कधीकाळी पुण्यातल्या रस्त्यावर पोस्टर विकणारा तो आज कोट्याधीश झालाय!

जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर जगातली कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अवघड नाही. एकवेळेस कमी शिक्षण असेल तरी चालेल मात्र मेहनत करण्याची इच्छा हवी. ती असली की तुम्ही आकाशालाही गवसणी घालू शकता.

काहीतरी वेगळं सुरू करण्याच्या धडपडीतून संजय लाहोटींचा २०० रूपयांवर सुरू झालेला व्यवसाय आज कोटींच्या घरात पोहचलाय. मात्र यापाठीमागं सजंय लाहोटींची अफाट मेहनत आहे, कडवा संघर्ष आहे आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. या अशाच अवलियाची मुलाखत आमच्या भि़डू कार्यकर्त्यांनं घेतलीय.

संजय लाहोटींचं मुळ गाव सातारा. वडील गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती. पार्टनरशिपमध्ये महाराष्ट्रातील पहिलं हाॅस्पीटल त्यांच्या वडीलांनी साताऱ्यात सुरू केलेलं.

संजय लाहोटींना तीन भावंडं. संजय हे तिघांपैंकी मधले. वडिल डाँक्टर असल्यामुळे संजय यांनी सुद्धा डाॅक्टर व्हावं ही त्यांची वडिलांची इच्छा. मात्र लहानपणासून संजय यांना चित्रकलेबद्दल आवड होती. त्याकाळी निघणाऱ्या चंपक मासिकातले चित्र ते रंगवायचे. कॅनरा बॅकेनं घेतलेल्या एका स्पर्धेत त्यांचा नंबरही आला होता. संजय हे अभ्यासात हुशार होते. १० वीला त्याकाळी ७४ टक्के मार्ग त्यांनी मिळवलं होते. १० वी नंतर संजय यांनी कॉलेजला अँडमिशन घेतलं. मात्र त्यांना शिक्षणात रस नव्हता. डाॅक्टर व्हायचं नव्हतं.

संजय लाहोटी सांगतात ,

मला सायन्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि डॉक्टर होण्यात तर अजिबातच नाही. मात्र हे वडिलांना सांगता येत नव्हतं. कारण घरात वडिलांचा धाक होता. त्यांची कडक शिस्त होती. त्यामुळे त्यांना कधी त्याबद्दल सांगितलं नाही आणि आजही समोर सांगायची हिम्मत नाही.

सायन्समध्ये मन रमत नव्हतं. त्यामुळे थेटरमध्ये पिक्चर पाहायचा नाद लागला. सारखे पिक्चर पाहायचो त्यामुळे १२ वीचा अभ्यास झाला नाही. अभ्यास न झाल्यामुळे दोन पेपरच दिले आणि घरी निघून आलो. १२ वीच्या परिक्षेत नापास झालो. मात्र काहीतरी वेगळं करायचं असं नेहमी वाटायचं. त्यामुळे इथून बाहेर कुठं तरी गेलं पाहिजे असं डोक्यात शिजत होतं.

सालं होतं १९८८. एके दिवशी घरातून २०० रूपये चोरले आणि बॅग घेवून मुंबईला पळून गेलो.

माझ्यासाठी मुंबई नवखी होती. तिथं कुठं रहायचं काय करायचं हे अजिबात माहित नव्हतं. काम शोधण्यात दोन-चार दिवस गेले. कुठं कामाचा अनुभव नव्हता कोणी कामही द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे दोन चार दिवसातच सोबतचे पैसे संपले आणि परत घरी आलो.

त्यावेळी जास्त संवादाची साधनं नव्हती म्हणून घरच्यांनी एकदा पेपरमध्ये पोरंग हरवलंय अशी जाहिरात दिली होती. मात्र पोरगं आता परत घरी आलंय म्हणून घरच्यांनी जास्त विचारपूस केली नाही. मात्र,तरीसुद्धा पळून जायचं हे नक्की होतं. पळून जायचं तर सोबत जास्त पैसे हवेत. म्हणून मित्रांच्या घरी चोरी केली.

गावात वडिलांची प्रतिष्ठा होती. त्यावेळी वडिल १७ संस्था चालवत होते. आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या पोरानं चोरी केलीय म्हणून वडिलांच्य़ा प्रतिष्ठेला धक्का बसला. त्यांची गावात बदनामी झाली. त्यामुळे वडिलांनी माझ्यावर राग धरला.

असल्या सगळ्या पराक्रमामुळे मामानं मला कऱ्हाडला नेलं. परत १२वीला पुन्हा सायन्सला अँडमिशन घेऊन दिलं. पहिल्यांदा सायन्सला होतो म्हणून पळून गेलो होतो आणि इथंही सायन्स घेऊन दिल्यामुळे ते सगळं डोक्यावरून जात होतं. त्यामुळे पुन्हा पण पळून जायचा प्लॅन डोक्यात सुरू झाला. त्यामुळे जर्नलला, परिक्षेला पैसे लागतात असं म्हणून मामाकडून पैसे घ्यायचो आणि साठवून ठेवायचो. जवळपास २००० रूपये साठले होते. ते घेऊन पुन्हा मुंबईला पळून गेलो.

मात्र, मुंबईत बस्तान बसवता आलं नाही त्यामुळे पुण्याला आलो. तिथं काही दिवस लाॅटरी विकायचं काम केलं. लॉटरी विकतांना एक मित्र झाला होता. परिक्षेला डमी मुलगा हवाय? सगळ्या पेपरचे २००० हजार रूपये मिळतील असं त्या मित्रानं सांगितलं होतं. त्यासाठी रास्ता पेठेत डमी परिक्षेसाठी बसायचं म्हणून अभ्यास करत होतो तेव्हा एका पोस्टर विकणाऱ्या माणसांशी ओळख झाली होती. त्या परिक्षेचे २०० रूपये मिळाले आणि बाकीच्या पैशासाठी त्याच्या झोपडपट्टीत राहायला गेलो.

२०० रूपये भेटले होते. त्या २०० रूपयांमधून पोस्टर विकत घेतले. इथंनूच खऱ्या अर्थानं या व्यवसायाला सुरूवात झाली. १० वीच्या परिक्षेच्या पैशांवरच आजचा हा कोटींचा व्यवसाय उभा असल्याचं संजय लाहोटी सांगतात.

मात्र, या सगळ्या दरम्यान घरच्यांशी त्यांचा जास्त संबधं येत नव्हता. मात्र संजय रस्त्यावर पोस्टर विकतोय हे त्यांच्या घरच्यांना माहित होतं. मात्र आपल्या पाहुण्यात संजयच्या या कामामुळं आपली इज्जत जाईल म्हणून त्य़ांना मोठ्या भावाच्या लग्नात बोलवण्यात आलं नव्हतं. मात्र संजय लाहोटी जिद्दी होते. ते या सगळ्यांशी दोन हात करून लढत होते. त्याचवेळेस काही मित्रांच्या संगतीनं एफसी रोडवर दुकान टाकायच्य़ा खटपटीत ९० हजाराचं कर्ज डोक्यावर झालं होतं.

ते सांगतात की, या दरम्यान आत्महत्या करावी, सगळ्यांचे पैसे बुडून पळून जावं, असं वाटायचं. मात्र मी लढत राहिलो. झोपडपट्टीतून पुन्हा स्वारगेटला राहायला आलो होतो. तिथंच झोपायचो. रात्री पोलिस यायचे. माझ्याकडं पोस्टरची पिशवी आणि एका बॅगेत कपडे असायचे. त्यांना सांगायचो दिवसभर पोस्टर विकतोय. तेही हे समजून घ्यायचे. हळूहळू या धंद्यातलं गणित समजू लागलं.

मुंबईवरून पोस्टर आणून मी इथं होलसेल दरानं विकू लागलो. त्यावेळी “हम आपके है कौन” हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यावेळेस माधुरीचे तब्बल १०३ प्रकारचे पोस्टर माझ्याकडं होते. एकदा मी मित्राच्या घऱी डेहराडूनला गेलो होतो. त्यावेळेस तिथं पहिल्यांदा मधुबालाचं पोस्टर पाहिलं आणि ते पाच ते सहा पोस्टर घेऊन आलो. मधुबालाच्या पोस्टरला त्यावेळी एवढी मागणी होती की ते पोस्टर आम्हांला ब्लॅकनं विकायला लागली होती.

माधुरी, मधुबालाच्या पोस्टरमुळं त्यावेळेस आम्हाला चांगले दिवस आले.

हळूहळू धंद्यात जम बसला. पैसेही मिळायला लागले. त्यामुळे पेठेत एक पत्र्याच्या शेडचं दुकान काढलं. अधूनमधून घरी जात होतो. घरच्यांशी बऱ्यापैकी पटत होतं. तेव्हा वय २६- २७ झालं होतं. मामा आणि घरचे माझ्यासाठी मुलगी पाहत होते. माझी तर काहीच अट नव्हती फक्त मुलगी शिकलेली असायला हवी कारण मुलाला शाळेत घालायला गेल्यावर कोणाला तरी इंग्रजी यायला हवं.

बाकी जी पहिली मुलगी समोर येईल तीला हा म्हणून टाकायचं ठरलेलं होतं. पहिल्याच मुलीनं मला पसंत केलं. ती M.A. POLITICS झालेली. लहानपणापासून चांगल्या घरात वाढलेली. तीनं पसंत करायचं कारण म्हणजे मी काहीतरी वेगळं करतोय आणि तीलाही हे करण्यात इंटरेस्ट होता आणि माझं कसलच बंधन तीला नव्हतं. माझा लग्नाचा बार उडाला होता. बायकोला साताऱ्याला ठेवून मी परत पुण्याला पोस्टर विकायला आलो.

तेव्हा पोस्टरला फ्रेंमीग केलं जातं होतं. त्यासाठी माझ्याकडून पोस्टर घेऊन लोकं फ्रेम करायच्या ऑर्डर द्यायचे. मी तेव्हा फ्रेंमिंग करत नव्हतो. मात्र फ्रेमवाला वेळेवर ऑर्डर द्यायचा नाही. ग्राहक नाराज व्हायचं. म्हणून फ्रेंमीग करायचं शिकलो. स्वत: फ्रेम बनवायला शिकलो. हळूहळू हेही जमलं. अनेकांच्या ऑर्डर यायला लागल्या.

हाताखाली पाच सहा मुलं काम करू लागली. बायकोलाही पुण्यात बोलवंल. तीनेही माझ्या या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम केलं. २००६ साली आम्ही फ्रेंमीगचं मशीन विकत घेतलं त्यानंतर पाठीमागं वळूनच पाहिलं नाही. दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत गेला. सध्या पुण्यात सगळ्यात मोठ्ठं फ्रेमिंगच दुकान आमचं आहे, असं लाहोटी गर्वानं सांगतात.

साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील म्युझीयम, रयत शिक्षण संस्थेचं म्युझीयम, पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट, फिल्म अर्काइव्ह, लातूरमधील विलासराव देशमुख याचं म्युझीयम एवढचं काय तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला ज्या फ्रेम होत्या त्या सगळ्या संजय लाहोटी यांनीच बनवलेल्या आहेत. तंसच त्यांनी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीच्या फोटोलाही फ्रेंमीग केलेल्या आहेत.

संजय लाहोटी यांच्याकडं एवढ्या वर्षाच्या अनुभवातून फ्रेमींगच उत्तम ज्ञान आलं होतं. फ्रेंमीगमधले बारकावे माहित झाले होते. फ्रेंमीगमध्ये ते विशारद झाले होते, मात्र त्यांच्याकडं याबद्दलची सर्टीफाईड डिग्री नव्हती.

माझं काम सगळ्यात भारीय. मला यामधल्या सगळ्याच गोष्टी उत्तमरितीनं समजतायेत. त्यामुळे फ्रेंमीगमधली सगळ्यात भारी डिग्री मला हवीय, असं संजय यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा केली. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांना त्याबद्दल माहिती मिळाली. फ्रेंमीगमधली ही डिग्री २६ देशात वापरली जात होती. भारतात जेमतेम चार ते पाच लोकांनी ही डिग्री मिळवली होती. त्यासाठी त्यांनी फ्रेंमीगमधली सगळ्यात टाॅपची असणाऱ्या या डिग्रीची परिक्षा दिली आणि ते पासही झाले.

महाराष्ट्रात फ्रेमींगची डिग्री असणारे संजय लाहोटी हे एकमेव व्यक्ती आहेत.

मात्र, एवढं सगळं मिळवल्यानंतर वडील काय म्हणतात? असं विचारल्यानंतर संजय लाहोटी म्हणतात, २०१३ साली आम्ही मोठ्ठं प्रदर्शन भरवलं होतं. त्यावेळी माझं प्रदर्शन पाहायला वडील आले होते. तेव्हा तीथं पाहायला येणारे लोकं पाहून ते अवाक झाले. त्यांना माझ्या या कामाचं कौतुक वाटत होतं. ते म्हणतात की, माझ्या तीनही मुलात संजयच जास्त होतकरू आहे. वडीलांची हीच शाबासकी माझ्यासाठी कौतुकाची थाप आहे. असं संजय लोहाटी सांगतात.

मात्र भिडूंनो, संजय लाहोटींनी सध्या आकाशला गवसणी घातली असली तरी हे सगळं करण्यासाठी त्य़ांनी खुप मेहनत घेतलीय, खुप संघर्ष केलाय, अनेकांनी त्यांच्या पखांना बळ दिलंय. त्यामुळे वेगळी वाट निवडणाऱ्या असंख्य तरूण तरूणींना संजय लाहोटींच्या जि्द्दीची कहाणी नक्कीच प्रेरणा देईल. 

१२ मार्च २०१७ रोजी बोल भिडूच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात ‘संजय लाहोटी’ यांच्या जगण्याच्या या लढाईचा बोल भिडू व्यासपीठावर सन्मान करण्यात आला.

  • संजय लाहोटी मो. नं- ९८८११३६९८३

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Shreyas Prakash Suryawanshi says

    Nice story

Leave A Reply

Your email address will not be published.