संजूबाबाने येरवड्याच्या जेलमध्ये रेडिओ शो हिट केला होता…..

संजय दत्त हा बऱ्याच जणांचा आवडता हिरो आहे. त्याची चालण्याची स्टाईल, डायलॉग, त्याचा आवाज हा त्याच्या फॅन्स लोकांना एकदम कुल वाटतो. वास्तवचा रघुभाई असो किंवा मुन्नाभाई असो, खलनायक असो किंवा लोखंडवाला मधला ऑफिसर खान असो अशा सगळ्याच रोलमध्ये संजय दत्त भाव खाऊन गेला. लगे रहो मुन्नाभाई सिनेमात त्याने केलेली गांधीगिरी चांगलीच हिट झाली होती. यात संजूबाबाने साकारलेला आरजे लोकांना भावला होता.

फक्त सिनेमातच संजय दत्तने आरजेची भूमिका केली नव्हती तर रियल आयुष्यातही तो आरजे म्हणून काम करत होता. संजय दत्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात रेडिओ जॉकी बनला होता. जेलमध्ये रेडिओ असावा अशी विनंती संजय दत्तने केली होती आणि त्याने ती जबाबदारी कशी पार पाडली होती जाणून घेऊया. 

१९९३ च्या मुंबईवरील बॉम्ब हल्ल्यात सामील असल्याच्या आरोपातून संजय दत्तला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. बराच काळ जेलमध्ये राहिल्यावर नोव्हेंबर २०१४ साली तुरुंगात तुरुंग अधिकाऱ्यांनी दोन रेडिओ स्टेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता रेडिओ स्टेशन सुरु केलं खरं पण त्यावर आरजे म्हणून काम करणार कोण असा प्रश्न पडला. त्यावेळी संजय दत्तची या कामासाठी निवड करण्यात आली.

गुड आफ्टरनून ! रेडिओ वायसीपीमध्ये आपलं स्वागत आहे, मैं हू आपके साथ आपका आरजे संजय दत्त….

हा आवाज येरवडा मध्यवर्ती कारागृहात दररोज दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत ऐकू येऊ लागला. येरवडा तुरुंगात साडे तीन हजार कैद्यांना संजय दत्तच्या माध्यमातून मनोरंजन करता येऊ लागलं. हे पहिलं असं रेडिओ स्टेशन होतं जे कैद्यांसाठी कैद्यांकडून सुरु करण्यात आलं होतं.

या रेडिओ स्टेशनवरून संजय दत्त भक्तिगीते, मुलाखती आणि कैद्यांशी संबंधित विविध कार्यक्रमांवर चर्चा करत असे. दररोज या कार्यक्रमांची थीम वेगळी असायची. कैद्यांच्या फर्माईशवर गाणी वाजवली जायची. तुरुंगात काम करणाऱ्या कैद्यांना संजय दत्तचा आवाज सवयीचा झाला होता. या आरजेच्या रोलमध्ये संजय दत्त भाव खाऊन गेला. या साठी तो रोज स्वतः कार्यक्रमाची स्क्रिप्ट लिहायचा. 

लगे रहो मुन्नाभाई सिनेमात आरजेच्या रोलचा पुनःप्रत्यय संजय दत्तला आला. गुड मॉर्निंग मुंबई म्हणणाऱ्या विद्या बालनच्या प्रेमात पडून पुढे तो गांधीगिरी करून लोकांच्या समस्या आरजे स्टाईलने सोडवतो. जेलमध्ये त्याने भरपूर पुस्तक वाचून काढली. रेडिओ जॉकी बनण्याअगोदर संजय दत्त येरवडा कारागृहात कागदी पिशव्या बनवण्याचं काम करायचा.

संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा सिनेमा आला होता. रणबीर कपूरने त्यात संजय दत्तचा रोल केला होता. या सिनेमाच्या शेवटीसुद्धा आरजेचा संजय दत्तचा रोल दाखवण्यात आला आहे, जो सिनेमाच्या शेवटी इमोशनल करून जातो. संजय दत्तने आजवर बरेच रोल केले पण त्याचा हा आरजेचा नवीन रोल जरा हटके होता.

तुरुंगात राहून शिक्षेचं दुःख व्यक्त करत न बसता संजय दत्तने यावर तोडगा म्हणून व्यायाम, वाचन आणि आरजे असे विविध उपक्रम सुरु केले. दररोज साडेतीन हजार कैद्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी संजय दत्तने यशस्वीपणे निभावली. या कैद्यांच्या सोबत राहून संजय दत्त मराठी सुद्धा शिकला होता. कार्यक्रमाच्या स्क्रिप्टमधे हिंदी भाषेसोबतच मराठी सुद्धा संजय दत्तने आग्रहाने ऍड केली होती. कैद्यांना त्याच्या तोंडून मराठी ऐकणं म्हणजे पर्वणीच वाटायची. 

असा हा संजय दत्त सिनेमात आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा आरजेच्या रोल मध्ये फिट बसला आणि त्याने तो शो हिट केला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.