संजय राऊत-स्वप्ना पाटकर कनेक्शन, पत्राचाळ प्रकरण ते ऑडिओ क्लिप…सगळं मॅटर असंय

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अडकलेले संजय राऊत ४ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणारेत. या प्रकरणात ईडीने आरोप केलेत की, प्रविण राऊत फक्त नावालाच आहेत, पण खरे आरोपी संजय राऊत आहेत

बरं फक्त याच प्रकरणातच संजय राऊत अडकले नाही तर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे स्वप्ना पाटकर. 

अलीकडेच स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यामुळे संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पण ही ऑडिओ क्लिप २०१६ ची आहे तर मग त्याबाबत आत्ता गुन्हा दाखल का करण्यात आलाय? 

पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर या नेमक्या कोण आहेत?  या प्रकरणात त्या कशा अडकल्या ? त्यांचं आणि संजय राऊतांचं कनेक्शन काय आहे त्याचबद्दल आज बोलूया.

स्वप्ना पाटकर या पत्रा चाळ प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांपैकी एक आहेत, ज्या प्रकरणात शिवसेना  संजय राऊत यांचा हात असल्याचं ईडीकडून सांगण्यात येतंय. 

हे प्रकरण सुरु झालं आणि स्वप्ना पाटकर यांचं नाव आणि त्यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली.

 ७० सेकंदाची असलेली ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या विरोधात स्वप्ना पाटकर यांनी तक्रार केली. त्या तक्रारीनुसार वाकोला पोलिसांनी कलम ५०४, ५०६, आणि ५०९ अंतर्गत संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ‘

स्वप्ना पाटकर यांनी जबाबात म्हटलंय की, ‘संजय राऊतांनी मला अश्लिल शिवीगाळ केलीय’.

पण या स्वप्ना पाटकर कोण आहेत ? 

त्यांचं संपूर्ण नाव स्वप्ना सुजित पाटकर. वय वर्ष ४०. त्या उद्योजिका आहेत,  मराठी चित्रपट निर्मात्या आहेत. मराठी अस्मितेच्या विषयाला धरून ‘बाळकडू’ नावाचा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता आणि या चित्रपटाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर होत्या. त्या पेशाने सायकॉलॉजिस्ट आहेत. 

मुंबईतील कलिना भागात त्या ‘ड्रीम अँड हॅपीनेस वेलनेस’ नावाचं काउंसिलींग सेंटर चालवत असायच्या. त्यांनी टेड एक्सला व्याख्यानही दिलेले आहेत.  

त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांचे घटस्फोटित पती सुजित पाटकर हे शिवसेना नेत्यांचे व्यावसायिक सहकारी आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याचे आणि पत्राचाळ घोटाळ्यातले आरोपी आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत जे सद्या दिल्लीत ईडीच्या अटकेत आहेत. त्यांचे सुजित पाटकर निकटवर्तीय आहेत. सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये पार्टनर असल्याचं सांगितलं जातं.

पण स्वप्ना पाटकरांचं अन संजय राऊतांच कनेक्शन कसं आहे ?

स्वप्ना पाटकर यांनी स्वतः जबाबात सांगितलंय की, त्यांच्या घटस्फोटित पतीने म्हणजेच सुजित पाटकर यांनी संजय राऊतांची ओळख करून दिली होती. 

त्यादरम्यान संजय राऊत हे सामानाचे कार्यकारी संपादक होते. २००७ पासून २०१४ पर्यंत स्वप्ना पाटकर सामना या सेनेच्या मुखपत्रात स्तंभलेखन करायच्या. त्या संजय राऊत यांच्या सहकारी बनल्या. शिवसेना नेत्यांसाठी ते कौन्सलिंग सेशन्स घ्यायच्या, मोठं-मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचे सेमिनार्स व्हायचे.

याचदरम्यान हळूहळू त्यांचे राऊत कुटुंबियांशी चांगले संबंध तयार झाले. 

संजय राऊत स्वप्ना पाटकर यांना आपली मानसकन्या म्हणायचे. 

सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर ही जोडी राऊत कुटुंबाच्या जवळ आली.  पण २० नोव्हेंबर २०१६ रोजी सामनाच्या ऑफिसमध्ये स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यात वाद झाला आणि त्यांच्यातले व्यावहारिक संबंध बिघडले. सोबतच पाटकर आणि राऊत कुटुंबातले संबंध ही ताणले गेले.  

याचदरम्यान स्वप्ना पाटकर आणि सुजित पाटकर यांच्यात घटस्फोट झाला. दोघे विभक्त झाले मात्र सुजितब पाटकर यांचे संजय राऊत यांच्याशी संबंध चांगलेच राहिले. 

आता वळूया ऑडिओ क्लीपचं प्रकरणाकडे

ऑडिओ क्लीपचं प्रकरण २०१६ चं आहे पण २०२२ मध्ये तक्रार देण्याचं कारण काय तर ? 

स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्या त्या वादानंतर २२ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांच्यात फोनवर संभाषण झालं. याच कॉलवर संजय राऊत यांनी फोनवरुन अश्लिल शिविगाळ केली ज्याचं स्वप्ना पाटकर यांनी आयफोनमध्ये रेकॉर्डिंग केलं असं त्यांनी जबाबात म्हटलंय.  

पाटकर यांच्या वकील आभा सिंग सांगतात की, 

“२०१६ पासूनच या ऑडिओ क्लिपची तक्रार केली जात होती मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवलाच नाही. त्यानंतर दिड- दोन वर्षांपूर्वी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये पून्हा तक्रार दाखल केली मात्र संजय राऊत सत्तेत होते, त्यांना घाबरून पोलिसांनी तेंव्हाही ती तक्रार नोंदवून घेतली नाही. राष्ट्रीय महिला आयोगातही तक्रार केली गेली. मात्र जुन्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी ३१ जुलै २०२२ रोजी संजय राऊतांवर गुन्हा दाखल केलाय. जेंव्हा ते पत्राचाळ प्रकरणात बाहेर येतील त्यानंतर स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर वेगळी कारवाई झाली पाहिजे अशी विनंती स्वप्ना पाटकरांच्या वकिलांनी केलीय.  

स्वप्ना पाटकरांनी असाही आरोप केलाय कि, २०२१ पासून संजय राऊत यांनी त्यांना अनेकदा धमक्या दिल्या, शाब्दिक शिवीगाळ केली आहे. जेंव्हा त्या तक्रार घेऊन पोलिसांकडे जायच्या मात्र राजकीय दबावामुळे त्यांची तक्रार दाखल केली जात नसायची. 

उलट जून २०२१ मध्ये स्वप्ना पाटकर यांना बांद्रा पोलिसांकडून अटक झाली. तेंव्हा क्लिनिकल सायकॉलॉजीच्या खोट्या पीएचडी डीग्रीचा वापर करुन क्लिनिक चालवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि कलम ४६७ अंतर्गत त्यांना अटक झाली. 

त्या ५२ दिवस तुरुंगात होत्या. 

स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांच्या सांगण्यावरून स्वप्ना पाटकर यांना बांद्रा सेशन्स कोर्टाने जामीन नाकारला होता पण ५२ दिवसांनी हाय कोर्टातून त्यांना जामीन मिळाला. 

“स्वप्ना पाटकर खोट्या डिग्रीप्रकरणी तुरुंगात होत्या मात्र बांद्रा पोलिस हे पूर्णपणे संजय राऊतांच्या प्रभावाखाली होते. संजय राऊत हे स्वप्ना पाटकर यांच्यावर पाळत ठेवून होते त्याबाबत स्वप्ना पाटकर यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केलेली मात्र स्थानिक पोलिस त्याबाबत सहकार्यच करत नव्हते”, असं स्वप्ना पाटकर यांच्या वकिल आभा सिंग यांचं म्हणणं आहे.  

त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये डॉ.स्वप्ना पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते,

 ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, गेल्या आठ वर्षांपासून संजय राऊत यांच्याकडून त्यांचा छळ केला जातोय. माझ्या तक्रारींकडे पोलीस, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. या पत्रात स्वप्ना पाटकर यांनी असाही दावा केला कि, त्यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली होती.

हे झालं स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्याबाबतचं प्रकरण, मात्र पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचं नाव कसं काय आलं ? 

२०२० मध्ये उघडकीस आलेल्या पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी असतांना प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली. तपासादरम्यान या घोटाळ्यातले काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचं स्पष्ट झालं. याच पैशातून वर्षा राऊत यांनी फ्लॅट घेतला आणि अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे.

सुजित पाटकर यांनी देखील पत्नीच्या नावे म्हणजेच स्वप्ना पाटकर यांच्या नावे काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या. 

ईडीनं फेब्रुवारीमध्ये प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण ७ ठिकाणांवर छापेमारी केली होती आणि एप्रिलमध्ये वर्षा राऊत, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर असलेल्या ११ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्यात.  

ईडीला असा संशय आहे की, पत्रा चाळ घोटाळ्याच्या पैशातून ही जमीन खरेदी केली गेली होती. म्हणूनच पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची साक्ष खूप महत्वाची आहे. 

स्वप्ना पाटकर लोकांना भेटत नाहीयेत, प्रकरणाशी संबंधित माध्यमांना कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देत नाहीयेत. मात्र स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हण्टलंय कि, ईडी तपास करत असलेल्या पत्रा चाळ प्रकरणामध्ये मी दिलेली साक्ष मागे घेण्यासाठी संजय राऊत माझ्यावर दबाव टाकतायेत. त्यासाठी त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे”. 

याबाबत त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं कि, “२०१६ ची ऑडिओ क्लिप मी एव्हिडन्स म्हणून ईडीकडे दिली आहे बाकी याबाबत मी काहीही सांगू शकत नाही”.

पण लीक झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊतांचा आवाज आहे कि अन्य कुणाचा याबाबत अजून तरी पुष्टी झालेली नाहीये. 

संजय राऊत जरी आता ईडीच्या कोठडीत आहेत ते स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणातील कबुली-जबाबामुळे.... 

पण असं सांगितलं जातंय कि पत्राचाळ घोटाळ्यात अडकलेले संजय राऊत बाहेर आले कि ते पुन्हा स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या तक्रारीवरून अडचणीत सापडू शकतात.. स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांचा हा विकोपाला गेलेला संघर्ष आणखी काय वळण घेईल हे पुढील काळात कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.