आपल्या वडीलांना मरताना पाहून संजय लिला भन्सालीला “देवदास” सिनेमा सुचला

कसं शक्य आहे, देवदास सिनेमाची स्टोरी तर खूप जूनी आहे. भिडू तुमचं म्हणणं बरोबर आहे. पिक्चरचा मुळ प्लॉट हा जूनाचं आहे. जूना म्हणजे शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीचा हा प्लॉट.

यावर शाहरूख खानच्या पूर्वी के.एल सैगल आणि दिलीप कुमार यांचा देवदास देखील साकारून झालेला आहे. त्यामुळे देवदास सिनेमाची बेसिक स्टोरीलाईन तर सर्वांनाच माहित आहे. पण या स्टोरीलाईनवर संजय लिला भन्सालीने सिनेमा का केला? आणि त्याला ही स्टोरी नेमकी कधी क्लिक झाली हे महत्वाचं आहे.

संजय लिला भन्सालीने आपल्या घरातले वातावरण नेहमीच आपल्या मुलाखतीतून जाहीर सांगितले आहे. देवदास सिनेमाची स्टोरी सुचण्याचं श्रेय ते आपल्या नावडत्या वडीलांना देतात. त्यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

ते सांगतात की माझं आणि माझ्या वडीलांच कधीच जमलं नाही. माझ्या आईचं नाव लीला होतं आणि तेच मी लावतो. संजय लिला भन्साली यांचे वडील देखील फिल्म प्रोड्युसर होते. त्यांचे सिनेमे चालले नाही. आयुष्यात फेल झाले आणि दारूच्या आहारी गेले. दिवसाचे चोवीस तास ते पिवूनच असायचे.

आपल्या बायकोचं काय चाललय, मुलांच काय चाललय, घर कसं चालवत आहेत याचं त्यांना भान नसायचं. ते नेहमीच दारूच्या बाटलीत मश्गुल असायचे. यावेळी संजयची आई साबण विकून आणि कपडे शिवून पोरांना शिकवत असायची.

इतकच काय तर जेव्हा संजयची आज्जी म्हणजेच संजयच्या वडिलांची आई वारली होती तेव्हा संजयचे वडील दारू पिवून नशेमध्येच अंत्ययात्रेत पोहचले होते. आपली आई वारली आहे आणि तिच्या अंत्ययात्रेत देखील जो माणूस दारू पिवून झोपून राहतो अशा माणसाबद्दल भावनिक नातं संजय लिला भन्सालीचं राहिलं नाही.

कालांतराने परिस्थिती अजून बिघडली. संजयच्या वडिलांना अती दारू पिण्यामुळे लिव्हर सिरोसिस झाला. त्यामुळे ते कोम्यात गेले. कालांतराने कोम्यातून बाहेर आले पण खूप कमी दिवस ते जगू शकतील अस निदान डॉक्टरांनी केलं.

जेव्हा शेवटचा क्षण आला तेव्हा मात्र संजयला त्याच्या वडिलांच दूसरं रुप दिसलं. मरत असताना त्यांनी त्यांच्या आईचा हात हातात घेतला. आपल्या वडिलांच आईप्रती असणारं ते वेगळ रुप त्यांना दिसलं. शेवटच्या क्षणी आईच्या डोळ्यात पहातचं त्यांनी जीव सोडला. त्याच वेळी देवदासची कल्पना त्यांच्या डोक्यात आली…

पुढे शाहरूखसोबत काम करत असताना त्यांनी देवदासची कन्सेप्ट सांगितली. या सिनेमासाठी खोऱ्याने पैसा ओतला.

जेव्हा आपले वडील अखेरच्या क्षणी आईचा हात हातात घेवून होते अशा ठिकाणी शाहरूखचा सीन त्यांनी सिनेमात मांडला तर दूसरीकडे शाहरूखचे वडील वारल्यानंतर शाहरूख दारू पिवून त्यांच्या अंत्ययात्रेच्या ठिकाणी पोहचतो तो आपल्याच वडीलांनी आपल्या आज्जीबाबतीत जे केलं होतं ते त्यांनी सिनेमातून पडद्यावर मांडल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.