मनोज प्रभाकरने संजय मांजरेकरला धोका दिला होता…!!!

संजय मांजरेकर आणि मनोज प्रभाकर.

कधीकाळी दोघांनी ड्रेसिंग रूम शेअर केली होती. सिनिअर खेळाडू म्हणून मांजरेकरांच्या मनात मनोज प्रभाकरविषयी आदर होता. पण एक प्रकरण असं झालं की ज्या प्रकरणानंतर त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली ती पुढे कित्येक वर्षे टिकून राहिली.

१९९९-२००० सालच्या आफ्रिकन संघाच्या भारतीय दौऱ्यात  क्रिकेटविश्वात खळबळ माजवून देणारी घटना घडली होती. ‘मॅच फिक्सिंग’चं  प्रकरण उघडकीस आल्याने अवघं क्रिकेटविश्व ढवळून निघालं होतं.

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिएचं करिअर या प्रकरणानंतर संपलं होतं. भारताचा माजी कर्णधार मोहोम्मद अझरूद्दीन, अजय जडेजा आणि अजय शर्मा यांची नांव देखील या प्रकरणात आली होती.

91Vz pTe7TL

याचवेळी ‘तेहलका’ नावाच्या मासिकाच्या तरुण तेजपाल आणि अनिरुद्ध बहल यांनी मनोज प्रभाकरला हाताशी धरून भारतीय संघातील कुठले खेळाडू या प्रकरणात अडकलेले आहेत हे शोधण्यासाठी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. मनोज प्रभाकरने विविध भारतीय खेळाडूंना मॅच  फिक्सिंगच्या प्रकरणावर बोलतं करून गुप्तपणे हे रेकॉर्डिंग केलं होतं. यासंदर्भातलाच किस्सा संजय मांजरेकरने आपल्या ‘इंपरफेक्ट’ या आत्मचरित्रात लिहिलाय.

मांजरेकरांनी लिहिलंय की चंद्रकांत पंडित यांनी त्यांच्या क्रिकेट अकादमीतील एका कार्यक्रमात लेक्चर देण्यासाठी मांजरेकरांना निमंत्रण दिलं होतं. मांजरेकर ज्यावेळी कार्यक्रमस्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना समजलं की मनोज प्रभाकर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रम संपला. संजय मांजरेकर ज्यावेळी आपल्या घरी जायला निघाले त्यावेळी प्रभाकारांनी त्यांना जुहूपर्यंत लिफ्ट मागितली. दोघेही मांजरेकरांच्या कारमध्ये बसले. कारमध्ये बसल्यानंतर विविध विषयावर गप्पा सुरु झाल्या आणि बोलता बोलताच मनोज प्रभाकरने मॅच फिक्सिंगचा विषय छेडला.

संजय मांजरेकर पुढे लिहितात की, “सिनिअर म्हणून मी कायम प्रभाकर यांचा आदर करत आलो होतो. त्यांच्या ‘रिव्हर्स स्विंग’चा देखील मी चाहता होतो. पण ड्रेसिंग रूममध्ये देखील आमच्यात एवढी जवळीक कधीच नव्हती की त्यांच्या मॅच फिक्सिंग संदर्भातील प्रश्नांना मी बिनधास्तपणे उत्तरं देऊ शकेन. त्यामुळे मी फारसं काही बोललो नव्हतो. पण मी बोललो नव्हतो तेच चांगलं झालं होतं, कारण थोड्याच वेळा माझ्या लक्षात आलं की प्रभाकर गुपचूपपणे आमच्यातील संभाषण रेकॉर्ड करत होते. हा एका मित्राने दुसऱ्या मित्राला दिलेला धोका होता”

पुढे चालून मनोज प्रभाकर यांनी केलेलं हे ‘स्टिंग ऑपरेशन’ रिलीज करण्यात आलं. मनोज प्रभाकर यांनी माजी कॅप्टन कपिल देववर मॅच फिक्सिंगमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केला. शिवाय या प्रकरणाची माहिती सचिन तेंडूलकर आणि संजय मांजरेकर यांना देखील असल्याचं प्रभाकरने म्हंटलं. सचिनने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण मांजरेकर यांनी मात्र आपल्याला याविषयी काहीही कल्पना नसल्याचं सांगितलं.

m P
मनोज प्रभाकर

नंतरच्या घडामोडीत सीबीआयला कपिल देव विरोधात कुठलेही पुरावे सापडले नाहीत, परंतु ‘स्टिंग ऑपरेशन’ करणारा मनोज प्रभाकर हाच या प्रकरणात दोषी आढळल्याने बीसीसीआयने प्रभाकरवर बंदी घातली होती.

मोहोम्मद  अझरूद्दीन आणि अजय शर्मा देखील या प्रकरणात दोषी आढळले होते. सर्वांना वेगवेगळ्या कारवायांना सामोरे जावं लागलं होतं. नंतरच्या काळात कोर्टाने त्यांच्यावरची बंदी उठवली देखील होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.