बिनमिशीवाल्या अनिल कपूरला इंग्लंडच्या संसदेने बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार दिलाय

भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ आणि एक नंबरच घराण कुठल हे विचारल तर सगळे म्हणतील कपूर फॅमिली. पेशावर मधून मुंबईत आलेले पृथ्वीराज कपूर हे त्यांचे मूळपुरुष. पुढे राज कपूर, शशी, शम्मी, ऋषी, करीना करिश्मा रणबीर अशी अनेक फळे या वंशवृक्षाला लागली. पण एवढ्यावर ही फॅमिली थांबत नाही. त्याच्या अनेक फांद्या आहेत. यापैकी आणखी एक म्हणजे सुरेंदर कपूर फमिली.

हे पृथ्वीराज कपूर यांचे चुलत भाऊ. पृथ्वीराज सिनेमात सुपरस्टार झाल्यावर त्यांनी आपल्या या भावालासुद्धा पेशावर मधून मुंबईला आणल. तेही फिल्मइंडस्ट्रीत घुसले. अभिनेता म्हणून नाही तर वेगवेगळ्या अभिनेत्यांचे असिस्टंट म्हणून. पुढे स्वतः प्रोड्युसर झाले.

त्यांची सगळ्यात झक्कास निर्मिती म्हणजे त्यांचा लेक “अनिल कपूर”.

आता या बालकलाकाराशिवाय अजून दोन मुले त्यांना आहेत. एक म्हणजे श्रीदेवीपती बोनी कपूर आणि सगळ्यात शेंडेफळ म्हणजे संजय कपूर. हां तोच अनिल कपूर मायनस मिशी म्हणजे संजय कपूर.

तर विषय असा आहे की अख्ख्या कपूर फॅमिलीत म्हणजे जिथे अर्जुन कपूर, राजीव कपूर, सोनम कपूर,जान्हवी कपूर असे अनेक हिरे जन्माला आलेत त्यातही अभिनयात सर्वात ढ कोण असेल तर संजय कपूर. होय अगदी करिनाच अडीच वर्षाच बाळ तैमुरसुद्धा या संजयपेक्षा चांगली अॅक्टिंग करतो असं तज्ञांच म्हणन आहे.

एवढ असूनही संजय कपूरला(श्वास रोखून वाचा) इंग्लंडच्या संसदेनी Most Inspiring Indian Actor चा पुरस्कार दिला. खुद्द त्याने इन्स्टाग्रामवर हा फोटो टाकलाय.

तेव्हा पासून अख्ख्या भारतवर्षात आक्रोश पसरलाय. सोशलमिडिया खुळी झाली. मोदीजीच अमेरिकेतील हाउडी मोदीवालं भाषण माग पडल आणि चर्चा फक्त संजय कपूर. मारामारी झाली. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार  सोडा गेला बाजार अनुपम खेर, विकी कौशल तरी द्यायचं. एकदम डायरेक्ट संजय कपूर? अनेक राजकारणी सुद्धा लाजले. आम्ही काय मेलो होतो काय?

संजय कपूरला हा पुरस्कार का मिळालाय हा संशोधनाचा विषय आहे. त्याने कुठे कुठे सेटिंग लावली यामागे गुप्तहेर सोडलेत. आम्ही पण थोडाफार अंदाज लावायचा प्रयत्न केलाय.

खर तर संजय कपूरला आज कालची पिढी ओळखत नसेल. तर एक काळ असा होता आम्ही नव्वदीतल्या दशकातले लोक अगदी थिएटरमध्ये जाऊन त्याचे सिनेमें बघून आलो होतो. (ते धाडस होतं आम्हाला मान्य आहे) 

संजय कपूर आला तेव्हा अनिल कपूर अगदी फुल फॉर्ममध्ये होता. एकदम झक्कास पिक्चर करत होता. बोनी कपूरची प्रोडक्शन कंपनी सुद्धा भारी चाललेली. आता पूर्ण घरात चिकना (दाढीला कमी कष्ट लागणारा) म्हणून संजय सुद्धा सिनेमात आला. पहिल्याच पिक्चरची हिरोईन होती तब्बू. (तिचा पण पहिला पिक्चर ओ) ह्यांना लॉन्च करणार होते स्वतः शेखर कपूर(हॉलीवूडवाले). बोनीने पैसे लावले होते. पण संजयच्या नशीबाची माशी सुरवातीलाच शिंकली.

पिक्चर रिलीज व्हयला सहा वर्ष लागले. डायरेक्टर बदलला. दुर्दैवाने “प्रेम” फ्लॉप झाला. पण पाठोपाठ आलेल्या एका पिक्चरने त्याला हात दिला(प्रेक्षकांच्या दुर्दैवाने). नाव होत राजा. हिरोईन होती धकधकगर्ल माधुरी. पिक्चर चांगला चालला पण त्यापेक्षा एक गाण गाजलं, 

” अखिया मिलाऊ कभी अखिया चुरांऊ कभी मुझपे किया जादू”

सुपरस्टार माधुरीने यात दिलखेच डान्स केला होता. तिच्या डान्स स्टेप गण्डल्या तर कशा दिसतील हे दाखवत संजय कपूर संपूर्ण गाण्यात वावरला होता. तसंही त्याच्या कडे कोण लक्ष दिल नाही, गाण सुपरहिट झालं. नाही म्हटल तरी संजयला याचा फायदा झाला. तेजाबवाल्या एनचंद्रा यांचा बेकाबू, सलमान बरोबरच औजार, शिल्पा शेट्टी बरोबरच जमीर असे अनेक सिनेमे आले. काही चालले पण संजय काही चालला नाही.

त्यातच १९९९ साली एक सिनेमा आला, सिर्फ तुम. हा पिक्चर खऱ्या अर्थाने संजय कपूरचा सगळ्यात हिट पिक्चर. तमिळ सिनेमाचा रिमेक होता, त्याच डायरेक्टरने बनवलेला. बिचाऱ्याला अनिल कपूरला घ्यायचं होतं पण बजेट कमी म्हणून संजय कपूरला घेतल.

पिक्चर चांगला चालला पण त्याहूनही गाणी खूप गाजली. सुस्मिता सेनच दिलबर दिलबर वरच आयटम सॉंग तर अजूनपण काळजात धडकी मारत. या शिवाय पेहली पेहली बार मोहबत्त की है, एक मुलाकात जरुरी है सनम, सिर्फ तुम हे टायटल सॉंग  आजही मराठवाड्यातल्या खेडेगावात स्पीकर वर वाजत असलेली ऐकू येतात. नदीम श्रवण या जोडगोळीचा हे म्युजिक.

का कोणास ठाऊक मात्र या पिक्चर नंतर संजयकडे हिरोचे रोल यायचे कमी झाले. जे आले ते सुपरफ्लॉप झाले. शक्ती द पॉवर, कयामत,एलओसी कारगिल अशा सिनेमात त्याला साईड रोल मिळत गेले. नवद्दीमध्ये अडकलेले त्याचे हिरोवाले पेंडिंग सिनेमेसुद्धा आले, ज्युली नावाचा सॉफ्ट पोर्नसुद्धा करून बघितला. सगळे प्रयोग फ्लॉप झाले. संजय कपूरच करीयर संपलं. 

मग तरी संजय कपूरला हा पुरस्कार का या मुख्य मुद्द्याकडे वळूया. अहो टीव्ही सिरीयल मध्ये काम करत असून साधा स्टार अवार्ड मिळाला नाही आणि थेट इंग्लंडचा ऑस्कर म्हणवला जाणारा पुरस्कार? 

खर तर संजय कपूरची धुगधुगी अजून संपलेली नाही. झोया अख्तरच्या लक बाय चान्स, आलीय बरोबरचा शानदार, लस्ट स्टोरीज, खिलाडी अक्षय बरोबरचा मिशन मंगल, झोया फॅकटर अशा सिनेमाच्या माध्यमातून त्याने दुसरी इनिंग सुरु केली आहे. त्याच स्वतःच या पुरस्काराबद्दल मत विचारल तर तो म्हणतो की लस्ट स्टोरी आणि मिशन मंगलमधल्या अभिनयामुळे मला हा पुरस्कार मिळालाय. (आपल्याला काही पटत नाही. लस्ट स्टोरी साठी द्यायचाच होता तर कियारा अडवाणीला तरी द्यायचं राव)

दुसरी शक्यता अशी बोलुन दाखवली जातीय की त्याने हा पुरस्कार विकत घेतलाय.

आता तसं म्हटल तर त्याच्या भावाने अनिल कपूरने फिल्मफेअर विकत घेऊन आमीरच अवाॅर्ड फंक्शनला यायचं बंद केलेलं. पण फिल्मफेअर कुठ आणि ब्रिटीश संसदेचा पुरस्कार कुठ? एकेकाळी भारतावर राज्य जिथून चालवलं गेल अशा ठिकाणी दिला जाणारा पुरस्कार विकत घेणे संजयच्या खिशाला परवडत का हा मुख्य प्रश्न आहे.

आणखी एक थेरी म्हणजे बॉलीवूडचा माजी सुपरस्टार शाहरुख खान हा संजयचा खास मित्र आहे. त्याच्या कल हो ना हो, ओम शांती ओम सारखी पिक्चरमध्ये झलक दाखवायची संधी संजयला मिळाली होती. शाहरुखच्या प्रत्येक पार्टीत सेलिब्रिटी गेस्ट मध्ये संजय दिसत असतो. वरून या दोघांच्या मुली देखील एकमेकींच्या जिगरी आहेत. मग या कनेक्शनचा संजयच्या पुरस्काराशी काही संबंध आहे का हा अँगल पण लोक विचारात घेत आहेत.

किती जरी डोस्क खाजवल तरी हे कोड काही उलगडत नाही. महाभारतातल संजय, संजय गांधी,संजय दत्त या सगळ्या संजयनी आपल्या भोवती जे गुढतेचे वलय बनवल होत या यादीत संजय कपूरचा नव्याने समावेश झालाय. 

यापूर्वी नॉर्वे सरकारने सुद्धा त्याला असा पुरस्कार दिलाय. संजयच्या या यशामुळे भारताच परराष्ट्र खात सुद्धा हवालदिल झालंय. भारतात संसदरत्न मिळवून दमलेले नेते आता संजयकडून ब्रिटीश संसदरत्न मिळवता येते का याचे टिप्स घेत आहेत असं आम्हाला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं.

(गंमत म्हणून ही पोस्ट लिहिली आहे. यातून जर संजय कपूरचा किंवा त्या पुरस्काराचा अपमान झाला तर निव्वळ योगायोग समजावा. जगभरात चुकून कोणीही संजय कपूरचे कोणी फॅन असतील तर त्यांनी आम्हाला माफ करावे, शिव्या देऊ नये)

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. ईश्वर रावळ says

    “संजय नाव आणि त्याच्या भोवतीचं गुढतेचं वलय” हा मुद्दा खास आवडला ????

Leave A Reply

Your email address will not be published.