गोलमाल सिनेमानंतर गायब झालेले संजय मिश्रा रोहित शेट्टीला ढाब्यावर काम करताना सापडले

बॉलीवूडमध्ये बडे स्टार आणि कसलेले कलाकार या दोघांमधला फरक तेव्हा जाणवतो जेव्हा दोघेही एकाच सिनेमात एकत्र असतात. उदाहणादाखल सांगायचं झालं तर, ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात ज्या क्षणी नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री होते त्या क्षणी सलमान खान झाकोळला जातो.

नवाजने अभिनयाच्या बाबतीत सलमानला अक्षरशः खाऊन टाकलं आहे.

त्यामुळे स्टार आणि कलाकार यातला फरक तुम्हाला कळाला असेल. परंतु अशा कलाकारांना इंडस्ट्रीत टिकण्यासाठी पावलोपावली संघर्ष हा करावाच लागतो. मग तो संघर्ष कधी व्यावसायिक जीवनातला असतो तर कधी तो व्ययक्तिक आयुष्यातला असतो.

असाच एक संघर्ष अभिनेते संजय मिश्रा यांच्या वाट्याला आला. याचीच ही कहाणी.

संजय मिश्रा हा कोणत्या लेव्हलचा कलाकार आहे, हे ‘आँखो देखी’ हा सिनेमा पाहून कळून आलं. घरात ज्याला सर्व मानतात असा घरातला मोठा सदस्य म्हणजे बावजी. तो अचानक एक दिवस ठरवतो की, लोकं जे आपल्याला येऊन सांगतात त्यावर यापुढे विश्वास ठेवायचा नाही. तर आपण डोळ्यांनी जे पाहू, स्वतः जे अनभवू त्यावर विश्वास ठेवायचा.

यानंतर बावजीच्या आयुष्यात होणारा बदल या सिनेमातून पाहायला मिळतो. बावजीची भूमिका संजय मिश्रांनी साकारली आहे. संजय मिश्रांना आधी इतर सिनेमांमध्ये पाहिलं होतं.

परंतु हा माणूस कलाकार म्हणून किती ग्रेट आहे याची जाणीव ‘आँखो देखी’ पाहून झाली.

संजय मिश्रा कितीही चांगले कलाकार असले तरीही ते फार कमी सिनेमांमध्ये पाहायला मिळतात. कधी ते ‘गोलमाल’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत खळखळून हसवतात. तर कधी ‘धमाल’ सिनेमात रितेश देशमुखच्या सतत मागावर असणाऱ्या अतरंगी गुंडाच्या भूमिकेत संजय मिश्रा खरीखुरी धमाल आणतात. आपली मुलगी चुकली आहे हे माहीत असूनही तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणारा, प्रसंगी तिच्यावर हात उचलणारा, आणि जेव्हा ती निघून जाते तेव्हा मनातला हुंदका दाबून ठेवणारा ‘मसान’ मधला रीचा चढ्ढाचा बाप संजय मिश्रा यांनी उत्तम रंगवला आहे.

हा कलाकार एका क्षणाला खळखळून हसवतो तर दुसऱ्याच क्षणी वेगळ्या भूमिका साकारून अंतर्मुख करतो.

हा अवलिया कलाकार ६ ऑक्टोबर १९६३ रोजी दरभंगा येथील नारायणपूर येथे जन्मला.

मिश्रा परिवारातील मागील तीन पिढ्या प्रशासकीय सेवांमध्ये होत्या. संजय घरातील मोठा मुलगा. त्यामुळे आपल्या मुलाने शिकून चांगली सरकारी नोकरी धरावी, अशी घरच्यांची अपेक्षा होती. परंतु संजयला शिक्षणापेक्षा इतर गोष्टींमध्ये रस होता. कसं बसं पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये संजय दाखल झाला.

तिथे अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेऊन वयाच्या २७ व्या वर्षी संजय मुंबईत दाखल झाला.

अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिरांडा या कोल्ड्रिंक्स कंपनीच्या जाहिरातीत संजयला बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांचा पुढचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. दूरदर्शनवरील ‘चाणक्य’ , ‘ऑफिस ऑफिस’ या मालिकांमध्ये छोट्या भूमिका संजयने साकारल्या.

‘ऑफिस ऑफिस’ मालिकेतील त्यांनी रंगवलेल्या शुक्ला या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रामुच्या ‘सत्या’ मध्ये अनेक नवखे कलाकार रामूने घेतले होते. या सिनेमात सुरुवातीलाच अगदी छोट्या भूमिकेत संजय मिश्रा पाहायला मिळतात.

संजय मिश्रांची अभिनय कारकीर्द हळूहळू यशस्वी होत होती. आणि अचानक व्यक्तिगत जीवनात त्यांना मोठा धक्का बसला.

त्यांचे वडिल शंभूनाथ यांचं निधन झालं. बाप – मुलगा वरकरणी जरी एकमेकांकडे प्रेम व्यक्त करत नसले तरी आतून हळवे असतात. असंच काहीसं संजय मिश्रांचं त्यांच्या वडिलांसोबत नातं होतं. ही दुःखद खबर मिळताच ते मुंबई सोडून गावी गेले.

वडिलांचे सर्व शेवटचे विधी केले. आणि ते काहीसे जीवनातून विरक्त झाले. वडील गेल्यामुळे त्यांना प्रचंड दुःख झालं होतं. सर्वांपासून ते अलिप्त राहू लागले.

आणि एक दिवस घर सोडून ते हृषिकेशला गेले.

पोटापाण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. म्हणून हृषिकेश येथील एका ढाब्यावर ते काम करू लागले. तिथे ते जेवण बनवायचे. त्यांनी बनवलेलं आम्लेट लोकांना खूप आवडायचं. हे काम करण्याआधी काहीच दिवसांपूर्वी संजय मिश्रा यांचा ‘गोलमाल’ सिनेमा प्रदर्शित झाला होता.

हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे आम्लेट बनवणाऱ्या संजय मिश्रांना लोकं ओळखायचे. संजय मिश्रा यांना असं काम करताना पाहून लोकांना धक्का बसायचा. परंतु कोणाची फिकीर न करता संजय येथे काम करत होते. त्यांचा जगण्यातला रस जणू हरवला होता.

गोलमाल नंतर रोहित शेट्टी ‘ऑल द बेस्ट’ सिनेमाच्या तयारीला लागला.

या सिनेमातील एक भूमिका संजय मिश्रा यांनी करावी ही रोहितची ईच्छा होती. फार मुश्किलीने इथून तिथून माहिती काढून रोहित आणि संजय मिश्रा यांची ढाब्यावर भेट झाली. मनातली इच्छा रोहितने बोलून दाखवली. पुन्हा सिनेमात काम करण्यासाठी संजय मिश्रांच्या मनाची तयारी नव्हती.

परंतु रोहितने खूप आग्रह केला. आणि हा आग्रह ते मोडू शकले नाहीत. ते रोहित सोबत मुंबईत आले आणि त्यांनी ‘ऑल द बेस्ट’ सिनेमात काम केलं. २००९ साली हा सिनेमा आला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला.

या सिनेमाच्या यशामुळे संजय मिश्रांना अनेक सिनेमाच्या ऑफर्स आल्या. आणि जणू काही त्यांचं दुसरं आयुष्य सुरु झालं.

आयुष्याच्या वळणावर संघर्षाचा काळ अनुभवल्यानंतर आज संजय मिश्रा बॉलिवुडमध्ये कलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख जपून आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.