संजय गांधींच्या मृत्यूचं खापर फुटलं कोल्हापुरी चपलेवर..

संजय गांधी. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे सुपुत्र. एकेकाळचे त्यांचे राजकीय वारसदार. भारतीय राजकीय इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक. त्यांचा उदय, त्यांची मारुती कार, त्यांची आणीबाणीची भूमिका, त्यांचे कार्यकर्ते, कुटुंबनियोजनाची मोहीम या सगळ्याच गोष्टी वादग्रस्त.

त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्याप्रमाणे खळबळजनक राहिलं तसा त्यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू देखील खळबळजनक होता.

गोष्ट आहे १९८० सालची. आणीबाणीनंतरच्या जनता धक्क्यात काँग्रेस पूर्णपणे कोलमडून पडली होती त्याला इंदिरा गांधींनी एकटीच्या जीवावर पुन्हा उभं केलं होतं. त्यांच्या करिष्म्यामुळे काँग्रेसचे सगळे जुने नेते पक्ष सोडून गेले असतानाही काँग्रेसने जनता पक्षाचा मोठा पराभव करून पंतप्रधानपद जिंकलं होतं.

आणीबाणीच्या काळात भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहचलेले संजय गांधी मात्र आता काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसायचं कमी झाले होते. इंदिराजींच्या नव्या मंत्रिमंडळात देखील ते नव्हते. अजूनही त्यांची ओळख इंदिरा गांधींचे वारस अशीच होती मात्र पूर्वी प्रमाणे थेट मंत्र्यांची कानउघडणी करण्याचा अतिउत्साह, आक्रमकपणा मात्र आता कमी झाला होता.

काँग्रेस पक्ष संघटनेवर त्यांची पकड कायम होती.

संजय गांधींचं व्यक्तिमत्व मुळात एकलकोंड्या स्वभावाचं होतं. ते पार्टीवगैरेंच्या कल्चरपासून दूर असायचे. त्यांचं विशिष्ट मित्रसर्कल वगळता ते जास्त लोकांच्यात मिसळायचे देखील नाहीत. त्यांच्या पत्नी व भाजपच्या माजी मंत्री मनेका गांधी यांच्या अनुसार संजय गांधी यांना कपड्यांचा पण बडेजावपणा आवडायचा नाही.

अगदी सेम फिरोज गांधींच्याप्रमाणे दिसणारे संजय गांधी कितीही मोठा कार्यक्रम असू दे, डोळ्यावर मोठा चष्मा, खादीचे साधे कपडे आणि पायात चप्पल याच वेशात ते असायचे. हे चप्पल देखील खास कोल्हापुरी असायचे. महागडे शूज घालणे वगैरे त्यांना आवडायचं नाही.

राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनात त्यांचा एकच विरंगुळा होता तो म्हणजे विमान उडवणे.

ते काही आपल्या भावाप्रमाणे प्रोफेशनल पायलट नव्हते मात्र त्यांनी कमी वजनाचे विमान उडवण्याचे लायसन्स मिळवले होते. त्यांना हवेत विमानाची कलाबाजी करायला आवडायची. त्यांनी व इंदिरा गांधींचे योग गुरु धीरेंद्र ब्रम्हचारी यांनी प्रयत्न करून पिट्स s२ हे ऍक्रोबॅटिक कसरतीचे विमान भारतात मागवले होते.

२१ जून १९८० रोजी हे विमान दिल्ली फ्लायिंग क्लब वर आले. संजय गांधींनी अगदी पहिल्या दिवसापासून हे विमान उडवण्यास सुरवात केली. चालवण्यास अत्यंत अवघड व धोकादायक अशी कुप्रसिद्धी पिट्स विमानाची होती. या विमानावरून मनेका गांधी आणि संजय गांधी यांच्यात भांडणे देखील झाली होती.

इंदिरा गांधींनी देखील त्यांना समजावून सांगितलं होतं पण संजय गांधी हट्टी स्वभावाचे होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी मनेका गांधींना सोबत घेऊन विमान चालवलं. त्यातून त्यांची भीती मोडावी हा हेतू होता. पण तस काही घडलं नाही. संजय गांधी करत असलेल्या हवाई कसरती पाहून मनेका गांधी आणखी घाबरल्या.

एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या राजीव गांधी यांनी संजय गांधींची कान उघडणी केली.

विमान चालवताना पायात शूज घालणे आवश्यक आहे हे समजावून सांगितलं. संजय गांधींच्या कोल्हापुरी चपलेमुळे विमानावरचा कंट्रोल सुटू शकतो यावरून त्यांना लेक्चर देण्यात आलं. पण आपल्या नेहमीच्या बिनधास्त स्वभावाप्रमाणे संजयनी राजीव गांधींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

सलग तिसऱ्या दिवशी अगदी सकाळी ते सफदरजंग विमानतळावर गेले. यावेळी त्यांच्याबरोबर ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे देखील येणारं होते.

पण त्यांना येण्यास उशीर होत असल्यामुळे संजय गांधी त्यांची वाट पाहण्यास थांबले नाहीत. फ्लायिंग इन्स्ट्रक्टर सुभाष सक्सेना तिथे जवळच राहत होते. संजय गांधी त्यांच्या घरी जाऊन थडकले. त्यांना बळजबरीने आठवून आणलं आणि दोघे विमानात बसले.

पिट्स विमानाने अगदी तीन फेऱ्या व्यवस्थित मारल्या पण अचानक त्याने गिरकी घेतली आणि ते एकदम जमिनीच्या दिशेने आले. सर्व सामान्य दिल्लीकर भल्या सकाळी एवढ्या खालून कोण विमान उडवत आहे याकडे उत्सुकतेने पाहत होता. काही सेकंदातच विमान थेट जमीन वर आदळले. स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला. काळ्या धुराचं लोट हवेत उडाले.

काही क्षणात पंतप्रधानांच्या निवासस्थानात बातमी पोहचली. इंदिरा गांधी घटनास्थळावर आल्या तेव्हा त्यांच्या लाडक्या मुलाच्या शरीराचे अनेक तुकडे झाले होते.

२३ जून १९८० रोजी विमान अपघातात झालेल्या संजय गांधींच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला. याच्या  देशभरात अनेक उलटसुलट चर्चा देखील झाल्या. विमानात मुद्दाम बिघाड करण्यात आला होता इथं पासून ते त्यांनी घातलेल्या कोल्हापुरी चपले पर्यंत प्रत्येक गोष्टीवर नाव घालण्यात आले.

राजीव गांधींनी सांगितल्याप्रमाणे जर चपले ऐवजी शूज वापरले असते तर किनास ठाऊक संजय गांधी यांचा जीव वाचला देखील असता. पण हट्टी स्वभावाने त्यांचा बळी घेतला.

राजकीय चष्म्यातून या अपघाताकडे पहिले गेले. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे या मृत्यूचं गूढ देखील सर्वसामान्य जनतेमध्ये कायम राहिलं.  

संजय गांधींचा मृत्यू घातपात नव्हता तर त्यांच्या उतावळेपणामुळे व नवशिके असूनही पिट्स विमान चालवण्याचं वेड धाडस करण्यामुळे झाला होता. सत्तरच्या दशकात वादळाप्रमाणे आलेले संजयपर्व संपुष्टात आले होते. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.