मराठीतला सगळ्यात सुपरहिट सिनेमा मुद्दामहून अमावस्येच्या दिवशी रिलीज केला होता.

आपण खूप वेळा ऐकतो की बॉलीवुड मधले मोठे निर्माते एका विशिष्ट शुभमुहूर्तावर सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात करतात. किंवा अमुक एका सणाच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करतात.

उदाहरणार्थ सलमान खानचे सिनेमे दरवर्षी ईदला प्रदर्शित होतात. शाहरुखचे सिनेमे दिवाळीला तर आमिर खानचा आवडता सण म्हणजे नाताळ. शक्यतो दरवर्षी डिसेंबरमध्ये आमिर खानचा एखादा सिनेमा प्रदर्शित होतो.

त्यामुळे मुहूर्त बघून एका चांगल्या दिवशी किंवा एका विशिष्ट महिन्यात सिनेमा प्रदर्शित करायचा, हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे.

या सगळ्यांचा विचार केल्यास कदाचित अंधश्रद्धा वाटू सुद्धा शकते.

पण एखादी नवी गाडी जशी दसरा, दिवाळी या सणांच्या दिवशी खरेदी करतो, तितकी ही गोष्ट साधी सुधी आहे. त्यामुळे या गोष्टीचा उगाच तात्विक आणि खोल विचार करू नये.

एखाद्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्याची उदाहरणं जशी हिंदी इंडस्ट्रीत पाहायला मिळतात तसं मराठी इंडस्ट्रीत सुद्धा आढळून येतं. दोन – तीन वर्ष मागे डोकावल्यास लक्षात येतं की, सुबोध भावेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘कट्यार काळजात घुसली’ हा त्याचा सिनेमा प्रदर्शित केला होता.

मुळात सणांच्या दिवशी सिनेमे प्रदर्शित करण्यामागे काही व्यावसायिक गणितं सुद्धा असतात.

दिवाळी किंवा गणपती या उत्सवांच्या दिवशी लोकांचं ऑफिस बंद असतं. मुलांना सुद्धा शाळेला सट्टी असते. अशावेळेस सिनेमा प्रदर्शित करण्याची खूप चढाओढ पाहायला मिळते. कारण सलग सुट्यांमुळे प्रेक्षक सिनेमा पाहण्याचा आनंद सहकुटुंब घेऊ शकतात. यामुळे सिनेमाला सुद्धा आर्थिक फायदा होतो.

आत्ता भिडूंनो , अमावस्या ही कायम अशुभ मानली जाते. या दिवशी कोणतीही खरेदी शक्यतो आपण करत नाही.

एवढंच काय, मोठ्या माणसांच्या सांगण्यावरून रात्री – अपरात्री सुद्धा कुठे बाहेर पडत नाही. पण एक मराठी सिनेमा अमावस्येच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि त्या सिनेमाने १३१ आठवडे सिनेमागृहात स्वतःचा सुपरहिट मुक्काम ठोकला.

हा सिनेमा म्हणजे ‘सांगत्ये ऐका’.

१९५९ साल. मराठीत तमाशाप्रधान सिनेमांची चलती होती. याकाळात मराठीमध्ये अनंत माने एक उत्तम तमाशाप्रधान सिनेमा बनवत होते त्या सिनेमाचं नाव ‘सांगत्ये ऐका’.

जयश्री गडकर, चंद्रकांत, हंसा वाडकर, सुलोचनादीदी अशी दिग्गज कलाकार मंडळी यात काम करत होती. तेव्हा सुद्धा सिनेमे शुक्रवारी प्रदर्शित व्हायचे.

सांगत्ये ऐका’ हा त्याकाळी असलेला बिग बजेट मराठी सिनेमा असं आपण म्हणू शकतो. म्हणून सिनेमाच्या प्रदर्शनाची सुद्धा जोरात तयारी करण्यात आली.

वि. गो. नमाडे हे सिनेमाचे संयोजक. म्हणजेच सिनेमा कधी, कुठे, कसा प्रदर्शित व्हावा याची सर्व जबाबदारी ते सांभाळत होते. त्यांनी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी महाराष्ट्रातील सर्व भागातली सिनेमागृह बुक केली.

सिनेमाशी निगडित सर्वजण सिनेमा कसा चालतो, याकडे डोळे लावून बसले होते. सर्व तयारी जोरदार सुरू असताना सांगलीवरून नमाडेंना फोन आला. सांगलीच्या आनंद थिएटरचे मालक बाजीराव आपटे फोनवर होते. त्यांनी नमाडेंना विनंती केली की,

‘तुम्ही इतर ठिकाणी सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित करणार आहात याची मला कल्पना आहे, पण आमच्या सांगलीला ‘सांगत्ये ऐका’ तुम्ही बुधवारी प्रदर्शित करावा’.

सिनेमा प्रदर्शनाला काहीच दिवस बाकी असताना सांगली वरून असा फोन येणं, ही आश्चर्याची गोष्ट होती.

नमाडेंनी त्यांना कारण विचारलं तेव्हा बाजीराव आपटे म्हणाले,

‘आमच्या खास ज्योतिषांनी बुधवारचा मुहूर्त निवडलाय.’

ज्योतिषाने मुहूर्त शोधलाय म्हटल्यावर चांगलाच असणार, यामुळे नमाडेंनी बाजीरावांच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला नाही.

बाजीरावांशी बोलताना नमाडेंनी सहज कॅलेंडरवर नजर मारली.

कॅलेंडर पाहिल्यानंतर मात्र नमाडेंना काहीशी काळजी वाटली. कारण बाजीरावांनी सांगलीत ‘सांगत्ये ऐका’ च्या प्रदर्शनासाठी जो मुहूर्त काढला होता त्या बुधवारी अमावस्या होती. आता मात्र त्यांनी बाजीरावांच्या म्हणण्याला विरोध केला.

बाजीराव सुद्धा अस्सल व्यावसायिक माणूस. कारण ‘सांगत्ये ऐका’ सांगलीला जोरात चालला तर त्यांनाही फायदा होणार होता. तसेच अमावस्या असली तरीही त्यांना त्यांच्या ज्योतिषावर भरपूर विश्वास होता.

बाजीरावांनी नमाडेंना समजावले. अखेर नमाडेंना म्हणणं मान्य करावं लागलं.

१९५९ साली सांगत्ये ऐका संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी प्रदर्शित झाला. परंतु सांगलीला आनंद सिनेमागृहात मात्र ‘सांगत्ये ऐका’ दोन दिवस आधीच म्हणजे बुधवारी प्रदर्शित झाला.

बाजीरावांच्या ज्योतिषाने केलेलं भाकीत खरं ठरलं.

अमावास्येला प्रदर्शित झालेला ‘सांगत्ये ऐका’ पाहण्यासाठी सांगलीमध्ये आनंद सिनेमागृहात प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी झाली. इतकंच नव्हे तर पुण्याच्या विजयानंद सिनेमागृहात हा सिनेमा १३१ आठवडे चालला.

हा विक्रम अजूनही कोणता सिनेमा मोडू शकलं नाही.

हा सर्व विषय बाजूला ठेवला तर ‘सांगत्ये ऐका’ हा मुळात चांगला सिनेमा होता. ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘सांगा ह्या वेडीला’, ‘राम राम घ्या’ अशी आशा भोसलेंनी सिनेमात गायलेली सर्व गाणी गाजली.

तमाशाप्रधान सिनेमांमधील क्लासिक सिनेमा म्हणून ‘सांगत्ये ऐका’ आजही ओळखला जातो. वाईट सिनेमा तुम्ही शुभमुहूर्तावर जरी प्रदर्शित केला तरी तो डब्यात जातो आणि चांगला सिनेमा तुम्ही कोणत्याही दिवशी प्रदर्शित करा, तो सिनेमा प्रेक्षकांचं प्रेम हमखास मिळवतोच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.