संजय गांधींच्या मृत्युनंतर १५ दिवसात अंतुलेंनी आणलेली योजना आजतागायत सुरु आहे.

कॉंग्रेस सरकार सत्तेत असतांना अंमलात आणलेल्या अनेक योजना आजतागायत कार्यरत आहेत त्यातलीच एक म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना.

राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून चालू असलेली हि योजना आजही राबविण्यात येत आहे.

या योजनेचे श्रेय जाते ते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना !

हि योजना त्यांनी संजय गांधींच्या अपघाती मृत्युनंतर त्यांच्या स्मरणार्थ सुरु केली होती.

संजय गांधी म्हणजे वेग आणि मशीन असं समीकरणच जणू ! परंतु याच समीकरणाने त्यांचा जीवही घेतला होता. विमानं चालवीत हवेत विमानाच्या कसरती करणं त्यांचा छंदच होता. त्या दिवशीही संजय गांधी यांनी सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत रहिवासी भागावरच तीन फेऱ्या मारल्या. ते चौथी फेरी मारणार तेवढ्यात विमानाचं इंजिन बंद पडलं आणि विमान वेगात येऊन थेट जमिनीवर आदळलं आणि संजय गांधी यांचा मृतदेह विमानाच्या मलब्यापासून चार फुटाच्या अंतरावर जाऊन पडला होता. हा एक गंभीर अपघात होता.

त्यांच्या मृत्युच्या १५ च दिवसानंतर बॅ अंतुले यांनी संजय गांधींच्या स्मरणात संजय गांधी निराधार योजना चालू केली.

तुम्ही म्हणाल अंतुले यांनी एवढ्या तडकाफडकी या योजनेचा अवलंब का केला असावा ?

खरं तर अंतुले यांची ओळख अशीच होती जे कोणताही निर्णय हा जिथल्या-तिथे घेऊन मोकळे व्हायचे.

अंतुले यांची आणि संजय गांधी यांची जवळीक बरीच वर्षे होती. तसे ते पक्षाचे आणि इंदिराजींचे हि निष्ठावान सहकारी होते. इंदिरा गांधी यांनी जेंव्हा देशात आणीबाणी लागू केली आणि ती हटवल्यानंतर हळूहळू त्यांच्या जवळचे नेतेही त्यांना दूर करू लागले. इंदिराजी स्वतः निवडणुकीला पडल्या, काँग्रेस दुभंगली.  परंतु अंतुले असे एकमेव नेते होते ज्यांनी तेंव्हाही कॉंग्रेस ची साथ सोडली नव्हती.

कॉंग्रेसच्या हलाखीच्या दिवसात गांधी कुटुंबीयांना आधार होता तो अंतुलें यांचाच. असंही म्हणलं जातं कि आणीबाणीनंतर कॉंग्रेसचे ऑफिस अंतुले यांच्याच घरात वसवले होते. इंदिरा गांधी संजय गांधी यांच्यावर जनता सरकारने लादलेल्या खटल्याच्या मदतीसाठी बॅ.अंतुलेंनीच पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी मुंबईतून रामराव आदिकांना बोलावून घेतलं होतं.

आणीबाणीनंतर महाराष्ट्रासह देशाचं राजकारण बदललं होतं. सत्ता हातातून गेली आणि स्वतःला निष्ठावान नेते म्हणवणारे पटापट दुसऱ्या पक्षात जाऊ लागले. त्यानंतर ८० मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या आणि केंद्रात इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि महाराष्ट्रात अर्थातच त्यांनी गांधी घराण्यावरील अपार निष्ठा असलेले अंतुले यांचीच निवड केली होती.

बरं अंतुले यांची निवड करण्यात फक्त इंदिराजींचीच इच्छा नव्हती तर पुढाकार तसा संजय गांधीचाही होता.

कारण मायलेकांच्या पडत्या काळातही अंतुले यांनी त्यांची साथ सोडली नाही म्हणून त्यांना संजय गांधींनी अंतुले यांची निवड केली होती असं म्हणायला हरकत नाही.

असं सांगतात की अंतुलेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय गांधींनी वसंतदादा पाटलांचं विमान वेळेवर मुंबईत लँड होऊ नये याची व्यवस्था देखील केली होती.

अखेर संजय गांधींच्या आग्रहामुळे बॅरिस्टर अंतुले राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बनले.

पण दुर्दैव म्हणजे अंतुलेंनी 9 जून १९८० महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच्या १५ दिवसानंतर २३ जून रोजी संजय गांधी याचं अपघाती निधन झालं. आणि त्यांच्या मृत्युच्या १५ दिवसानंतर तडकाफडकी अंतुले यांनी संजय गांधी यांच्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळालं त्याची जाण ठेवत आपल्या राजकीय पाठीराख्याच्या स्मरणार्थ अंतुले यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली.

राज्यातील निराधारांना दरमहा ६० रुपये इतके तरी निवृत्तिवेतन मिळणार अशी ती योजना होती. आजही ही योजना देशभर वेगवेगळय़ा राज्यांतून राबवली जाते. फरक इतकाच की, आज हे निवृत्तिवेतन ५०० रुपयांच्या घरात गेले आहे.

सरकारच्या कोणत्याही योजना अंमलात आणणे, वेगवेगळे धाडसी निर्णय घेणे यासाठी त्यांना प्रशासनाची सोबत मिळायची. संजय गांधी निराधार योजनेतही त्यांना प्रशासनाने चांगलीच साथ दिली त्याचाच परिणाम म्हणजे हि योजना आजतागायत यशस्वीपणे चालू आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.