मोर्चामध्ये कन्फ्यूजन निर्माण होवू नये याची काळजी गुगलमार्फत घेतील जात आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हाजिल्ह्यात गुरूवर्य अशी टॅगलाईन वापरून जाहिरात केली जात असून तब्बल ३२ फूट उंचीचे डिजीटल लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर दूचाकी गाड्यांवर स्टिकर लावून वातावरण निर्मातीने जोर धरलां आहे.
गावागावतील मुले देखील भिडे गुरूजी के सन्मान मैं हिंदू समाज मैदान में असा हिंदी भाषेत संवाद साधत असल्यानं उत्सुकतेचा विषय ठरत आहेत.
थोडक्यात मोर्चाने वातावरणात लय जोरायराव वातावरण निर्माण केलं असून मोर्चातील मागण्या मान्य होतील का आणि मुळात त्या जिल्हाधिकाऱ्यांना समजतील अशा भाषेत त्या मागण्या पोहचल्या जातील का ? हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. या दरम्यानं गिरीष महाजन यांनी आण्णा हजारेंशी चर्चा केली आहे हा देखील राज्यात क्रमांक दोनचा चर्चेचा विषय ठरत असल्यास दिसून येत आहे.