बाळासाहेबांनी एका नजरेत ओळखलं होतं, राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिलाय…

राजकारणात मैत्री टिकत नाही, असं कुणी म्हणालं तर त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास दाखवायला हवा. बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे, शरद पवार-नितीन गडकरी या नेत्यांचे पक्ष वेगळे असले, हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले, तरी यांच्या मैत्रीत कधीच खंड पडला नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीची अशीच एक जोडी आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि संजय राऊत. त्यांचे पक्ष वेगळे असले, कुटुंबांमध्ये काहीसं अंतर पडलं असलं तरी या दोघांची मैत्री अजूनही टिकून आहे. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी भेट देत राऊत यांनी पुन्हा एकदा मैत्रीचा दोर मजबूत असल्याचं दाखवून दिलंय.

संजय राऊत हे जितके उत्तम राजकारणी तितकेच जबरदस्त पत्रकार. त्यात क्राईम रिपोर्टींगसारखं अवघड बीट त्यांनी सांभाळलं आणि गाजवलंही. राऊत लोकप्रभा साप्ताहिकात लिहू लागले आणि क्राईम रिपोर्टींगला त्यांनी नवं रूप दिलं. त्यावेळेस राज ठाकरे लोकसत्ताला व्यंगचित्र काढायचे. त्यांच्या मैत्रीचे सूर जुळत गेले. विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांनी सेना सोडली तेव्हा झालेल्या घटनांचं वार्तांकन संजय राऊत यांनीच केलं. ते वाचून प्रभावित झालेल्या बाळासाहेब ठाकरेंनी संजय राऊतांना सामनाच्या कार्यकारी संपादकपदी संधी दिली.

संजय राऊतांनीही बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला. पुढं शिवसेनेत महत्त्वाच्या पदांवर आल्यावरही त्यांनी राज आणि उद्धव या दोन्ही भावांसोबतचे संबंध कायम जपले.

बाळासाहेबांनंतरचं शिवसेनेतलं नेतृत्व म्हणून राज यांच्याकडेच पाहिलं जात होतं. मात्र, अनेक घटना घडत गेल्या आणि राज आणि सेनेतली दरी वाढत गेली. त्याचा परिणाम म्हणून राज यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली.

तो दिवस होता २७ नोव्हेंबर २००५. आपल्या शिवाजी पार्कवरच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राज यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना आपण सेना सोडत असल्याची घोषणा केली. त्यावेळी राज म्हणाले होते, ”माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूंच्या बडव्यांशी आहे. ज्यांना राजकारणातलं एबीसी कळत नाही, असे काही लोक आहेत. त्यामुळे मी शिवसेना नेतेपदाचा त्याग करतो. बाळासाहेब हेच माझं दैवत होतं, आहे आणि यापुढंही राहील.”

मात्र या छोटेखानी भाषणापूर्वी राज यांनी आपल्या दैवताला म्हणजेच बाळासाहेबांना आपला राजीनामा फॅक्स केला होता. त्या फॅक्समध्ये आधीच्या तीन वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सेनेला आलेल्या अपयशाचा मुद्दाही उपस्थित केला होता. सोबतच आपण शिवसेनेतल्या सर्व पदांचा त्याग करत असल्याचंही त्यात लिहिलं होतं.

एका ज्येष्ठ शिवसेना नेत्यानं सांगितलेल्या आठवणीप्रमाणं, राजीनाम्याचं ते पत्र अत्यंत समतोल भाषेत लिहिलं होतं. आपण पक्षत्याग का करतोय, याची कारणीमीमांसा राज यांनी केली होती. बाळासाहेबांनी पत्राकडं एक कटाक्ष टाकला आणि ते संजय राऊतांना म्हणाले ‘हे तुझं लिखाण दिसतंय.’

राज यांच्या राजीनाम्याचं लिखाण खरंच संजय राऊत यांनी केलं होतं. बाळासाहेब त्यावर काहीच म्हणाले नाहीत, पण त्यांनी संजय राऊत आणि मनोहर जोशी या आपल्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना शिष्टाईसाठी राज यांच्याकडे पाठवलं. नेमकी राजसमर्थकांनी राऊतांच्या गाडीची तोडफोड केली.

त्यानंतर, मातोश्री आणि कृष्णकुंजमध्ये अंतर पडलं. मात्र दुःखाच्या आणि आनंदाच्या प्रसंगात ठाकरे बंधू एकत्र दिसले. त्यावेळीही त्यांना जोडणारा दुवा असणारे संजय राऊत उपस्थित होतेच. गेल्यावर्षी राज यांच्या वाढदिवसाला संजय राऊत यांनी ‘वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले’ असं म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या.

राज ठाकरेंना ईडीनं समन्स पाठवल्यावर, ‘कुटुंब म्हणून आम्ही राज यांच्या पाठीशी उभे आहोत. संकटकाळी एकत्र उभे राहण्याचे बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

त्यात आता राज यांच्या नव्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर भेट देणारे ते पहिले सेना नेते ठरले आहेत. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते पहिल्यांदाच राज यांच्या निवासस्थानी गेले. निमित्त जरी मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्याचं असलं, तरी राऊतांनी मैत्रीचं सोनेरी पान पुन्हा एकदा जपलंय हेच यातून दिसून आलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.