ज्यामुळे संजय राऊत गोत्यात आलेत ते १ हजार ३९ कोटींचं पत्राचाळ घोटाळा प्रकरण असंय…

खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी सातच्या सुमारास ईडीने धाड मारली. अलीकडेच संजय राऊतांची पत्राचाळ प्रकरणी  चौकशी झाली असता त्यानंतर ही धाड पडणं त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.

अलीकडे राऊत यांना ईडीने समन्स पाठवले मात्र त्या समन्सला त्यांनी उत्तर न दिल्यामुळे, चौकशीला सहकार्य न केल्यामुळे ईडीची टीम त्यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळतेय. या धाडीत त्यांना ईडीकडून पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील, तसेच त्यांच्या घराची झडतीही घेतली जाऊ शकते.

या सगळ्या चौकशीनंतर ईडी संजय राऊतांवर काय कारवाई करेल ?

ईडीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार, याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. पण ते ईडीच्या समन्सला प्रतिसाद देत नव्हते, चौकशीत सहकार्य करत नव्हते त्यामुळे, त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यानंतर ईडीचं पथक दाखल झालं आहेआज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

ईडीचे पथक राऊतांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी करू शकते, थोडक्यात त्यांना अटकही होऊ शकते असं मानलं जातंय.

पण ज्यामुळे संजय राऊत गोत्यात आले ते १ हजार ३४ लाखांच्या पत्राचाळ घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे ?

मुंबईत गोरेगावमधील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. येथील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचं पुनर्विकास करायचा कॉन्ट्रॅक्ट प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता.  प्रवीण राऊत हे बांधकाम व्यावसायिक असून ते गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​माजी संचालक आहेत. सद्या ते ईडीच्या अटकेत आहेत. 

त्यांच्या कंपनीला एकूण ३ हजार फ्लॅटचं काम देण्यात आलेलं. त्यातले ६७२ फ्लॅट्स भाडेकरूंसाठी राखीव ठेवण्यात आले होते आणि बाकीचे म्हाडा आणि बिल्डर लोकांमध्ये वाटून देण्यात येणार होते. 

मात्र ईडीच्या आरोप पत्रात केलेल्या आरोपांनुसार, २०११ ते २०१३ या दरम्यान प्रवीण राऊत यांच्या कंपनीने या चाळीतले काही भाग खासगी बिल्डरला विकले आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली.  

या सगळ्या अफरातफरीमध्ये म्हाडाची भूमिका देखील संशयित होती. पत्राचाळ मधील बैठ्या घरांमध्ये राहात असलेले ६७२ कुटुंब राहत असलेली घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्याचे पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत यात महत्वाची भूमिका बजावली.  

या सगळ्यात याचा फटका तेथील सामान्य रहिवाशांना बसला आहे, त्यांना गेल्या ५ वर्षांपासून भाडं ही नाही आणि घरही मिळालेलं नाहीये. या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडावर टीकाही केली होती. 

 हे प्रकरण उघडकीस येण्यास पीएमसी बँक घोटाळा कारणीभूत ठरला.  

पत्राचाळ घोटाळा प्रकरण कसं सुरु झालं तर, पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आलं त्याच कंपनीचं कनेक्शन या पत्राचाळ घोटाळ्यामध्ये आहे. आणि प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या पत्नीचे आणि संजय राऊत यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार हे संजय राऊत यांना अडचणीत आणणारे ठरलेत.

थोडक्यात, २०२० मध्ये उघडकीस आलेल्या पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी सुरु झाली होती. या चौकशीत प्रवीण राऊत यांच्या या बांधकाम कंपनीचं नाव समोर आलं. पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी सुरु असतांना प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली. सद्या ते ईडीच्या अटकेत आहेत.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून संजय राऊतांच्या पत्नी वर्ष राऊत यांनी ५५ लाखाचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले. प्रवीण राऊत यांच्या चौकशी दरम्यान वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्या खात्यावर पुन्हा ५५ लाख पाठवले..यावरूनच थोडक्यात या घोटाळ्यातले काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचं स्पष्ट झालं.

या पैशातून वर्षा राऊत यांनी फ्लॅट घेतला होता. तसेच अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे.

ईडीनं १ फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण ७ ठिकाणांवर छापेमारी केली होती. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे.

या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. तसंच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. 

तिथून या चौकशीचे सत्र सुरु झाले. 

एप्रिल २०२२ मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केल्या. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. 

आता आज होत असलेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांच्यावर काय कारवाई होईल की अटक होईल हे पाहणं महत्वाचं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.