पोहरादेवी संस्थान राजकारणाच्या केंद्रबिंदूवर येण्यामागे ही आकडेवारी कारणीभूत आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरागडला भेट देत, बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी बंजारा भाषेतून केली. त्यानंतर बंजारा समाजासाठी ५३७ कोटींचा विकास आराखडा बनवल्याची घोषणा केली आणि सोबतच पंतप्रधान मोदींनी जसा काशीचा कायापालट केला तसाच बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरागडचा कायापालट करणार अशी घोषणाही केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संजय राठोड यांच्या पाठीमागं बंजारा समाज भक्कमपणे उभा असल्याचा पुनरुच्चार केला आणि त्यामुळंचं त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळालं हेही सांगितलं. सोबतच ‘आपल्यात जिव्हाळा असल्यानं पोहरादेवीला हा जनसागर उसळला आहे,’ असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या झाल्या आजच्या घडामोडी, थोडं मागच्या काही महिन्यात काय घडलं ते पाहू…

पुजा चव्हाण प्रकरणात टिका झाल्याने संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी देखील पोहरादेवी संस्थान व धर्मपरिषद संजय राठोड यांच्या पाठीमागे ठाम उभी राहलेली दिसून आली होती..

मात्र नंतर पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी एक्झॅक्ट पलटी मारत संजय राठोड यांच्या विरोधात जात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 

महंत सुनील महाराज यांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोड यांनी महंतांना भेट नाकारली होती. त्यामुळेच सुनील महाराज आणि संजय राठोड यांच्या वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती.  

त्यानंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला येतील अशा बातम्या आल्या, आता या दौऱ्याची तारीख ३० मार्च निश्चित झाल्याची वृत्तही माध्यमांमध्ये आहेत. पण उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तीन नेतेच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांसाठी बंजारा समाज आणि पर्यायानं पोहरादेवी संस्थान महत्त्वाचं आहे.

पोहरादेवी संस्थानचं  बंजारा समाजासाठी असणारं सामाजिक, सांस्कृतिक व विशेषकरून राजकीय महत्व पाहणार आहोत. सोबतच बंजारा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणात किती महत्वपूर्ण राहिलेला आहे ते देखील जाणून घेणार आहोत.. 

सर्वात पहिले पाहू की बंजारा समाज कोण व या समाजासाठी पोहरादेवीचं महत्वांच स्थान का आहे ते… 

बंजारा समाजासाठी काशी समजलं जाणारं पोहरादेवी हे ठिकाण वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात आहे. बंजारा समाज हा मुळचा राजस्थानचा समजला जातो. या समाजात संत सेवालाल महाराज यांना मानाचं स्थान आहे.

17 व्या शतकात होऊन गेलेले संत सेवालाल महाराज यांच्याकडे समाजसुधारक म्हणूनही पाहिलं जातं. त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी २२ वचनं किंवा शिकवणी सांगितल्या आहेत. संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेलं तत्वज्ञान बंजारा समाजात सर्वोच्च मानलं जातं, महाराजांची पूजा केली जाते. याच संत सेवालाल महाराज यांची पोहरा इथं समाधी आहे.

सोबतच बंजारा समाज मानतो त्या जगदंबा देवीचं मंदिरही आहे. म्हणूनच पोहरादेवी हे बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर हे बंजारा समाजाचं मुख्य धर्मपीठ आहे. इथून जारी होणाऱ्या संदेशाचं बंजारा समाजात अनुकरण केलं जातं.

आत्ता ही गोष्ट फक्त महाराष्ट्रातील बंजारा समाजासाठी लागू आहे का? तर नाही. संपूर्ण देशभर विखूरलेला बंजारा समाज हा पोहरादेवी इथे येवून आपला माथा टेकतो.

आज देशभरात १५ कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेला हा समाज राजस्थान, उत्तर भारत, मारवाड क्षेत्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यांमध्ये विखूरलेला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर २०१२ सालच्या एका बातमीनुसार महाराष्ट्रात जवळपास सत्तर लाख बंजारा समाज होता. तेव्हा राज्यातील २८ मतदारसंघांत बंजारा समाजाचे तीस टक्के मतदार होते.

आजच्या आकडेवारीनुसार बंजारा समाजाचे राज्यात पाच हजार तांडे आहेत आणि दीड कोटी इतकी लोकसंख्या असल्याचं सांगितलं जातं..

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ४४ मतदारसंघात बंजारा समाज प्रभाव टाकत होता. महाराष्ट्रातल्या  यवतमाळ, वाशिम, नांदेड, सोलापूर, लातूर, अकोला, हिंगोली, जळगाव या भागांत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वसलेला आहे. २०१९ मध्ये पुसद विधानसभा मतदारसंघात जवळपास 90 हजार मतदार होते, अशी माहिती गोर बंजारा समाजाच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलेली आहे. 

हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीनुसार वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात साडेचार ते पाच लाख मतदार आहेत. म्हणून इथे त्यांचं मत निर्णायक ठरतं. त्यामुळेच बंजारा समाजाला डावलून या मतदारसंघात सत्ता मिळवता येत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील बंजारा समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व दिसून येतं. प्रत्येक ठिकाणी बंजारा समाजाच्या वस्त्या आणि तांडे असल्यामुळे समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्याची क्षमता जास्त असल्याचं दिसून येतं. विशेषत: बंजारा समाज हा राजकीयदृष्ट्या समाज म्हणून मतदान करण्यास पसंती देतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात बंजारा समाज राजकारणाच्या केंद्रबिंदूवर कधी आला ते पाहू… 

बंजारा समाजाला राजकीयदृष्ट्या बळ देण्यामध्ये महत्वाचं नाव येतं ते म्हणजे वसंतराव नाईक. 11 वर्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर होते. सलग इतका काळ मुख्यमंत्रीपदावर राहणं आजतागायत कोणत्याही नेत्याला जमलेलं नाही. त्यानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक यांच्या काळात बंजारा समाजाचं मतदान प्रामुख्याने कॉंग्रेसकडेच रााहिलं होतं.

मात्र नाईक कुटूंब राजकारणाच्या केंद्रबिंदूवरून दूर झाले व बंजारा समाजावरची त्यांची पकड देखील सैल होत गेली…

त्यानंतरच्या काळात राजेश राठोड, हरिभाऊ राठोड, संजय राठोड असे वेगवेगळे नेते बंजारा समाजातून नेतृत्व सिद्ध करत पुढे आले. अशावेळी बंजारा समाज या नेत्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला दिसून येतो. संजय राठोड स्वत: त्यांच्या दिग्रस मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. मागील तीन टर्ममध्ये 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळवत आहेत. त्यातही गेली दोन टर्म त्यांनी 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत.

म्हणूनच संजय राठोड यांच्यावर आरोप असताना देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात संजय राठोड यांना स्थान देण्यात आल्याचं सांगितलं जातं.

थोडक्यात सांगायचं तर 2019 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या 44 मतदारसंघात थेट प्रभाव टाकण्याची क्षमता बंजारा समाज बाळगून आहे. आणि बंजारा समाजाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक गोष्टीत थेट प्रभाव टाकण्याचं सामर्थ्य पोहरादेवी संस्थानात आहे.. म्हणूनच बंजारा समाज आणि पोहरादेवी संस्थान हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्यवर्ती चर्चेत राहताना दिसून येतं..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.