हे बाळ साडे सहा फुटी झालं तरी डोक्याने बाबाच राहील.

एखाद्या गड किल्ल्यावर ट्रेकला जावं आणि आपण जातो म्हणून आपला यार, श्रीमंत बापाचा पोरगा असलेला मित्र पण यावा. मग अर्ध लक्ष त्याच्या कडे. याला दगडा धोंड्यातून कसं जमेल..? गडाखालची भाकरी कशी खाईल. याच्या महागड्या जर्किन ला काटे ओरबाडतील. चिखल मळवेल. बायची कटकट. उगीच आला हा आणि ते येड मात्र मस्त तोंड पसरून हसतय…

इतक्या वर्षांनी या माणसासाठी मला काय वाटतं ते परफेक्ट सांगता आलं आहे..

हा नेमका काय करायला आला बॉलिवुड मध्ये? आणि बॉलिवुड मध्ये नसता तर काय जमलं असतं याला. नाही. मी जजमेंटल मनुष्य नाही. फक्त संजय सुनील दत्त या ६० वयाच्या इसमाला त्याच्या आयुष्यात कित्येक सुवर्ण संधी दैवाने दिल्या होत्या आणि त्याने त्या संधींची काय माती केली हे तर नक्की म्हणू शकतो.

बाप सुनील दत्त आणि आई नर्गिस. नशीब मागून आला होता हा मुलगा. कदाचित म्हणूनच अति लाडाने तो कधी वाढलाच नाही. तो जन्मापासून आतापर्यंत बाबाच राहिला. आणि त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांनी they just made sure की हे बाळ साडे सहा फुटी झालं तरी डोक्याने बाबाच राहील.

त्याला म्हणे ड्रमर बनायचं होतं. मग वैमानिक. जो पर्यंत दत्त साब नी त्याला चित्रपटात ढकलल नाही. रॉकी हा दुसऱ्या स्टार सनचा सिनेमा होता. बॉलिवूडचा पहिला स्टार पुत्र कुमार गौरव लव्ह स्टोरी मुळे तरुणाईचा लाडका झाला होता आणि दोन महिन्यातच रॉकी आला. सुनील आणि नर्गिस दत्तच्या मुलाचा चित्रपट. पण दुर्दैव म्हणजे कॅन्सरशी झुंजत असलेल्या नर्गिस दत्त यांना रॉकीचा प्रिमियर शो बघता आला नाही. त्याच्या चार दिवस आधीच त्यांचं निधन झालं होत. सुनील दत्तनी तिच्या नावची खुर्ची रिकामी ठेवली .

रॉकी सुपरहिट झाला.

नुकत्याच मिळालेल्या स्टारडम ला अनुभवण ही संजयला शक्य झालं नाही. संगत वाईट होतीच. ड्रग्स चा विळखा घट्ट झाला आणि विधाता सारखा हिट दिल्यानंतर ही संजूची बॉलिवूडमधून गच्छंती झाली. सरळ रीहॅब सेंटर मध्ये, अमेरिकेत! अर्थात त्याला बिचारा दाखवून राजू हिरानीने संजू ब्लॉकबस्टर केला आहे त्यामुळे संजय ची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे.

पण त्या पलीकडे या माणसाच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी या त्याने स्वतः हुन ओढवून घेतल्या आहेत हे त्याला फॉलो करणाऱ्या तरुणांना माहीत असायला हवं. शिकार आणि शस्त्र याचा वेडा नाद, पुरुषार्थ दाखविण्याच्या खुळचट कल्पना, गॅंगस्टर लोकांचं आकर्षण…

दत्त साब चं वाढत राजकीय प्रस्थ कमी करण्यासाठी त्यांच्या स्वपक्षियांनीच संजूच्या बालिश वृत्तीचा फायदा घेतला असं म्हणतात. ९३ च्या दंगलीत तो खेरवाडी मध्ये ओपन जीप मधून हातात रायफल नाचवत फिरला होता ही खरी गोष्ट पण त्या आधी दत्त साबना जीवे मारण्याच्या धमक्या जात होत्या हे ही तितकंच खरं. त्या करता आपण हातात शस्त्र घेऊन उतरलो तर आधीच अडचणीत आलेला बाप अजूनच अडकेल हे त्याच्या लक्षात आलं असतं तर त्याने ती मागवलीच नसती.

पण तो असा आहे म्हणून तर पूर्वी विधाता च्या वेळी आणि आता साजन, खलनायक असे हिट्स देऊन परत बॉलिवुड मधून बाहेर गेला. या वेळी सरळ तुरुंगात…

बापाने खूप प्रयत्न केले. आधी याला सुधरवायला नंतर सोडवायला. मग येऊन त्याने वास्तव पासून तिसरी इनिंग सुरू केली. परत तुरुंगात जायच्या आधी मुन्नाभाई बनला. एक गोष्ट चांगली केली की बापाबरोबर एक हृद्य प्रसंग साकार केला चित्रपटात.

याच्या बापाला मानणारी जनता आम्ही. भला माणूस दत्त साब. त्याच्या साठी तरी सुधर रे असं कित्येक जण मनात म्हणाले असतील.

असो. त्याची शिक्षा तो भोगून झालाय. पहिली पत्नी रीचा चा अकाली मृत्यू झाल्यानंतर मग ह्रीया पिल्लई आणि आता मान्यता दत्त बरोबर मुलांबरोबर सुखाने शांत नांदतोय. खूप काही बघितलं आहे या दत्त दंपत्तीच्या लाडक्या संजू बाबाने.

पडद्यावर त्याचं माचो व्यक्तिमत्व, त्याच्या चालण्याची पद्धत, त्याची हेअर स्टाईल, त्याचा आवाज (मला सॉलिड आवडतो त्याचा आवाज) याची तरुणांमध्ये क्रेझ होती. आहे. तो स्टड आहे. किती ही bad boy असला तरी समाजातल्या एका सेक्शनचा तो अत्यंत लाडका हिरो आहे. आणि हा सेक्शन म्हणजे ज्यांना स्वप्न नावाचा फेनॉमेना हा फक्त थेटर मधल्या सफेद पडद्यावर रंगीत होऊन येतो इतकंच काय ते माहिती. बाकी आयुष्य इतकं नाचवत की रात्री लादीवर पडल्या पडल्या घोरायला लावणारी झोप येते. तिथे स्वप्नाला जागा नाही असा हा सेक्शन.

टॅक्सी ड्रायव्हर, ऑटो वाले, टपोरी, फेरीवाले, हातावर पोट असणारे. सगळ्यांचा आवडता हिरो आहे संजू बाबा…

अगदी टाकाऊ नट पण नाही तो. मिशन काश्मीर मध्ये खूप छान काम केलं आहे. वास्तव मधला रघु असेल किंवा कुरुक्षेत्र मधला पोलीस अधिकारी.मांजरेकर त्याचे संतोषी आहेत. मुन्नाभाई बद्दल तर बोलायलाच नको..पण मला तो एक और एक ग्यारह मध्ये गोविंदाला पुरून उरलाय ते सुद्धा कॉमेडी मध्ये. याची कमाल वाटते.

स्वभावाने दिलदार, सरळ आणि छक्के पंजे न खेळणारा मनुष्य आहे. पहिल्यांदा तुरुंगातून परत घरी आला होता तेव्हा गौतम राजाध्यक्ष यांनी त्याला फोन करून म्हटलं होतं

“संजू तुझ्या थोबाडात मारावीशी वाटते मला…”

त्याला फक्त “हो. माहीत आहे मला” असं म्हणून गप्प बसला …

भरपूर शिव्या शाप खाल्लेल्या, तावून सुलाखून निघालेल्या या जीवाला आणि याच्या दिवंगत आई वडिलांना आतातरी शांतता लाभू देत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.