शिमल्यात जावून कृत्रीम बर्फ पाडण्याचा उद्योग फक्त संजय लीला भंसाली करू शकतात..

२००५ साली ज्या वेळी संजय लीला भंसाली त्यांचा महत्त्वकांक्षी चित्रपट ‘ब्लॅक’ दिग्दर्शित करीत होते त्यावेळचा हा किस्सा आहे. ‘ब्लॅक’ हा चित्रपट बऱ्यापैकी अमेरिकन ऑथर हेलन किलर वर आधारलेला आहे आहे. चित्रपटाला भारतीय रूप देण्यात आलेले आहे.

चित्रपटाची नायिका राणी मुखर्जी अंध आहे. तिचे शिक्षक अमिताभ बच्चन तिच्यातील आत्मविश्वास जागा करून आणि अपंगत्वावर मात करून तिला शिक्षण देतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देतात. चित्रपटाच्या उत्तरार्धात शिक्षकालाच अल्झायमर्स आजार होतो.

या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. अनेक पुरस्काराचा मानकरी हा चित्रपट ठरला.

संजय लीला भंसाली यांनी त्यांचा पहिला चित्रपट १९९६ साली ‘खामोशी: द म्युझिकल्स’ हा दिग्दर्शित केला होता चित्रपटामध्ये त्यांनी नाना पाटेकर आणि सीमा विश्वास यांना मूकबधिर दांपत्य दाखवले होते. 

त्यावेळी त्यांनी शारीरिक अपंगत्व असलेल्या अनेक मुलांना पाहिलं होतं. त्यावेळेसच त्यांच्या डोक्यात ‘ब्लॅक’ चित्रपटाचे कथानक आकारत  होते. परंतु या चित्रपटानंतर त्यांनी १९९९  साली ‘हम दिल दे चुके सनम’ हा कंप्लिट रोमँटिक चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर २००३ साली त्यांचा बहुचर्चित आणि महागडा असा ‘देवदास’ प्रदर्शित झाला.

यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या डोक्यात घोळत असलेल्या शारीरिक अपंगत्वावर चित्रपटावर काम सुरू केले. यासाठी त्यांनी अनेक पुस्तके वाचली. यामध्ये हेलन केलर यांचे आत्मचरित्र The story of my life त्यांच्या वाचनात आले. याच विषयाला भारतीय रूप देऊन त्या ‘ब्लॅक’ हा चित्रपट बनवला.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटात भूमिका केली. राणी आणि अमिताभ या दोघांनी यातील भूमिका साकारताना भरपूर अभ्यास आणि मेहनत घेतली. राणी स्वत: अंध शाळेत जावून तिथल्या मुलांच्या sign languages शिकली. अमिताभ ने देखील अल्झायमर्स पेशंटस पाहून त्यांच्या देहबोलीचा अभ्यास केला.

या चित्रपटाला तब्बल ११ फिल्म फेयर पुरस्कार मिळाले. (हा एक विक्रम होता.) तसेच ३ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. या सिनेमाच्या वेळी संजय लीला भन्साळी यांचे सहायक रणवीर कपूर आणि सोनम कपूर होते..!

पुढे या दोघांना घेवून २००७ साली भंसाली यांनी ‘सांवरिया’ची निर्मिती केली.

यातील बालकलाकार आयेशा कपूर ला संपूर्ण ट्रेनिंग रणबीर कपूर याने दिले होते.या सिनेमाच्या शीर्षकावर दिग्दर्शकाने खूप विचार केला होता. पण ज्यावेळी ‘ब्लॅक’ हे टायटल ठरले त्या वेळी त्यांच्या लक्षात असे आले की हे टायटल अभिनेता कुमार गौरव यांनी आधीच बुक करून ठेवले आहे. भंसाली यांनी कुमार गौरव यांच्याशी चर्चा करून ते आपल्या नावावर करून घेतले. चित्रपटाच्या श्रेयनामावली त कुमार गौरव यांच्या या स्वागतार्ह भूमिकेची नोंद घेवून त्याचा अंतर्भाव केला.   

या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग सिमला येथे झालेले आहे. संजय लीला भन्साळी त्यांच्या शूटिंगचे संपूर्ण युनिट घेऊन जानेवारी महिन्यामध्ये सिमला ला गेले. दरवर्षी या महिन्यात सिमल्याला  बर्फवृष्टी होत असते.

आणि चित्रपटात कथानकात पहिल्या भागात बर्फवृष्टी ची सिच्युएशन होती. त्या मुळे दिग्दर्शकाने मुद्दाम हा महिना निवडला होता. सर्व काही योग्य प्लॅनिंग करून सर्व युनिट सिमला ला पोहोचले. परंतु त्या वर्षी काय गंमत झाली माहिती नाही; अजिबात बर्फ पडत नव्हता.

वातावरणामध्ये प्रचंड थंडी होती. खरंतर बर्फवृष्टी साठी अतिशय अनुकूल अशी परिस्थिती असताना देखील बर्फ पडत नव्हता. एवढ्या साऱ्या युनिटला परत मुंबईला घेऊन जाणे परवडणारे नव्हते. काय करावे? 

त्यामुळे संजय लीला भंसाली यांनी एक जुगाड करायचे ठरवले.

त्यांनी सिमल च्या लोकल मार्केटमधून भरपूर मीठ गोळा केले. काही टन मीठ जमा झाल्यावर त्यांनी ही मिठाची पोती आपल्या शूटिंगच्या स्थळी आणून ठेवली. मुंबईहून त्यांनी आइस मेकिंग मशीन मागवल्या. आईस मेकिंग मशीनच्या द्वारे त्यांनी आर्टिफिशल म्हणजेच कृत्रिम बर्फाची निर्मिती केली..!

आणि ह्या कृत्रिम बर्फा वर त्यांनी संपूर्ण शूटिंग केले. पहाटे चार वाजे पर्यंत सर्व युनिट शूटिंग करत असे. काही आठवडे रोज असला ‘जुगाड’ करत त्यांनी शूटिंग पूर्ण केले. सिमल्यातील स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना देखील आश्चर्य वाटले एवढी बर्फवृष्टी झाली कधी..?

संजय लीला भंसाली यांनी केलेला हा जुगाड बऱ्याच जणांच्या लक्षात आलाच नाही. पण वर्क आउट व्यवस्थित झाला. सिनेमाच्या धंद्यात असले जुगाड करावे लागतात. प्रेक्षकांना देखील हा बर्फ खरा की खोटा कळेलेच नाही.

एवढंच काय तर सिमला मधील कुत्री देखील फिरत फिरत  तिकडे येत आणि खरा बर्फ समजून त्याला चाटून जात.!सर्व शूट आटोपून युनिट मुंबईला पोचले.

दुसऱ्या दिवशी सिमल्याच्या हॉटेल मधून संजय लीला भंसाली यांना फोन आला “ साब जी, सिमला में न कल रात से जोरो की बर्फ बारी हो रही है!”

  • धनंजय कुलकर्णी ( लेखक हे सिनेअभ्यासक व लेखक आहेत) 
  • dskul21@gmail.com

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.