त्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..

संजय गांधी यांचा भारतीय राजकारणात एक काळ होता. हा माणूस कोणत्याच खात्याचे मंत्री नव्हता पण तेव्हा संपूर्ण कॉंग्रेस मध्ये संजयचा शब्द शेवटचा असायचा. संजय तरुण होते कामाच्या बाबतीत धाडसी होते. कॉंग्रेस मध्ये तेव्हा संजयचे चालायचे.

ते संजय पर्व होतं.

इंदिराजींना भेटणं त्यांचा वेळ मिळवणं सोपं नसल्याने अनेक काँग्रेसी पक्षात आपली उंची वाढवण्यासाठी संजय गांधीच्या पुढे पुढे करत. संजय तरुण होते, अविवाहित होते, दिसायला स्मार्ट होते. त्यामुळे अनेक मुली ही त्यांच्या अवती भवती फिरत.

ल्युटनस दिल्लीच्या वर्तुळात तेव्हा असच एक नाव गाजत होते. ते म्हणजे रुखसाना सुलताना या बाईचं. रुक्साना आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या प्रचंड जवळ होत्या.इतक्या की संजय गांधीना सांगायच्या गोष्टी लोक रुक्साना सुलताना यांना सांगत, त्यांना असे वाटे की रुक्सानाला सांगितले म्हणजे संजय यांच्या पर्यंत ती गोष्ट लवकर पोहचेल. संजय रुक्साना यांच्या अफेअरच्या चर्चा तेव्हा जोरात होत्या.

पुढे काही वृत्तपत्रात अशा बातम्या छापून आल्या की संजय गांधीना एक मुलगी आहे.

त्याकाळी गूगल नसल्याने लोकांनी रुक्सानाची मुलगी अमृता सिंग, हीच संजय ची मुलगी आहे असा अर्थ त्या बातम्यांमधून लावला. पुढे संजय गांधीच अस्तिवात राहिले नाहीत आणि ती चर्चा अशीच विरून गेली लोक ते विसरून गेले. मध्यंतरी बरीच वर्षे गेली. संजय गांधीची बायको मनेका गांधीनी पुढ भाजपामध्ये प्रवेश केला. त्या मंत्री आणि त्यांचा मुलगा भाजपचा खासदार झाला. भाजपाचा तो हिंदुत्वाचा चेहरा बनला.

मग २०१७ उजाडलं. तेव्हा अचानक एक बाई उगवल्या त्यांच नाव प्रिया सिंग पॉल वय ४८. त्यांनी दावा केला की त्या संजय गांधी यांची मुलगी आहेत. पूर्ण देशभर खळबळ उडाली. पॉल यांच्या म्हणण्या नुसार,

“संजय गांधींची मुलगी अमृता असणे शक्य नाही कारण अमृताचा जन्म १९५८ चा आहे तेव्हा संजय गांधी तेरा वर्षांचे होते. माझा जन्म १९७४ चा आहे. संजय गांधींच लग्न मनेका गांधीशी त्याच वर्षी झालं. ते होण्या आधी मला पंजाब मध्ये एका शीख कुटुंबाला दत्तक देण्यात आले होते. माझं मूळ नाव प्रियदर्शनी गांधी असे होते पण नंतर माझे नाव प्रिया सिंग पॉल असे झाले.”

त्यांच्या मते त्यांना २०१० सालापर्यंत ही गोष्ट माहितीच नव्हती की संजय गांधी त्यांचे वडील आहेत.

अमेरिकेतून शिक्षण आणि काही वर्ष काम केल्यानंतर जेव्हा त्या दिल्लीत रहाण्यास आल्या. तेव्हा  माजी पंतप्रधान आय.के.गुजराल यांच्या कुटुंबातील विमला गुजराल यांनी प्रिया यांना दिल्ली आणि राजकारण दोन्ही पासून दूर रहाण्याचा सल्ला दिला. प्रिया पॉल यांना ते विचित्र वाटले त्यांनी खोदुन विचारल्यानंतर विमला यांनी सांगितलं,

“तू संजय गांधी यांची मुलगी आहेस. “

तेव्हा प्रिया पॉल भारत सरकारमध्ये अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल होत्या. त्या कॉमन वेंल्थ गेमसच्या क्रायसिस मॅनेजर होत्या. तुझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होऊ शकते त्यामुळे तू राजकारण, सरकार या गोष्टींपासून लांब रहा असे त्यांना सांगण्यात आले.

पण प्रिया पौल यांनी दिल्लीतच राहून स्वतःच खरं अस्तित्व शोधून काढायचे ठरवले. आणि त्यांनी सर्व कागदपत्राची शोधाशोध सुरू केली. त्यांच्या हाती स्वतःची काही दत्तक पत्रे सापडली ती घेऊन प्रिया पॉल दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात गेल्या.

कोर्टात केस चालु झाली मात्र एक अनपेक्षित गोष्ट घडली ती म्हणजे संजय गांधींचे जुने मित्र ज्यांना आज काल गोस्वामी सुशीलजी महाराज म्हणून ओळखले जाते त्यानी कोर्टात प्रिया पॉल यांच्या बाजूने अॅफिडेवीट दिले. तेव्हा सुशील महाराज यांनी मिडिया मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की,

“मी संजय गांधींचा चांगला मित्र होतो. मला त्यांच्या जीवनातील अनेक अंतर्गत पैलू माहीत होते आणि अशी गोष्ट तेव्हा घडली होती, तेव्हाच्या अनेक पेपर्स मध्ये त्याच्या बातम्या ही  आल्या होत्या.पुढे ते असं म्हणाले संजय गांधी मोठ्या राजकीय कुटुंबातील असल्याने हि बातमी तेव्हा दाबण्यात आली होती.”

हे प्रकरण लोकांमध्ये २०१७ साली परत चर्चेला आलं त्याचं कारण मधुर भांडारकरच्या “इंदू सरकार” हा आणीबाणी वरचा सिनेमा येणार होता. प्रिया पॉल यांना माहिती मिळाली की त्या सिनेमात संजय गांधी यांचं पात्र अत्यंत नकारात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहे. प्रिया पॉल यांनी सेन्सरबोर्ड सहित, निर्माते आणि दिग्दर्शक मधुर यांना नोटीसा पाठवल्या.

त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतल आणि सांगितले,

“मला माझ्या अस्तित्वाची लाज नाही वाटत मी संजय गांधीची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. मझ्या वडिलांच्या प्रतिमेला जर अशा नकारात्मक प्रकारे मांडणार असेल तर त्यांना रोखणे मी माझे कर्तव्य समजते. “

त्यांच्या या पत्रकार परिषदेवर सध्याच्या गांधी कुटुंबातून काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

अनेकांनी सांगितल्यावर पॉल यांनी स्वतःची ancestry टेस्ट करून घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या टेस्टच्या रिपोर्ट मध्ये त्या पारसी असल्याच आणि त्यांचे मूळ काश्मिरी पंडित असल्याच सिद्ध झालं. हेच मूळ नेहरू गांधी घराण्याच आहे.

ते सगळ झालं पण प्रिया पॉल यांच्या आईचं काय?

प्रिया पॉल कुठेच त्यांच्या आईचा उल्लेख करत नाहीत त्या म्हणतात,

” मी माझ्या जन्मदात्या आईच्या ही शोधत आहे. लहानपणी ती मला कधी भेटल्याचे ही आठवत नाही. माझ्या लहानपणी  संजय गांधी मला पंजाब मधील माझ्या शाळेत भेटायला यायचे ते मला खूपच प्रेमाने भेटायचे पण ते मला त्यांचे नाव कबीर म्हणून सांगायचे मी तेव्हा त्यांना कबीर अंकल म्हणून ओळखायची. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मला शाळेच्या होस्टेल मधून एका बस ने तीन मूर्ती भवन ला अंतिम दर्शनासाठी नेण्यात आल होत. सेम असचं संजय गांधींच्या मृत्यूवेळी देखील मला पंजाब वरून दिल्लीला आणल गेल.”

ही सर्व प्रिया पॉलयांची बाजू आहे. सध्या त्या पूर्णवेळ दिल्लीत राहून ही केस लढत आहेत, स्वतःला संजय गांधींची मुलगी सिद्ध करण्यासाठी.

शेवटी प्रिया पॉल एवढाच म्हणतात की संयुक्त राष्ट्राच्या चार्टर नुसार प्रत्येक मुलाला त्याचे आई वडील कोण आहेत हे जाणण्याचा अधिकार आहे आणि मला स्वतःचा तो अधिकार हवा आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बघूया काय होतय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.