संभाजीराजेंनी जे गणित मांडलय त्याच गणितावर 2014 साली संजय काकडे खासदार झाले होते

छत्रपती संभाजीराजे यांचा खासदारकीचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. त्यांनी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी सुद्धा केली आहे. ज्या प्रकारे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी समीकरण मांडले आहे त्याच प्रमाणे माजी खासदार संजय काकडे यांनी २०१४ मध्ये राज्यसभेची निवडणूक लढविली होती.

तेव्हा त्यांना अपक्षासह सर्व पक्षाचा पाठिंबा मिळाला होता आणि ते बिनविरोध निवडून आले होते. 

२०१४ मध्ये राज्यसभेची निवडणूक ही ७ जागेसाठी होणार होती. काँग्रेस आमदार आणि मंत्री सुभाष झनक यांच्या मृत्यूमुळे विधानसभेची संख्या २८७ झाली होती. राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी ३६ मतांचा कोटा लागणार होता. 

काँग्रेसकडे ८१ आमदार तर राष्ट्रवादीकडे ६२ आमदार होते. शिवसेनेचे ४५, भाजपचे ४७ आमदार विधानसभेत होते. तर मनसे १२, शेतकरी कामगार पक्षाकडे ४, समाजवादी पक्षाचे ३, अपक्ष असे  महानमोठ्या पक्षाचे २८ आमदार होते.    

आमदारांच्या संख्येनुसार दोन काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादीचे, एक शिवसेनाचा आणि भाजपचा एक खासदार सहज निवडून येऊ शकत होता. मात्र ७ उमेदवारासाठी सगळ्याचं पक्षांना आणि काही मते कमी पडत होते. 

खासदार निवडून येण्यासाठी ३७ मतांचा कोटा होता.

शिवसेनेकडे ८ आणि भाजपाकडे १० अतिरिक्त मते होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे त्यांचे ४ उमेदवार निवडणून येणार होते. जर कुठल्याही पक्षाने एक अधिकचा उमेदवार उभा केला असता आणि अपक्ष म्हणून संजय काकडे देखील उभे राहिले असते तर ७ जागेसाठी ८ उमेदवार झाले असते आणि निवडणूक घ्यावी लागली असती.

त्यावेळी विधानसभेतील लहान मोठ्या पक्षातील आणि काही अपक्ष अशा ३२ अपक्षांचा संजय काकडे यांना पाठिंबा मिळाला होता. तसेच संजय काकडे यांच्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतांना त्यावर १० अपक्ष आमदारांची सही होती. 

यावेळी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि माजिद मेमन, काँग्रेसकडून हुसेन दलवाई आणि मिलिंद देवरा, सेनेकडून राजकुमार धूत आणि भाजपने आपल्या वाट्याची जागा रामदास आठवले यांना दिली होती.

७ व्या जागेवर संजय काकडे अपक्ष म्हणून उभे होते. 

अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांचे अतिरिक्त मते आपल्या बाजूला वळवत २०१४ मध्ये संजय काकडे अपक्ष खासदार निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.

याबाबत बोल भिडूशी बोलतांना संजय काकडे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत ३७ मतांचा कोटा असतांना कुठल्याही पक्षाकडे १२ ते १३ पेक्षा जास्त मते नव्हती. मला मनसेचे १२ आमदार, शिवसेनेच्या ८, भाजपचे १० आणि अपक्ष असे एकूण ५२ आमदारांचा पाठिंबा होता. माझ्या विरोधात सज्जन जिंदल यांना उभे करण्याची तयार केली होती. मात्र, मी अगोदरच सर्व तयारी केली होती. जिंदल यांना ही गोष्ट कळाली त्यामुळे त्यांनी माघार घेतली. 

तसेच भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, अबू आझमी, भाई ठाकूर यांनी पाठिंबा दिला होता.

संजय काकडे यांनी मात्र खासदार होण्यासाठी २०१२ मध्ये फिल्डिंग लावली होती. 

२०१२ मध्ये पहिल्यांदा संजय काकडे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. यावेळी राज्यातुन ६ खासदार राज्यसभेवर जाणार होते. संजय काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती.

घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय काकडे यांना माघार घ्यावी अशी विनंती केली होती. यानंतर संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली होती.

तसेच मी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात निवडणूक लढविणार नाही आणि पवारांच्या विरोधात जाणार नसल्याचे सांगितले होते. तसेच निवडणुकीतून माघार घेतल्यास आमदारकी अथवा इतर कुठलेही आश्वासन मिळाले नसल्याचे स्पष्ट केले होते.

यावेळी महाराष्ट्रातून भाजपकडून अजय संचेती, काँग्रेकडून विलासराव देशमुख आणि राजीव शुक्ला, तर राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर निवडून गेले होते.

काकडे यांच्या माघारीने निवडणूक बिनविरोध झाली होती. 

२०१२ राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे त्यांनी मोट बांधायला सुरुवात केली होती. त्यांनी या दोन वर्षात राज्यातील सर्व अपक्ष आमदाराला आपल्या बाजूला वळविले होते.

आत्ता असाच पेचप्रसंग संभाजी राजेंच्या रुपात सर्व पक्षांच्या समोर उभा आहे. संभाजीराजेंना पाठींबा द्यायचा की इतर उमेदवार उभा करून निवडणूक घडवून आणायची हे आत्ता सत्तेची बेरीज वजाबाकीच ठरवेल..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.