सांगलीच्या फेमस इंजिनियरिंग कॉलेजची निर्मिती वालचंद यांनी नाही तर धोंडूमामा यांनी केलीय..

सांगलीचे वालचंद इंजिनियरिंग कॉलेज. सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंगचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज म्हणजे आयआयटीचं. पूर्वी या सगळ्या भागात मिळून हे एकच अभियांत्रिकी कॉलेज होतं. आजही वालचंदचा विद्यार्थी म्हणून सांगताना अनेक इंजिनियर्सची कॉलर अभिमानाने ताठ होते.

पण जरी या कॉलेजला नाव महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध उद्योजक वालचंद हिराचंद यांचे दिले असले तरी त्याची स्थापना मात्र पुण्याच्या धोंडूमामा साठे यांनी केली होती.

धोंडो कृष्णाजी साठे यांचा जन्म पुण्याच्या  एका सधन कुटुंबात झाला. स्वातंत्र्यापूर्वीचा इंग्रजी सत्तेचा हा काळ. धोंडूमामा लहानपणापासून हुशार होते. तालमीत जाऊन तब्येत चांगली कमावली होती. घरच्यांची इच्छा होती धोंडूमामा यांनी भरपूर शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी बनावे.

उच्चशिक्षणासाठी त्यांची रवानगी लंडनला करण्यात आली. आयसीएस अधिकारी बनायचं म्हणून धोंडूमामा जिद्दीने तयारीला लागले. त्यांचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला होता आणि अचानक एक दुर्दैवी बातमी आली. पुण्यात अचानक जेष्ठ भावाचे निधन झाले होते. साठे कुटुंबावर हा मोठा आघात होता. धोंडुमामांचे हे बंधू घरातले कर्ते होते. सगळे व्यवसाय आणि कारभार त्यांच्या हातात होता.

या संकटातून घरच्यांना सावरण्यासाठी धोंडूमामा आपला कोर्स अर्धवट सोडून भारतात परत आले.

पुण्यातला स्टील हार्डवेअरचा मोठा उद्योग त्यांनी सुरु केला. याशिवाय बांधकाम व्यवसायात उतरले. आपली मेहनत आणि सचोटीमुळे थोड्याच दिवसात मोठं नाव कमावलं. पुण्यात न्यायमुर्ती महादेवराव रानडे होमिओपॅथिक हॉस्पिटल, सर परशुरामभाऊ कॉलेज, न्यु. इंग्लिश स्कूल या सुप्रसिद्ध इमारती त्यांच्या काँट्रॅक्ट खाली तयार झाल्या. फक्त पुण्यातच नाही तर मुंबई मध्ये देखील त्यांनी अनेक बिल्डिंग उभारल्या. यात सुप्रसिद्ध रामनारायण रुईया महाविद्यालय, आर्यन एज्युकेशन सोसायटी हायस्कुल, जणी बिल्डिंग यांचा समावेश आहे.  

धोंडूमामा फक्त आपल्या व्यवसायात व्यस्त होते असं नाही तर त्यांनी पुण्यामध्ये समाजकार्यातही भाग घेतला. ते म्युनिसीपल कौन्सिलचे सदस्यही होते. महाराष्ट्र बँकेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. हे सगळं सुरु असताना इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याला देखील त्यांचे योगदान होते.

 असं म्हणतात की हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतल्याबद्दल त्यांना निजामशाहीच्या कारावासातही काही काळ व्यतीत करावा लागला होता.

१९४२ च्या चलेजाव आंदोलनानंतर जेव्हा स्वतंत्र भारताच्या निर्मितीचे वारे वाहू लागले तेव्हा सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

राष्ट्रवादी विचारांचे धोंडूमामा देखील आता स्वातंत्र्य मिळणार म्हणून भारावून गेले होते. मात्र स्वतः उद्योजक असल्यामुळे त्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. आपला देश स्वतंत्र तर होईल मात्र त्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तितका सक्षम आहे का? देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी तितके उद्योग धंदे हवेत आणि त्यासाठी दर्जेदार शिक्षण घेतलेले मनुष्यबळ पाहिजे.

यातूनच त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण पुण्यात एक इंजिनियरिंग कॉलेज सुरु करायचे.

पुण्यात आपल्या काही मित्रांना व प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञांना त्यांनी हि कल्पना बोलून दाखवली. तेव्हा त्यांचे एक मित्र शंकर रामचंद्र भागवत हे पुणे नगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर होते. डेक्कन जिमखाना वसाहत त्यांच्या आराखड्याप्रमाणे वसवले आहे. ते धोंडूमामा यांना म्हणाले,

“खेडेगांवांतील अनेकविध सुधारणा करण्याकरितां रूरल इंजिनिअरिंग सारखें शिक्षण देणारी संस्था असावयास पाहिजे. तशीं काही योजना असली तर माझा उपयोग होऊ शकेल. पण पुण्यात एक इंजिनियरिंग कॉलेज असताना या शहरातच आणखी एक कॉलेज काढण्याची कल्पना मला तितकीशी पसंत नाही. “

धोंडूमामा निराश झाले. मात्र त्यांचे इतर काही मित्र कॉलेज काढा म्हणून प्रोत्साहन ही देत होते. कॉलेज सुरु झालं तर आम्ही शिक्षक म्हणून येतो असं काही निवृत्त प्राध्यापकांनी आश्वासन देखील दिलं होतं. अनेकांनी या संस्थेच्या निर्मितीसाठी देणगी द्यायला देखील सुरवात केली.

काय करावे या द्विधा मनस्थितीमध्ये धोंडूमामा यांनी मुंबई विद्यापीठाकडे अर्ज केला. तो अर्ज मंजूर देखील झाला. धोंडूमामा जेव्हा तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना भेटले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, पुण्यात जर इंजिनियरिंग कॉलेज सुरु करणार असाल तर सरकारची कोणतीही मदत मिळणार नाही.

मुख्यमंत्र्यानीच त्यांना दक्षिणेत कर्नाटक सीमेजवळ ग्रामीण भागात कॉलेज सुरु करण्याचा सल्ला दिला.

त्यांच्या सल्ल्यानुसार धोंडूमामा सांगलीला आले. इथल्या पटवर्धन राजेसाहेबांनी इंजिनियरिंग कॉलेज स्थापनेच्या कल्पनेला उचलून धरले. स्वतः या संस्थेसाठी १ लाखाची देणगी दिली. कुंटे नावाच्या इंजिनियरनी त्यांना आपली विश्रामबाग येथील जमीन दिली. सोबतच धोंडूमामा यांनी जवळपासची १५० एकर जागा खरेदी केली.

कराचीच्या अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य जी. एन. गोखले या कॉलेजची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले. वरून त्यांनी सांगितलं होतं,

मी एकटाच येऊन सांगलीला राहीन, माझ्या राहण्याचा व जेवणाचा जेवढा खर्च होईल तेवढाच पगार मला दिला तरी चालेल.

विश्रामबागच्या विलिंग्डन कॉलेजच्या जवळच पटवर्धन राणीसाहेबांच्या हस्ते सांगलीच्या अभियांत्रिकी कॉलेजचा पहिला दगड रोवला गेला. धोंडूमामा साठे यांनी दोन वर्ष या ओसाड भागात स्वतः वास्तव्य करून रचलेल्या प्रत्येक विटेवर लक्ष ठेवले.

phoca thumb l walchandmemories 1

महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत सुरु झालेल्या या कॉलेजला नाव देण्यात आले,

“न्यू इंजिनीरिंग कॉलेज सांगली”

२९ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतः मुख्यमंत्री कॉलेजच्या उद्घाटनाला आले. तत्पूर्वी त्यांनी राज्यसरकार तर्फे दोन लाखाची मदत धोंडूमामा यांच्या कडे पाठवून दिली होती. खेर यांनी आपल्या भाषणात सांगितले,

“सरकारी कॉलेज काढण्याचे प्रयत्नास एक दोन वर्षे अवधिही लागला असता व त्याच्या खर्चाची एस्टिमेट्स तीस लाखांहून सत्तर लाखांवर न्यावी लागली असती ! तुम्ही हे कॉलेज २५ लाख रूपयांत उभे करण्याची महत्वाकांक्षा बाळगतां हे विशेष. “

आजवरची सर्व इंजिनियरिंग कॉलेज इंग्रजांची देणं होती पण एका मराठी माणसाने सुरु केलेले हे कॉलेज सर्वांच्या कौतुकाचा भाग बनले होते.

फक्त महाराष्ट्रातले नाही तर संबंध भारतातले हे पहिले खाजगी इंजिनीरिंग कॉलेज ठरले. 

सिव्हिल इंजिनियरिंगच्या कोर्सने कॉलेजची सुरवात झाली. पहिल्या बॅचमध्ये फक्त साठ विद्यार्थी होते. पुणे विद्यापीठाची स्थापना १९४९ च्या सुमारास झाली. या विद्यापीठाकडून धोंडोमामांनी १८० विद्यार्थी घेण्याची परवानगी मिळवली.

सांगली कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधीचे नवे दालन खुले झाले. इंजिनीरिंग शिकण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज संपली. आपल्या भागात शिकून आपल्या गावातच काम करता येऊ लागलं.

१८० विद्यार्थ्यांचे कॉलेज १९५१ ते १९५४ पर्यंत चालू होते, पण सरकारी ग्रँट नव्हती. बाकी सगळ्याचं सोंग आणता येते मात्र पैशांचं सोंग वठवता येत नाही. वाढलेला इंजिनियरिंग कॉलेजचा पसारा आणि शिक्षकांचे पगार देणे संस्थेला झेपेनासे झाले. कर्जाचा डोंगर वाढू लागला होता.

अखेर सोलापूरच्या वालचंद हिराचंद यांचा ट्रस्ट मदतीला आला. त्यांनी पाच लाखांची तातडीची मदत केली.

त्यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाचे नाव बदलून ‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ असे ठेवण्यात आले.

1519801446497

पुढे राज्य सरकारने आठ लाख व केंद्र सरकारने बारा लाख मदत दिली. त्यामुळे त्यांचेही नियंत्रण महाविद्यालयावर आले. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नियामक मंडळाची स्थापना झाली, या नियामक मंडळाने सिव्हिल बरोबर मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल कोर्सेस सुरू केले.

त्याचबरोबर डिप्लोमाचेही सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल कोर्सेस सुरू केले. नव्या युगातील नव्या बदलाप्रमाणे कॉम्युटर, टेलिकम्युनिकेशन यांच्याही शाखा सुरु करण्यात आल्या.  धोंडूमामा साठे यांच्या जिद्दीने लावलेले इवलेसे रोप गगनाला जाऊन भिडले.

आज वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी देशात व परदेशात आपल्या बुद्धिमत्तेने व गुणवत्तेने महाविद्यालयाची किर्ती पसरवीत आहेत.  देशातील सर्वोत्तम इंजिनियर कॉलेजची यादी काढली तर त्यात वालचंदचे नाव हमखास येईल.

पण फक्त एक चांगले कॉलेज म्हणून नाही तर सांगली कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक उद्योगधंदे उभे राहू शकले, आज सगळीकडे डोळे दिपवणारा विकास जो दिसतो त्याच्या पायाभरणीची सुरवात करणारे अभियांत्रिकी कॉलेज म्हणून वालचंद कॉलेजचे महत्व आजही अबाधित आहे.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Kalash bhagwat says

    Nice !
    I’m from walchand 2nd yr mechanical

  2. Nandkishor toshniwal says

    I have stayed and studied there… history of this college is not correctly naratted… it started in hut..by dedicated refugee maharashtrian engineering professors from Pakistan… supported by Raje of Sangli

  3. Pragati Rote says

    Purvichya kali he college nakkich changle hote pn 2010 nantar wadhtya politics mule hychi khyati kami zali. Ata fakt computer enginnering sathi nav ahe. Mechanical, civil chya shikshakani aplya ego payi titki pragati houn dili nahi. Ani IIT shi tulana karne saaf chukiche ahe. IIT and wce mdhe 60-70 colleges yetat.

Leave A Reply

Your email address will not be published.