एकदा चक्क संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात जोरदार वाद झाला होता…

कोण म्हणतं संजय राऊतांना राजकारण कळत नाही. कोण म्हणतं त्यांच्याकडे संघटनकौशल्य नाही. कोण म्हणतं पत्रकारतेच्या मैलाचा ठरेल अस त्यांनी काहीच केलं नाही तर कोण म्हणतं संजय राऊतांच म्हणणं हे शिवसेनेच अधिकृत म्हणणं नसतं. पण आपण हा विचार करत नाही शिवसेनचं अधिकृत म्हणणं नाही अस शिवसेनेला स्पष्टीकरण द्यायला लागत असून देखील,

नेहमीच शिवसेनेच्या पहिल्या फळीत असणारा असा एकच नेता सेनेत आहे तो म्हणजे संजय राऊत. 

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्लस राज ठाकरे अशा चारही जणांसोबत ॲडजेस्टमेंट केलेल्या नेत्यांची नाव काढायची झाली तर संजय राऊत हे एकमेव नाव निघतं. शिवसेनेत प्रत्येकजण स्वत:ला नेता म्हणवून घेवू लागला तेव्हा बाळासाहेबांनी सेनेत नेतेपद हे ऑफिशीयल करण्याची घोषणा केली. निवडक लोकांना नेतेपद देण्यात आलं.

आज सेनेत १७ जणांचा उल्लेख शिवसेना नेते असा केला जातो. त्यात राऊताचा अग्रक्रम आहे. 

संजय राऊतांच बालपण माहिममध्ये गेलं. त्यांचे वडिल राजाराम राऊत हे JKW कंपनीत कामगार होते. आणि तिथले कामगार नेते देखील होते. कट्टर शिवसैनिक असणारे राजाराम राऊत हे बाळासाहेबांच्या देखील तितकेच जवळचे होते. त्यातूनच संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घरोब्याचे संबध निर्माण झाले.

आंबेडकर कॉलेजमधून B.com झालेल्या या मुलाला पोटापाण्याला लावायचं म्हणून बाळासाहेबांनीच संजय राऊतांना माधव गडकरींकडे पाठवलं होतं. शिवसेनेच्या शिफारसीवर आला म्हणून गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे. संजय राऊत लोकप्रभा मध्ये क्राईम रिपोर्टींग करायचे.

पण संजय राऊतांनी आपली वेगळी शैली विकसीत केली. वेगवेगळ्या कवर स्टोरीमुळे लोकप्रभाचा अंक हातोहात खपू लागला आणि संजय राऊत लोकांच्या नजरेत येवू लागले. 

पण या सगळ्यात राऊतांवर खास नजर होती ती बाळासाहेबांची. बाळासाहेबांना हा पोरगा काहीतरी करेल अस वाटायचं. क्राईम रिपोर्ट करता करता संजय राऊतांचा मोर्चा राजकिय रिपोर्टिंगकडे वळला. या संधीच सोनं करत आपल्या शब्दांनी लोकप्रभा गाजवू लागले.

माधव गडकरींची स्टाईल आणि बाळासाहेबांची स्टाईल याच अचूक मिश्रण म्हणजे संजय राऊतांच्या लिखाणाची स्टाईल असल्याचं सांगण्यात येतं.  त्याकाळात राज ठाकरे देखील लोकसत्ता मध्ये व्यंगचित्र काढायचे. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात चांगलीच गट्टी जमली.

शिवसेनेत एकसे एक नेते खळ खट्याक करण्यासाठी प्रसिद्ध होते. बोलण्याच्या स्पर्धेत देखील अशा नेत्यांचा नंबर लागायचा.

छगन भुजबळ, नारायण राणे हे बाळासाहेबांप्रमाणेच तोडीस तोड बोलायचे. पण प्रश्न होता तो बाळासाहेबांप्रमाणे लिहणाऱ्याचा. आपल्या शेलक्या शब्दात अचूक घाव घालणारा माणूस बाळासाहेबांकडे नव्हता. 

अशातच छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम केला. छगन भुजबळांनी सेनेला राम राम ठोकताच लोकप्रभात कवर स्टोरी छापण्यात आली. ही कवर स्टोरी केली होती संजय राऊतांनी. संजय राऊतांची ती स्टोरी बाळासाहेबांच्या नजरेत आली बाळासाहेबांच्या लक्षात आलं, 

हीच ती वेळ..! 

बाळासाहेबांनी राऊतांना बोलावून घेतलं. असं म्हणतात की संजय राऊत म्हणे बाळासाहेबांना म्हणाले होते, जर सामनाचा कार्यकारी संपादक करत असाल तरच येतो. तेव्हा संजय राऊतांच वय होतं २९ वर्ष. पत्रकारक्षेत्रातल्या लोकांना वयाच्या २९ व्या वर्षी सामना सारख्या वर्तमानपत्राचं संपादक होण म्हणजे काय ते समजू शकतं. एकवेळ २९ व्या वर्षी आमदार होता येईल पण इतक्या कमी वयात संपादक होता येत नाही. 

बाळासाहेब देखील दिलदार होते. त्यांनी राऊतांना ते पद दिलं. संजय राऊत संपादक झाले व तिथूनच त्यांची गाडी सुसाट सुटली

सामानात गेले त्या दिवसापासून संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन व्यक्ती एक प्रकृती बनल्या. राऊतांच विशेष होतं ती म्हणजे त्यांची शैली. एका बाजूला बाळासाहेबांची लेखण शैली आणि दूसऱ्या बाजूला पारंपारिक चौकटीबाहेर जावून मुखपत्राच्या पलीकडे आपलं वर्तमानपत्र हिट करण्याची मार्केटिंग स्टॅटर्जी.

राऊतांना दोन्ही गोष्टीच ज्ञान होतं. त्यातून सामना हिट होतं गेलं. बाळासाहेब काय बोलणार इथपासून ते कोणत्या भाषेत बोलतील हे राऊतांना कळत होतं. बाळासाहेबांनी देखील राऊतांना तशी मोकळीक दिली होती. सामनामध्ये राऊतांनी लिहिलेला एक शब्द बाळासाहेब कापायचे नाहीत.

पण याचा अर्थ असा नव्हे कि बाळासाहेब ठाकरे आणि राऊत यांच्यात कधी मतभेदाचे प्रसंग आले नाहीत. पत्रकार राजू परुळेकर यांनी आपल्या ब्लॉगवर याबद्दलची सांगितलेली एक आठवण.

संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात एकदा जोरदार वाद झाला होता. कारण ठरला होता दुसरा संजय, संजय दत्त.

मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचं नाव आलं. त्याने आपल्या घरात एके४७ बंदुका लपवल्या असल्याचं समोर आलं. एवढ्या मोठ्या अतिरेकी हल्ल्यात संजय दत्त असल्याचं कळल्यावर संपूर्ण देशात खळबळ उडाली. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांच्या बरोबर सामील झालेला संजय दत्त सुद्धा अतिरेकीचे असल्याचं बोललं जाऊ लागलं. 

मुंबईत तर शिवसैनिकांनी संजय दत्त विरोधात जोरदार फ्रंट उघडली. त्याला सपोर्ट करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सुभाष घई सारख्या दिग्दर्शकाला भर रस्त्यातून पळवून लावण्यात आलं. सामना मध्ये संजय राऊत देखील संजय दत्त विरोधात आक्रमकपणे लिहीत होते. 

एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांची आणि संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांची भेट झाली. सुनील दत्त यांनी संजय दत्तची बाजू बाळासाहेबांपुढे मांडली. बाळासाहेबांना ती पटली. त्यांनी संजय दत्तला माफ करून टाकलं आणि तो निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट दिलं.  

अचानक बाळासाहेब ठाकरेंनी आपली भूमिका बदलून त्याला जाहिरपणे ‘उगवता सूर्य’ वगैरे म्हटलं. संजय राऊत यांचं रक्त उकळलं आणि त्यांनी चक्क पेपरमध्येच मूळ भूमिकेच्या विरोधात काहीतरी लिहिलं. बाळासाहेब ठाकरे देखील संजय राऊतांवर प्रचंड संतापले.

राजू परुळेकर सांगतात,

 तेव्हा संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक छोटसं कोल्डवॉर झालं. अर्थात या युद्धाचा शेवट माँसाहेबांच्या मध्यस्तीने झाला. माँसाहेबांनी दोघांना एकत्र जेवायला बसवून त्यांच्यात समेट करून दिला. संजयच्या बाबतीत बाळासाहेब खूप उदारमतवादी होते.

म्हणूनच आजही संजय राऊत यांना शिवसेनेचा सर्वात मोठा शिलेदार म्हणतात. शिवसेना नेत्यांच्या कित्येक पिढ्या बदलल्या, राजकारण बदललं. काळ बदलला. पण वयाच्या २८-२९ व्या वर्षी सामनात शिरलेले संजय राऊत आजही आपल्या जागी पाय रोवून उभे आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.