दादा घराण्याचं कुठं बिनसलं ?

24 मार्चचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला. वसंतदादांच्या समाधीस्थळावरून दादांचे नातू विशाल पाटलांनी मी लढणार. कॉंग्रेसचा उमेदवार मीच असेल हे डिक्लेर केलं. हे सांगताना कधी काळी राज्याची तिकीट याच घरातून ठरवली जायची हे सांगायला देखील विशाल पाटील विसरले नाहीत.

दूसरीकडे प्रतिक पाटील या वसंतदादांच्या दूसऱ्या नातवांनी राजकीय संन्यास घेण्याची औपचारिकता पुर्ण केली. एकाने राजकीय संन्यास घेण्याचा आणि दूसऱ्याने लढत राहण्याचा निर्णय सांगून आपआपले सोपस्कार पुर्ण केले.

वसंतदादा महाराष्ट्राच्या राजकारणातले पहिले “दादा” होते. 

वसंतदादांनी ब्रिटीश सत्तेला घाम फोडला होता. जीवाची पर्वा न करता सांगलीचा जेल फोडून फरार झालेले क्रांन्तीकारक होते. दादा चौथी शिकलेले होते. पण व्यवहार दादांना जमायचा. त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील खुर्च्या टाकून भावाभावातले वाद मिटवायला खास दादांना बोलवलं जायचं. दादांचा शब्द हा दूसऱ्यांच्या घरात देखील अंतीम असायचा. याच वसंतदादांनी पाडापाडीच राजकारण देखील केलं हे देखील नाकारून चालणार नाही. राजारामबापू पाटील असोत दिनकर पाटील असोत की रत्नाप्पा कुंभार असोत.

जिरवाजिरवीचं राजकारण त्यांनी केलं पण ते त्याचं ताकदीने हाताळलं. इतकच नाही तर दादांचा राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय देखील पुढे त्यांना मुख्यमंत्री करून गेला. थोडक्यात राजकारणाच स्कील तर दादांकडे होतच पण सोबत टायमिंग साधण्याच स्किल देखील त्यांनी पुरेपुरं जपलं होतं.

पण शेवटच्या काळात घरातलं बंड ते शमवू शकले नाही.

शालिनीताई पाटलांच्या स्वरुपात घरातलं वादळ बाहेर पडलं. सांगणारे तर असही सांगतात की दादांचा या प्रकरणाचा खूप त्रास झाला. दादांच्या हयातीत म्हणजे 1984 ला प्रकाशबापू पहिल्यांदा खासदार झाले. दादा गेले आणि प्रकाशबापू हे समीकरण सांगली लोकसभेसाठी कायमच झालं. अपवाद म्हणायला मधल्या 1996-98 ला प्रकाशबापूंचे पुतणे मदन पाटील खासदार झाले होते पण पुन्हा प्रकाशबापू हेच खासदार राहिले. ते अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त.

या दरम्यान राजकारण काय होतं, तर प्रकाशबापू हे वसंतदादांच्या तुलनेत कमकुवत नेतृत्व होते. याच काळात जिल्ह्याच्या राजकारणा तीन व्यक्तिमत्व “नेते” होत होते. ते तिघं म्हणजे दादांचे शिष्य आर.आर. पाटील व पतंगराव कदम आणि जयंत पाटील.

आर.आर.आबा दादा घराण्याच्या उपकारांची जाणीव ठेवून प्रकाशबापूंना साथ देत होते. पतंगरावांना खासदारकीत रस नसल्याने, दादा घराण्यासोबत लोकांची जोडली गेलेली भावनिकता समजून आणि थंडा करकें खावो या टिपिकल कॉंग्रेसच्या मानसिकतेतून खासदारकीसाठी प्रकाशबापूंना साथ देण्याच काम करत होते. आणि जयंत पाटील योग्य संधीची वाट पहात आपले हातपाय पसरवत होते.

दादा घराण्याच्या पडझडीचा काळ सुरू झाला तो प्रकाशबापूंच्या उतरार्धात.

प्रकाशबापू पाटील शेवटची लढाई झोपून लढले. तब्येतीमुळे ते प्रचार देखील करु शकले नाहीत. या निवडणुकीत देखील दादांसाठी म्हणून प्रकाशबापूंना लोकांनी नेहमीसारखं निवडून दिलं. या काळात घरातूनच बंडखोरीस खरी सुरवात झाली. प्रकाशबापूंच्या पत्नी शैलजाभाभींनी सहकारी संस्थांचा कारभार आपल्या हाती घेतला. प्रतिक पाटील आणि शैलजा भाभींनी एकएक करत सर्व संस्था ताब्यात घेतल्या खऱ्या पण राजकीय असंमजपणामुळे त्या बुडवण्याकडेच त्यांचा कल राहिला.

या दरम्यान प्रकाशबापू आजारी असत तर कारभार शैलजाभाभी आणि प्रतिक पाटील संभाळत. गावोगावी असणाऱ्या संलग्न संस्थामधून फक्त नफा गोळा करणे आणि सभासदांनी घरी येवून त्यांच्या सह्या घेणं हे राजकारण सुरू झालं. याचा गोष्टीचा सर्वात जास्त फटका बसला तो दादागटाला.

दादा गटाकडून एकएक आर्थिक नाड्या गेल्या आणि हा गट ठिकठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाकडे सरकला. 

ऑक्टोंबर २००५ ला प्रकाशबापूंचे निधन झाले आणि पहिल्यांदा दादा घराण्यातील राजकारण बाहेर पडू लागलं. विश्वजीत कदमांच्या भविष्याचा विचार करुन सुरवातीच्या काळात पप्पू म्हणून ओळखले जाणारे प्रतिक पाटील यांना कदम गटाकडून पाठिंबा करण्यात आलं. कारण एकच की पप्पूचा पराभव होईल आणि भविष्यात हि जागा दादा घराण्याच्या बाहेर जाईल.

शैलजाभाभींनी स्वत: राजकारणात इंटरेस्टेड असून देखील नाईलाज म्हणून त्यांनी प्रतिक पाटलांच्या गळ्यात माळ टाकली. प्रकाशबापूंचे जेष्ठ चिरंजीव प्रतिक पाटील हे निवडून आले. पुन्हा दादा घराण्यावर लोकांची असणारी निष्ठा सिद्ध झाली आणि लोकांना गृहित धरण्याची हि मानसिकताच दादा घराणे बुडवण्यासाठी कारणीभूत ठरली.

या दरम्यान विशाल पाटलांनी संस्थाचा कारभार हाती घेतला. खासदारकी तुमच्याकडे असेल तर संस्था माझ्याकडे असतील हा अलिखित नियम घरातच तयार झाला. विशाल पाटलांनी बुडीत गेलेल्या संस्था वर काढण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यन्त बराचसा वेळ गेला होता.

या दरम्यान प्रतिक पाटलांच्या निष्क्रियतेमुळे कॉंग्रेस म्हणजे कदम गट हे समीकरण दृढ झालं.

कदमांनी 2009 च्या इलेक्शनमध्ये विश्वजीत कदमांचा पत्ता टाकून पाहिला पण हायकमांडचा दादा घराण्यावर असणारा विश्वास म्हणून पुन्हा प्रतिक पाटलांनाच उमेदवारी देण्यात आली. या लढाईत कॉंग्रेसचे बंडखोर म्हणून अजित घोरपडे यांनी लढाई लढली. अजित घोरपडे यांचा 39 हजारांनी पराभव झाला. फक्त 39 हजारांनी प्रतिक पाटलांच्या झालेल्या विजयाने देखील प्रतिक पाटील शहाणे झाले नाहीत हे दुर्देव होतं.

2009 ते 2014 दरम्यान काय झालं तर विशाल पाटील संस्थांचा कारभार पाहण्यात मश्गुल झाले. प्रतिक पाटील आपल्या प्रभाव नसलेल्या राज्यमंत्रीपदाची धुरा संभाळू लागले तर जयंत पाटील महानगरपालिकेच्या निमित्ताने सांगलीची महानगरपालिका ताब्यात घेवून दादा घराण्याला थेट आव्हान देण्याच काम केलं. सांगलीतल्या राजकारणात जयंत पाटील, आर.आरआबा आणि पतंगराव फिक्स झाले, तर राज्यमंत्री असणारे प्रतिक पाटील लिंबूटिंबू ठरले, विशाल पाटील दादा घराण्याच्या बुडलेल्या संस्था संभाळण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागले.

2014 ला मोदी लाट आली आणि दादा घराण्यावरचा विश्वास खूप झाला म्हणून लोकांनी संजय पाटलांना साथ देण्यास सुरवात केली. प्रतिक पाटील शहाणे होवून प्रचाराच्या काळात इस्लामपूरला जावून जयंत पाटलांची भेट घेवून आले. पण तोपर्यन्त खूप वेळ झाला होता. पतंगरावांनी आपले चिरंजीव विश्वजीत कदमांना पुण्यातून उभा केलं असलं पलूस-कडेगावची संपुर्ण रसद पुण्याच्या कामात लागली.

प्रतिक पाटील गेले तरी तोटा नाही उलटपक्षी झाला तर फायदा होईल हे पतंगरावांना समजलं होतं. नाही म्हणायला आर.आर. आबांनी दादा घराण्याच कट्टर समर्थन तसेच कायम ठेवले, पण या समर्थनात प्रतिक पाटलांपेक्षा संजय काकांचा विरोध अधिक लपलेला होता. आर.आर. आबा प्रतिक पाटलांचा प्रचार करत फिरायचे आणि प्रतिक पाटील प्रचारफेऱ्यांनाच अनुपस्थित रहायचे. एकंतरी खासदारकीचा मृत्यू दारात असताना देखील प्रतिक पाटलांनी निवांत कारभारच केला.

मोदी लाट आली आणि प्रतिक पाटील वाहून बंगलोरपर्यन्त गेले. 2014 नंतर ते कुठेच दिसले नाहीत. संपुन गेलेलं राजकारण पाहण्याच देखील त्यांनी कष्ट घेतलं नाही. इकडे आमदारकीच्या पराभवातून मदन पाटील सावरले नाहीत आणि 2015 साली अल्पशा आजाराने त्यांच निधन झालं.

प्रतिक, विशाल, शैलजाभाभी या गटात वसंतदादांचे पुतणे विष्णुआण्णा यांनी स्वत:चा वेगळा गट तयार केला होता.

त्यांचे चिरंजीव मदन पाटलांनी देखील हा गट जपला. पण या दोन गटांनी एकमेकांच्या जिरवाजिरवीच म्हणावं तितकं टोकाचं राजकारण केलं नाही. मदन पाटलांच्या पश्चात त्यांच्या मुलीचा विवाह जितेश कदम यांच्यासोबत झाला. जितेश कदम हे मोहन कदम यांचे नातू. दादा घराण्याचा सुरवातीलाच फुटलेल्या हा गट कदम गटासोबत नातेसंबधात पडला आणि एकटे पडलेले प्रतिक पाटील अजून एकटे पडले. तसेही त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचं धोरण आखलच होतं.

दरम्यान विशाल पाटील संस्थामार्फत कारभार संभाळू लागले. आत्ता सांगली टिकवायची तर भाजप सोबत आपल्या घरात संघर्ष अटळ आहे हे माहित होतं. यात प्रतिक पाटलांनी शेवटच्या काळात घेतलेला शहाणपणाचा निर्णय म्हणजे राजकीय संन्यास. या निर्णयामुळे अखेरच्या क्षणी का होईना पप्पू पास झाले. जयश्री पाटील यांनी गाडगीळांच्या विरोधात उभा सांगलीतून उभा राहण्याची तयारी केली आणि विशाल पाटलांना आत्ता फक्त लोकसभा हा एकमेव पर्याय दिसू लागला. 

इकडे कदम गट आणि विशाल पाटील यांचा दादा गट एकमेकांना भिडू लागला. इतका की मला नाही तूला नाही म्हणून जनता पक्षाच्या वाऱ्यात देखील टिकून राहिलेली हि लोकसभा स्वाभिमानीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान विशाल पाटील इतक्या वर्ष दादा घराण्यात असून देखील आऊटसायडर म्हणून राहिले होते. कालच्या एका सभेमुळे विशाल पाटील “दादा घराण्याच्या” केंद्रबिंदूवर आले. पण आज एकही संस्था फायद्यात नाही की दादांच्या नावाने नॉस्टेलजिक होण्यापलीकडे निवडून येण्यासाठी विशेष रसद नाही.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.