संजय दत्तला चंबळच्या खऱ्याखुऱ्या डाकुंनी किडनॅप केलं होतं?
गोष्ट आहे साठच्या दशकातली. संजू बाबाचे वडील सुनील दत्त तेव्हा डाकूंच्यावर आधारित सिनेमा बनवत होते. नाव होतं,
“मुझे जीने दो”
सुनील दत्त फक्त या सिनेमाचे हिरो नव्हते तर ते प्रोड्युसर देखील होते. त्यांनी व त्यांची पत्नी नर्गिस यांनी मिळून अजंता आर्टस् या फिल्म कंपनीची स्थापना केली होती. मुझे जीने दो त्यांचा दुसराच सिनेमा होता.
सुनील दत्त आणि नर्गिस हे दोघेही सिनेमावर जीवापाड प्रेम करायचे. भारतीय सिनेमात वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.
हॉलिवूड सिनेमामध्ये वेस्टर्न नावाचा जॉनर होता. यात काऊबॉईज, त्यांची घोडेस्वारी, बंदुका, फायटींग याचा समावेश असायचा. हे सिनेमे जगभरात तुफान यशस्वी असायचे. सुनील दत्त यांना हा जॉनर हिंदीतही आणायचा होता.
फक्त याच भारतीय रूप बनवलं होतं, “डाकू सिनेमा”.
आता पर्यंत भारतीय सिनेमात डाकू हे व्हिलन म्हणून यायचे. मुख्य हिरो डाकू आहे हे फारस कधी पाहायला मिळालं नव्हतं. सुनील दत्त यांनी मुझे जीने दो मध्ये डाकुंची मानवी बाजू दाखवायचा घाट घातला होता.
मुख्य डाकू जरनेल सिंगच्या रुपात ते स्वतः असणार होते. यापूर्वी सुप्रसिद्ध मदर इंडिया सिनेमात त्यांनी रंगवलेला बिरजू शेवटी डाकू बनतो एवढा त्यांना डाकू बनण्याचा अनुभव होता.
शिवाय हिंदी बेल्ट मध्ये लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांनी डाकू पाहिले होते, त्यांच्याबद्दलच्या कथा दंतकथा ऐकल्या होत्या.
मुझे जीने दो मध्ये डाकुंचे यथार्थ चित्रण व्हावे म्हणून सुनील दत्त यांनी थेट चंबळ खोऱ्यात शूटिंग करायची योजना आखली.
आजही चंबळमध्ये पाऊल ठेवायला अनेक जण घाबरतात.अनेकांनी सुनील दत्त यांना समजावून सांगितलं पण त्यांना हे धाडस करायचंच होतं.
त्यांनी आपलं शूटिंगच अख्ख युनिट चंबळला आणलं होतं सोबत नर्गिस आणि 3 वर्षांचा संजय सुद्धा होता. शूटिंग सुरू असताना पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं होतं
फिल्मच्या मुख्य हिरॉईन होत्या वहिदा रहमान.
त्या त्याकाळच्या सुपरस्टार होत्या. त्या आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात की,
शूटिंगच्या सुरवातीला सुनील दत्त सेटवर खूप स्ट्रिक्ट असायचे. जराशी चूक झाल्यावर सगळ्यांना रागवायचे. खरंतर डाकू सेटवर आले तर काय याच त्यांना टेन्शन असायच.
एकदा काही तरी झालं सुनील दत्त धावत धावत आले आणि निरुपा रॉय, वहिदा रहमान, नर्गिस याना संजयला घेऊन एका तंबूत आवाज न करता लपून बसायला सांगितलं.
थोड्या वेळाने कळाल की,
त्या भागातून एक डाकुंची टोळी जात आहे म्हणून बीएसएफ च्या जवानांनी सगळ्यांना लपायचा आदेश दिला होता.
पण पुढे पुढे सगळं वातावरण निवळलं.
सुनील दत्त स्वभावाने अतिशय सज्जन होते मात्र त्यांची उंची, तगडी शरीरयष्टी, ऐटीत चालायची स्टाईल यामुळे ते खरे खुरे डाकू दिसायचे.
वहिदा रहमान यांनी त्यांना कानफटात मारायचा सीन होता. सुनील दत्त यांना हा सिन खराखुरा हवा होता म्हणून त्यांनी वहिदा यांना जोरात कानाखाली वाजवायची परवानगी दिली होती.
वहिदा रहमान या दत्त यांच्या सेटवरच्या कडक शिस्तीमुळे वैतागल्या होत्या. त्या त्यांना खूप जोरात कानफटात द्यायच्या आणि चुकून सुनील दत्त यांचे डोळे मिटायचे.
आता एखादा डाकू एका मुलीने कानफटात मारल्यावर डोळे कसे मिटेल? त्याने उलट रोखून पाहणे अपेक्षित आहे.
फक्त डोळे उघडे राहावेत म्हणून सुनील दत्त यांनी १५ वेळा वहिदा रहमान कडून कानफटात खाल्ल्या.
अशा या सुनील दत्त यांच्या सज्जनपणाची ख्याती तोवर डाकूंच्यापर्यंत येऊन पोहचली होती. त्याकाळचे चंबळ मधील सर्वात डेंजर समजले जाणारे रूपासिंह डाकू सेटवर आले.
त्यांच्या जवळ कोणतेही शस्त्र नव्हते. फक्त शूटिंग कसे असते, डाकूंच्या वरील चित्रपट कसा बनतोय हे बघायला ते तिथे आले. सेटवर पोलीस बंदोबस्त सुद्धा होता.
जर्नेलसिंग डाकूच्या वेशातील सुनील दत्त आणि खरोखरचा खुंखार डाकू रुपासिंह सेटवर गप्पा मारत बसले होते.
अचानक तिथे छोटा संजय दत्त आपल्या डुडक्या चालीत उगवला. वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला.
बोलता बोलता रुपा सिंह यांनी त्याला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि सुनील दत्त यांना म्हणाला,
“ये सिनमा बनाने मे आपका कितना पैसा खर्च होता है?”
सुनील दत्त म्हणाले, दस पंधरा लाख!
रुपा सिंग डाकू त्यांना म्हणाला,
“अगर मै आपके इस बच्चे को किडनॅप करूं तो फिर मुझे कितना पैसा दोगे?”
सुनिल दत्त यांच्या बत्त्या गुल झाल्या. घाबरून घाम फुटला पण तसं न दाखवता त्यांनी काहितरी इकडच तिकडच उत्तर देत विषय फिरवला आणि संजयला परत आपल्या मांडीवर ओढून घेतलं.
रूपासिंह डाकू आला तसा शूटिंग बघून निघून गेला
पण सुनील दत्त यांनी त्याचदिवशी नर्गिस आणि संजय दत्त यांची रवानगी परत मुंबईला केली.
खुद्द संजय दत्तने हा किस्सा कपिल शर्माच्या शोवेळी सांगितलेला आहे.
पण तरी आजही चर्चा चालते की त्या दिवशी संजय दत्तच अपहरण झालं होतं आणि सुनील दत्त यांनी भरमसाठ पैसे देऊन त्याची सुटका केली आणि आपलं राजकीय वजन वापरून सगळं प्रकरण मिटवून टाकलं.
हे ही वाच भिडू.
- तो किस्सा ज्यामुळे संजय दत्त निवडणूक लढवायला घाबरतो.
- नोटिस देवून दरोडा टाकणाऱ्या गंगाखेडच्या रुक्म्या डाकूच नाव अजूनही निघतं..
- १९६५ मध्ये १२ लाखांच बक्षीस असणारा चंबळचा डाकू वारला..