संजय गांधींनी बनवलेली खरी मारुती कधी रस्त्यावर धावलीच नाही..

मारुती ८००. भारतातली पहिली हॅचबॅक कार. मध्यमवर्गाचं स्वतःच्या कारचं स्वप्न या मारुती मूळ प्रत्यक्षात आलं होतं. दोनचाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्यांच्या घरी ऐटीत मारुती मधून जाऊ लागलं. आजही अनेकांच्या दारात आपण घेतलेली पहिली कार म्हणून मारुती अभिमानाने उभी असते.

एकेकाळी भारत सरकारची मालकी असणारी ही कार आता मारुती सुझुकी झाली आहे. तरी जगात सगळ्यात जास्त खपणाऱ्या गाड्यांमध्ये तिचं नाव एक नंबरला असते.

मारुतीची निर्मिती पंतप्रधान इंदिरा गांधींच्या लाडक्या सुपुत्राने म्हणजेच संजय गांधींनी केली होती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असते. त्यावरून संजय गांधींवर टोकाचं कौतुक आणि टोकाची टीका केली जाते. पण गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही कि आता जी मारुती आहे ती संजय गांधींनी बनवलेलीच नाही. त्यांनी बनवलेली मारुती वेगळीच होती.

कशी होती संजय गांधींची मारुती?

संजय गांधी म्हणजे इंदिरा गांधी आणि फिरोझ गांधी यांचा धाकटा मुलगा. फिरोज गांधी या पारसी सद्गृहस्थाला राजकारणा बरोबरच मोटार गाड्या, टीव्ही, रेडिओ, अशा यंत्रांचा शौक होता. आपल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून या वस्तू दुरुस्त करत बसायची त्याला आवड होती. त्यांचा हा छंद त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये उतरला. दोघांनाही यातूनच इंजिनियरिंगची आवड निर्माण झाली.

फक्त कारच नाही तर विमाने उडवण्याच क्रेझ देखील फिरोझ गांधी यांच्या कडूनच राजीव आणि संजय यांच्याकडे वारसा हक्काने आलं.

या दोघांची खेळणी देखील छोटी मोटरकार, इलेक्ट्रिक वस्तू अशा असायच्या.

इंदिरा गांधींची दोन्ही मुलं डेहराडूनच्या डून स्कुल मध्ये शिकली. फिरोझ गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचं बालपण नेहरूंच्या पंतप्रधान निवास मध्येच गेलं. राजीव गांधींनी पुढे जाऊन केंब्रिजमध्ये इंजिनियरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळवलं. ते तिथं ३ वर्षे होते मात्र त्यांनी इंजिनियरिंग काही पूर्ण केलं नाही. भारतात परतले आणि इंडियन एयरलाईन्समध्ये पायलटची नोकरी पकडली.

धाकटा संजय मात्र कॉलेजला गेलाच नाही.

त्याची मुख्य आवड स्पोर्ट्स कार आणि फायटर प्लॅन हे होते. टिपिकल कॉलेज करण्यापेक्षा थेट इंग्लंडमधल्या रोल्स रॉयस कंपनीत अँप्रंटीस केली. जवळपास तीन साडे वर्षे तो तिथं होता. या काळात मोटर कार डिझाईनच सगळं काही आपल्याला शिकता आलं असा दावा करत तो भारतात परतला.

इथं आल्या आल्या त्याने सर्वसामान्य भारतीयांना परवडणारी छोटी जनता गाडी बनवण्याचं स्वप्न जाहीर केलं.

इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान होत्या. देशाच्या अनभिषिक्त सम्राज्ञी. सत्ता आणि पैसा त्यांच्या समोर हात जोडून उभा असले. या काळात त्यांची दोन्ही लेकरं काय करत होती? तर थोरला पाच हजारांच्या पगारावर पायलटची नोकरी करत होता. तर धाकटा एका गॅरेजमध्ये हात काळं करत होता.

जुन्या दिल्लीमध्ये रोशनआरा गार्डनच्या जवळ अर्जन दास नावाच्या व्यक्तीचा एक गॅरेज होता. २३-२४ वर्षांचा संजय गांधी तिथे पीपल्स कार बनवण्याच्या खटपटीत होता. अर्जन दास हे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दिल्ली महानगरपालिकेचे नगर सेवक होते.

त्यांच्या गॅरेजमधल्या मेकॅनिक यांना सोबत घेऊन एका वर्षात संजय गांधींनी आपल्या कारचा प्रोटोटाइप तयार केला. ते वर्ष होते १९७०. इंदिरा गांधींनी आपल्या लाडक्या मुलाने कार बनवली आहे याच एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.

“My son is a delicate young man, and with whatever money and energy he has, he has modelled a car, not a posh one, but one fairly comfortable and suitable to Indian conditions … My son has shown enterprise and I just could not say no to him … if he is not encouraged how can I ask other young men to take risks”

याचाच अर्थ इंदिरा गांधी आपल्या मुलाच्या उद्योगात सरकारी पैसे लावण्याची घोषणा करत होत्या. काही दिवसांनी हे समोर देखील आलं.

४ जून १९७१ रोजी मारुती मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आणि त्याचे पहिले एम.डी. होते संजय गांधी.

खरं तर भारताची हॅचबॅक कार असावी यासाठी त्या काळात अनेकांनी प्रयत्न केले होते. इचलकरंजीच्या शंकरराव कुलकर्णी यांच्यापासून ते म्हैसूर राज्यापर्यंत अनेक ठिकाणी छोट्या मोटारीचे प्रोटोटाइप तयार झाले होते. पण परवानगी फक्त इंदिरा गांधींच्या मुलाच्या गाडीला मिळाल, यावरून विरोधकांनी मोठा गोंधळ घातला.

संजय गांधींच्या मारुतीसाठी तत्कालीन हरयाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल धावून आले. त्यांनी दिल्ली पासून जवळ असलेला गुडगाव हायवे जवळ मानेसरची जागा या मारुती कारखान्याला देऊ केली. विक्रमी वेळेत हा कारखाना बांधून तयार देखील झाला. दरवर्षी या कारखान्यातून ५० हजार कार बनवण्याचं उद्दिष्ट संजय गांधींनी डोक्यात ठेवलं होतं.

पण प्रोटोटाईप कार बनवणे आणि त्याचं मास प्रोडक्शन सुरु करणे यात खूप मोठं अंतर आहे हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं. मारुतीच्या निर्मितीसाठी जर्मनीच्या फोक्सवॅगन कंपनीशी त्यांनी संपर्क साधला. फोक्सवॅगनची बीटल नावाची कर तेव्हा प्रचंड फेमस होती. त्यांच्याशी टायप करून मारुती बीटल काढायचं संजय गांधींच्या डोक्यात होतं.

पण त्यांच्या दुर्दैवाने हा करार पूर्णत्वास जाऊ शकला नाही. मोठा गाजावाजा करून सुरु केलेल्या मारुती कारखान्यातून संजय गांधींची एकही कार मार्केटमध्ये येऊ शकली नाही.

अखेर कंटाळून संजय गांधींनी मारुतीची साथ सोडली आणि पूर्णवेळ राजकारणात उतरले. युथ काँग्रेसची धुरा त्यांनी आपल्या हाती घेतली. नेमकी याच काळात आणीबाणी सुरु झाली. इंदिरा गांधीच्या हातात देशाची सत्ता एकवटली. अनुशासन पर्व म्हणून चर्चा सुरु असताना संजय गांधी आपल्या तरुण कार्यकर्त्यांसह देशाला सुधारायच्या मागे लागले.

नसबंदीचा कार्यक्रम, बनारसचे रस्ते मोठे करायचा कार्यक्रम, गंगा शुद्धी असे मोठे प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतले. पण त्यांच्या उतावळ्या स्वभावामुळे आणि कार्यकर्त्यांच्या दांडगेपणामुळे या सगळ्या प्रोजेक्ट्सचा फज्जा उडाला.

इंदिरा गांधींना आपल्या आणीबाणीत संजय गांधींच्या कार्यक्रमांमुळे मोठी टीका सहन करावी लागली. संजय गांधी थेट मंत्र्यांना उलट बोलतात, त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेवर दडपशाही करतात अशी शक झाली. अखेर इंदिरा गांधींना आणीबाणी मागे घ्यावी लागली आणि त्यांचा पराभव झाला.

हे सगळं चाललं होत आणि तिकडे मारुतीचा कारखाना धूळ खात पडला होता.

जनता सरकारने तर त्याला कुलूपच लावले आणि मारुती उद्योगाच्या कारभारात इंदिरा गांधी संजय गांधींनी काय घोटाळा केलाय याची चौकशी सुरु केली. संजय गांधी तिथले एमडी असताना त्यांना कॅट अलाउन्स मिळायचा अशी देखील टीका झाली.

प्रचंड पैसे खर्च करून एकही कार रस्त्यावर उतरवू न शकल्यामुळे संजय गांधी आरोपाचे धनी झाले होते.

पण गंमत म्हणजे जनता सरकारदेखील फार काळ टिकले नाही. त्यांच्या त्यांच्यातीळ भांडणामुळे आणि इतर उद्योगांमुळे हे सरकार कोसळले. इंदिरा गांधी थाटात परत आल्या. मागील चुका आता परत करायच्या नाहीत या उद्देशाने त्यांनी कामे सुरु केली.

नेमकं याच काळात संजय गांधी यांचं विमान अपघातात निधन झालं. अवघ्या ३३ व्या वर्षी या तरुण नेत्याचा झालेला मृत्यू हा कित्येकांसाठी धक्कादायक होता. त्यांचं मारुती कारचं स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही असच वाटत होतं. पण आता मात्र पंतप्रधान इंदिरा गांधींनी या प्रोजेक्ट मध्ये स्वतः लक्ष घातलं.

१९८२ साली जपानच्या सुझुकी बरोबर करार करण्यात आला. त्यांच्या सुझुकी अल्टो ८००च्या मॉडेलवर नवीन मारुती डिझाईन करण्यात आली.

अतिशय धुमधडाक्यात या गाडीसाठी पायघड्या अंथरण्यात आल्या.असं म्हटल जात की इंदिरा गांधी यांनी आपल्या मुलाची आठवण असलेला प्रोजेक्ट यशस्वी व्हावा म्हणून  मारुती लॉंच करण्याआधी पेट्रोलवरचे करसुद्धा कमी करण्यात आले होते.

१४ डिसेंबर १९८३ साली हरयाणा मधल्या गुडगाव मध्ये एक मोठा फंक्शन आयोजित करण्यात आला होता. स्वतः इंदिरा गांधी या कार्यक्रमाला आल्या व त्यांनी पहिल्या ग्राहकाला हरपाल सिंग यांना मारुतीची चावी सुपूर्द केली. हीच ती आपण पाहतो ती मारुती ८०० कार.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.