सांगलीच्या पाटलाने इंग्लंडमध्ये महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील ऊसपट्टा म्हणजे राजकारणाचे माहेरघर. इथल्या सोसायटीच्या निवडणूका सुद्धा तुफान चुरशीच्या होतात. अशा निवडणुका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पण होत नसतील.

साखरेचं बाळकडू पिऊन आलेली इथली माणस जगात कुठेही जावोत राजकारणात कधी मागे पडत नाहीत.

असेच सांगली जिल्ह्यातील पाटील इंग्लंडमधल्या गावचे महापौर बनले होते.

सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात कवलापूर नावाचे गाव आहे. बारा बलुतेदारांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात पहिलवाना पासून ते काळूबाळूच्या तमाशापर्यंतची परंपरा मोठी आहे.

याच लहानशा खेडेगावात माधवराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण देखील याच मातीत झालं. कायद्याची डिग्री मिळवली. पुढचं उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांना लंडनला जायची इच्छा होती.

पण घरची परिस्थिती त्यांना शिकायला परदेशी पाठवाव इतकी मोठी नव्हती.

पण गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी काढली आणि या होतकरू तरुणाला लंडनला पाठवलं.

१९६२ साली ते इंग्लंडला गेले. तिथे एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवलं. पण पैशाचा प्रश्न सुटणारा नव्हता.

आपला खर्च भागावा म्हणून हेल्पर, क्लिनर, वेटर, चामड्याच्या कारखान्यात रोजंदारी अशी पडतील ती कामं त्यांनी केली. याच दरम्यान एक वर्ष दुर्धर आजारपणही झेललं.

पण या मराठी गड्याने जिद्द सोडली नाही.

जगप्रसिद्ध विद्यापीठातून कामगार कायद्याची पदवी मिळवली. दरम्यान त्यांना इंग्लंडच नागरिकत्व देखील मिळालं. पण लग्न मात्र त्यांनी एका मराठी मुलीशीच केलं, लंडनमधल्या साऊथहॉलमध्ये त्यांनी संसार थाटला.

वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर आर पाटील, जयंत पाटील यांचा वारसा सांगणाऱ्या सांगलीच्या माणसांना विशेषतः पाटलांना राजकारण आणि समाजकारण सोडवत नाही. तसंच झालं, माधवराव पाटील तिथल्या राजकारणाकडे ओढले गेले.

१९८० साली तिथल्या लेबर पार्टी मध्ये माधवरावांनी सदस्यत्व स्वीकारलं.

कामगार कायदे आणि वर्ण द्वेषाच्या समस्या या क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं. काही वर्षातच ते लंडनमधल्या बॅरो ऑफ इलिंग लंडन मिडलसेक्स येथे नगरसेवक म्हणून निवडून आले.

तिथून सलग २० वर्षे ते लोकप्रिय नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यातून १९९५-९६ मध्ये त्यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. फक्त मराठी माणसांच्या नाही तर खतरुड समजल्या जाणाऱ्या इंग्रज मतदारांच्या मतांवर त्यांनी विजय मिळवला.

बिडवेल व जिल अशा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातल्या गोऱ्या उमेदवारांना त्यांनी सहज हरवलं होत.

२१ मे १९९६ रोजी माधवराव इलिंगच्या महापौरपदी निवडले गेले.

ही एक क्रांतिकारी घटना होती. ज्या भारताला गुलाम बनवून इंग्रजांनी रेटायचा प्रयत्न केला होता त्याच इंग्रजांच्या एका शहरात एक मर्द मराठा गडी महापौर बनला होता.

माधवराव पाटलांसारख्या मोजक्यांनी धाडस केलं आणि इंग्लंडमध्ये भारतीय देखील राजकारणात यशस्वी होऊ शकतात हे सिद्ध केलं. अनेक भारतीय आज इंग्लिश पार्लमेंटमध्ये आवाज बुलंद करताना दिसतात.

सध्या इंग्लंडचे अर्थ मंत्री असलेले व इन्फोसिसच्या नारायणमूर्ती यांचे जावई असलेले ऋषी सनक, गृहमंत्री प्रीती पटेल तर आंतरराष्ट्रीय विकास मंत्री आलोक शर्मा असे भारतीय चेहरे तिथल्या मंत्रिमंडळात हा वारसा जपत आहेत.

२००५ साली माधवराव पाटलांनी राजकारण संन्यास घेतला.

‘ब्लेअर पिच’ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात कार्यरत राहिले. ‘इलिंग लिगल सेण्टर’ या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्याचं काम देखील त्यांनी केलं.

२०१२ सालच्या स्वातंत्र्यदिनादिवशी त्यांचा इंग्लंडमधील भारतीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.

२९ मार्च २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर इलिंग महानगरपालिकेत दुखवटा पाळण्यात आला होता.

सांगलीच्या पाटलांनी गल्ली पासून दिल्ली गाजवली अस म्हणतात पण लंडन गाजवणाऱ्या माधवराव पाटलांचा नाव कुठे तरी विस्मृतीत गडप झालं आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.