भारताला टेनिसची गोडी लाऊनही, सगळ्यात जास्त चर्चा तिच्या लव्हस्टोरीचीच झाली…

भारताला पाहिल्यापासून क्रिकेटचं खुळ. बॅटच्या जागी फळी घेतली आणि स्टम्पच्या जागी टायर घेतले, तरी चालून जायचं. बरं खेळायला मोठी गॅलरीच पाहिजे असंही नव्हतं. गल्लीत, बोळात, बाल्कनीत ते अगदी घरात कुठंही क्रिकेटचा खेळ सुरू व्हायचा. तशी भारताला परंपरा कुस्ती, कबड्डी आणि खोखोचीही आहे. मातीतल्या बऱ्याच खेळांचे जन्मदाते तर भारतीयच आहेत.

पण क्रिकेटनं मिळवलेल्या लोकप्रियतेची उंची कुणी गाठणं शक्य नव्हतं. कारण क्रिकेटला ग्लॅमर होतं, पैसा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटकडे सुपरस्टार होते. पार गावसकर, सचिनपासून आत्ता धोनी कोहलीपर्यंत. बाकीच्या खेळांना मोठी उंची प्राप्त करण्यासाठी अशाच सुपरस्टार्सची गरज होती.

टेनिस हा ही तसा ग्लॅमरस खेळ. हिरवंगार गवत, युनिफॉर्ममध्ये बसलेले प्रेक्षक, ज्या दिशेला बॉल जातोय त्या दिशेला वळणाऱ्या माना, ट्रॉफीचा डौल आणि वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा. या सगळ्या स्पर्धा रात्री जागून बघणारे, टेनिस विश्वाची खडानखडा माहिती असणारे अनेक जण भारतात आहेत. भारतात टेनिसला सर्वदूर पोहोचवण्याचं श्रेय जातं, लिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीला.

या दोघांमुळं भारतात पुरुष टेनिसला सुगीचे दिवस आले. पण महिला टेनिसची रॅकेट अजूनही किटबॅगमध्येच अडकली होती. पण काही वर्षांनी भारताच्या महिला टेनिसलाही सुपरस्टार मिळाली, तिचं नाव सानिया मिर्झा.

मुंबईत जन्मलेली सानिया आपल्या पालकांसोबत हैदराबादला शिफ्ट झाली. तिच्या घरात निवांत वातावरण होतं, त्यामुळं सानियाला अभ्यासासोबतच खेळांचीही गोडी लागली. ती टेनिस सोबतच, क्रिकेट आणि स्विमिंगमध्येही पारंगत होती. पण टेनिसमधला तिचा स्मॅश जोरदार होताच.

तिनं २००१ पासून स्पर्धात्मक ज्युनिअर टेनिस खेळायला सुरुवात केली. ज्युनिअर टेनिसमध्ये तिनं खतरनाक कामगिरी केली. तिच्या नावापुढं टायटल्स जमा होत गेली. पुढं वरिष्ठ टेनिसमध्येही सानियाच्या कामगिरीचा आलेख उंचावताच राहिला. तिनं २००९ मध्ये भारतीय टेनिसचा सुपरस्टार महेश भूपती सोबत ऑस्ट्रेलिया ओपनच्या मिक्स डबलचं टायटल जिंकलं.

त्यानंतर, २०१२ मध्ये फ्रेंच ओपन, २०१४ मध्ये यूएस ओपनमध्ये सानियानं मिक्स डबल्समध्ये ग्रँड स्लॅम जिंकलं. पुढे मार्टिना हिंगीससोबत तिनं वुमन्स डबल्समध्ये सलग तीन ग्रँड स्लॅम्स मारले. सानियामुळं भारतात महिला टेनिसला अफाट लोकप्रियता मिळाली. अनेकांनी टेनिसकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली, त्याचं श्रेय सानिया मिर्झालाच जातं.

आता तिची मेडल टॅली, करिअर रॅकिंग्स या गोष्टी पुन्हा सांगत बसण्यात अर्थ नाही. टेनिसमध्ये डबल्स स्पेशालिस्ट म्हणून तिनं आपली ओळख निर्माण केली.

पण दुर्दैवानं आजही सानिया मिर्झा हे नाव घेतल्यावर, तिच्या लव्ह स्टोरीचीच चर्चा जास्त होते. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया पहिल्यांदा होबार्टमध्ये भेटले. पाच महिन्यांच्या डेटिंगनंतर त्यांनी भारतात लग्न केलं. त्यांचं रिसेप्शन झालं पाकिस्तानात.

आता भारतीय मुलगी, पाकिस्तानातल्या मुलाशी लग्न करणार म्हणजे चर्चा तर होणारच. तिच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. सानियाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. नाही म्हणायला, या धमक्या मिळण्याची तिची ही पहिलीच वेळ नव्हती, त्या आधी टेनिस खेळताना ती घालत असलेल्या कपड्यांवरूनही सानिया टीकेच्या भक्ष्यस्थानी पडली होती. 

भारताला ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विजेतेपदं मिळवून देत, सानियानं भारतातल्या टेनिसला ओळख मिळवून दिली. फक्त मुलींनाच नाही, तर मुलांनाही टेनिस खेळण्याची प्रेरणा सानियाकडून मिळाली. तिची मुख्य ओळख ही, भारताची स्टार टेनिसपटू अशीच आहे आणि राहीलही.

हे ही वाच भिडू:

English Summary: An Indian girl is getting married to a boy from Pakistan. Her decision was widely criticized. Sania also received death threats. Needless to say, this was not the first time that she had received such threats.

 

Web title: Sania Mirza and Shoaib malik’s love story and her other achievements.

Leave A Reply

Your email address will not be published.