त्या दिवशी चार शुटर संजय दत्तची गेम करण्यासाठी गोव्यात फिरत होते
बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड हे वेगळ समीकरण आहे. एकमेकांच्या हातात हात धरुन उभा राहिलेल्या या दोन्ही क्षेत्राबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहे.
असाच एक किस्सा हुसेन झैदी यांनी माय नेम इज अबु सालेम या पुस्तकात लिहला आहे.
कशाप्रकारे अबु सालेमने संजय दत्तची सुपारी दिली होती आणि संजय दत्त या प्रकरणातून सहीसलामत सुटला हा किस्सा या पुस्तकात सांगण्यात आला आहे.
हा किस्सा घडलेला ते साल होतं साधारण २००१ चं.
त्या काळात डी कंपनी म्हणजे दाऊद आणि अबू सलेम यांच्यात खडके उडले होते. त्यानंतर दाऊदचा एकेकाळचा खास दोस्त छोटा शकील अबू सलेमचा गेम करण्याच्या तयारीत होता. या सर्व गोष्टींना भिवूनच अबू सालेमने अमेरिकेचा रस्ता पकडलेला.
त्या काळात तो न्यू जर्सीत रहायला. इकडे अबू सालेम कधी रडारवर येतो आणि त्याचा कधी गेम करतो अस छोटा शकिलचं झालेलं. त्याच दरम्यान अबू सालेम न्यू जर्सीत सेटल होत गेला. एकदिवशी त्याच्या डोक्यात बॉलिवूडचा एखादा इव्हेंट अमेरिकेत घेण्याची आयडिया आली. लागलीच त्याने आपला जूना दोस्त संजय दत्तला फोन करुन ही आयडिया सांगितली. शिवाय त्याला इथे इव्हेंट घेण्यासाठी येण्याचं आमंत्रण देखील देवून टाकलं.
काही दिवस गेले तोच छोटा शकीलच्या गॅंगमधल्या एका इन्फोर्मरने अबु सालेमला फोन लावला आणि त्याला सांगितला तू जो इव्हेंट आयोजित करणार आहे त्याच इव्हेंटमध्ये तुझा गेम करायचा प्लॅन छोटा शकिलने केलेला आहे.
हे ऐकताच अबु सालेमच्या फ्यूजा उडल्या. कारण त्याचा हा इव्हेंटचा प्लॅन फक्त संजय दत्तलाच माहिती होता. त्याने ही आयडिया अजून कोणालाही सांगितली नव्हती. साहजिक छोटा शकिलपर्यन्त ही बातमी पोहचवण्याचं काम केलेलं ते संजय दत्तने..!
अबु सालेम या गोष्टीवरून संजय दत्तवर भडकला…
संजय दत्त आपली गेम करण्यासाठी माहिती छोटा शकीलला देतो ही गोष्ट त्याला पचणारी नव्हती. लागलीच सालेमने सुत्र फिरवली व संजय दत्तची गेम करण्याची जबाबदारी आपल्या चार खास शुटरकडे देवून टाकली.
संजय दत्त तेव्हा कांटे सिनेमाच्या शुटींगसाठी गोव्यात होता. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा दोस्त संजय गुप्ता देखील सोबत होता. इकडे सालेमचे शुटर संजय दत्तचा गेम करण्यासाठी गोव्यात पोहचले.
ते संपुर्ण गोव्यात संजय दत्तला शोधू लागले. संजय दत्त राहत असलेल्या हॉटेलचा पत्ता शोधणं कठीण नव्हतं. त्यांनी संपुर्ण रेकी केली आणि संजय दत्तची वाट पाहू लागले.
इतक्यात संजय दत्तच्या इन्फोर्मरचा फोन वाजला,
त्याने सांगितलं की तूला संपवण्यासाठी सालेमने त्याचे चार शुटर कामाला लावलेत. एकतर गोव्यातून बाहेर परतताना किंवा मुंबई एअरपोर्टवर तुझा गेम करण्याची ऑर्डर आहे…
हे ऐकताच संजय दत्तच्या पुंग्या टाईट झाल्या. संजय दत्तने ही घटना सोबत असलेल्या संजय गुप्ताला सांगितली आणि दोघांनीही हॉटेलच्या रुममध्येच राहून हालचाल करण्याचा निर्णय घेतला.
संजय दत्त वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत अबु सालेमला फोन लावू लागला. पण सालेम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्याला नाव आठवलं ते अकबर खान याचं.
अकबर खान याचे सालेमवर खूप उपकार होते.
१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर सालेमला तो स्वत: मुंबईतून नेपाळला घेवून गेला होता. खोट्या पासपोर्टसहीत भारत सोडण्यासाठी त्यानेच सालेमला मदत केलेली. सालेम हा अकबर खानचं म्हणणं टाळणार नाही याची पुर्ण गॅरेंटी संजय दत्तला होती.
लागलीच संजय दत्तने अकबर खानला फोन लावला. अकबर खानने बोलणी सुरू केली. सालेम देखील अकबर खानचा शब्द टाळू शकला नाही. पण त्याने एक अट ठेवली. ती म्हणजे संजय दत्तने आपल्याला फोन करुन माफी मागावी..
संजय दत्तने फोन करुन अबु सालेमची माफी मागितली. अबु सालेमने आपल्या शुटरना परत फिरण्याची ऑर्डर दिली. भितभितच संजय दत्त गोव्याच्या विमानतळावरून मुंबईकडे झेपावला. तो मुंबईच्या विमानतळावर पोहचल्यानंतर त्याला घरी सोडण्यासाठी खास अकबर खान आलेला. पुढे आपल्या या मध्यस्थी करण्याची मोठ्ठी रक्कम त्याने वसुल केल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे.
हे ही वाच भिडू
- म्हणुन मनीषा कोइरालाने संजय दत्तचे फोटो तिच्या कपाटात लपवले होते
- संजय दत्तला चंबळच्या खऱ्याखुऱ्या डाकुंनी किडनॅप केलं होतं?
- खलनायकांचा संजय दत्त तो मेल्यानंतर त्याचं शरीर सडत राहीलं तरी कोणाला आठवण आली नाही.