वडिलांचं नाव लावण्याऐवजी आईचं नाव भन्साळी का लावतात याची दर्दभरी गोष्ट….
बॉलिवूडमध्ये टॉप दिग्दर्शक यादीत संजय लीला भन्साळी हे नाव येतं म्हणजे येतच. काही अजरामर सिनेमे संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडला दिले आहेत.
देवदास, खामोशी, रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, हम दिल दे चुके सनम हे आपल्या मनात कायमचे कोरले गेलेले सिनेमे आहेत.
संजय लीला भन्साळी यांचे सिनेमे म्हणजे भव्यदिव्य सेट, दिग्गज हिरोईन -हिरो आणि जोरदार प्रमोशन असा सगळा थाट. गाण्यांची रेलचेल सगळं कसं एखाद्या बहारदार आणि परिपूर्ण सिनेमासारखं. सलमान ऐश्वर्या, दीपिका रणविर अशा सगळ्या एव्हरग्रीन हिट जोड्या संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात पाहायला मिळतात.
एखादा महत्त्वाचा विषय घेऊन त्याची व्यवस्थित मांडणी करून त्याचा सिनेमा बनवून संजय लीला भन्साळी कायम आपण एक वेगळे महत्त्व बॉलिवुडमध्ये प्रस्थापित करत असतात. आता हे सगळं झालं संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमॅटिक करियरबद्दलच.
पण जेव्हा जेव्हा आपण संजय लीला भन्साळी यांच्या नावाकडे बघतो त्यामुळे एक प्रश्न साहजिकच पडतो की तो म्हणजे भन्साळी नावामध्ये वडिलांचं नाव लावण्याऐवजी आईचं नाव का लावतात ? तसं तर त्यांनी एक खुलासा आत्ताच त्यांच्या चित्रपटात म्हणजे गंगुबाई काठीयावडी या सिनेमात केलाच आहे की आईचं नाव पुरेसं नाही का ? या डायलॉग मधूनच त्यांनी बरच काही स्पष्ट केल आहे.
तर जाणून घेऊ या संजय लीला भन्साळी आपल्या नावामध्ये आईचं नाव का लावतात.
संजय लीला भन्साळी यांचे वडील प्रोड्यूसर होते. बॉलिवूडमधल्या नामांकित निर्मात्यापैकी ते एक होते. पण सिनेमा हा एक रिस्की बिझनेस आहे याकडे त्यांचे लक्ष गेलं नाही. बॅक टू बॅक सिनेमे फ्लॉप होत गेले आणि संजय लीला भन्साळी यांचे वडील कर्जबाजारी झाले.
आता कर्जबाजारी झाल्याने सहाजिकच व्यसनांकडे ते वळले. दिवस-रात्र दारू पिण्याचे व्यसन त्यांना लागलं. कुटुंब चालवण्याचे सुद्धा वांदे झाले. घरच्या जबाबदारीतून त्यांनी हात काढून घेतला. त्यामुळे सगळं कुटुंब बॅकफूटवर आलं. अशावेळी भन्साळी यांची आई लीला भन्साळी या धीरोदात्तपणे कुटुंबाच्या कठीण प्रसंगाला सामोरे गेल्या.
कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचलली. लीला भन्साळी या गुजराती नाटकांमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. नाटकांमध्ये काम करता करता नाटकांचे व्यवसाय प्रयोग करताना मिळणाऱ्या मानधनातून त्यांनी कुटुंब चालवलं.
सोबतच भन्साळी यांचे शिक्षण देखील पूर्ण केलं. नंतर नंतर जेव्हा परिस्थिती बिकट होत गेली तेव्हा प्रसंगी लोकांचे कपडे शिवण्याचे काम देखील त्यांनी केलं. हलाखीची परिस्थिती असताना देखील लीला यांनी संजय भन्साळी यांचे शिक्षण पूर्ण केलं. स्वतः नर्तकी असूनही त्यांनी स्वतःची आवड बाजूला ठेवली आणि कुटुंबाला जास्त प्राधान्य दिलं.
आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी केलेला संघर्ष बघून भन्साळी यांना आपल्या आईबद्दल नितांत आदर वाटू लागला. अगदी कमी वयातच आलेली समज यामुळे भन्साळी यांनी शाळेपासूनच वडिलांचे नाव लावण्याऐवजी आईचं नाव लावायला सुरुवात केली. त्यानंतर संजय लीला भन्साळी हेच नाव त्यांनी पुढे रूढ केल.
पुढे संजय लीला भन्साळी यांनी पुण्याच्या एफ टी आय आयमध्ये प्रवेश मिळवला. नंतर ते मुंबईला आले. याच काळात विधू विनोद चोप्रा हे परिंदा नावाचा सिनेमा बनवत होते. भन्साळींच नाव ते ऐकून होते आणि संजय लीला भन्साळी सोबत विधु विनोद चोप्रा ने काम करण्याचा निर्णय घेतला.
असिस्टंट म्हणून संजय लीला भन्साळी यांनी काम करण्यास सुरुवात केली. या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली तेव्हा नावांची लिस्ट मागवण्यात आली त्यात भन्साळी यांनी स्वतःचं नाव संजय लीला भन्साळी असं लिहून दिलं तेव्हापासून सगळ्या बॉलिवूडमध्ये त्यांच हेच नाव ओळख बनल.
आज घडीला संजय लीला भन्साळी हे नाव एक ब्रँड म्हणून ओळखल जातं.
हे ही वाच भिडू :
- तडप तडपके गाण्यावर रडणारा सलमान दिसतो, पण इस्माईलच्या कम्पोजिशनने थेट भन्साळींना रडवलं होतं…
- तो सलमान आणि ऐश्वर्याचा पडद्यावरचा शेवटचा सिन ठरला!!
- मस्तानीच्या वारसदाराला संस्कृतचे अनेक श्लोक मुखोद्गत आहेत
- आपल्या वडीलांना मरताना पाहून संजय लिला भन्सालीला “देवदास” सिनेमा सुचला