साखर कारखानेसुद्धा हँड सॅनिटायझर बनवू शकतात ही आयडिया पहिल्यांदा यांना सुचली

गेल्या वर्षी कोरोनाच्या कोव्हीड 19 या व्हायरसने जगभरात थैमान घालायला सुरवात केली. लाखोंना या रोगाने गाठलं. अगदी इंग्लंड सारख्या देशाचे युवराज, पंतप्रधान देखील या रोगापासून सुटले नाहीत. कधी नव्हे ते जगाला हँड सॅनिटायझरने हात धुण्याचे महत्व पटलं.

भारतात देखील अनेकांना हँड सॅनिटायझर म्हणजे काय हेच माहीत नव्हतं पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने निर्देशित केल्यानंतर प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाचा परिणाम म्हणून अनेकांनी हँड सॅनिटायझर खरेदी केले.

पण सुरवातीच्या काही दिवसात त्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या. कोरोनासारख्या व्हायरसच्या हल्ल्यातील मुख्य शस्त्र असणारे हँड सॅनिटायझर खरेदी करणे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले.

अशातच बातमी आली की साखर कारखान्यांनी हँड सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली आहे आणि त्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

आणि हा क्रांतिकारी बदल घडला आहे तो एका सरकारी अधिकाऱ्यामुळे,

त्यांचं नाव डॉ. संजयकुमार भोसले.  उप आयुक्त साखर आयुक्तालय, महाराष्ट्र शासन

बोल भिडू टीमने त्यांच्या शी संपर्क साधला तेव्हा त्यांनी ही अभिनव कल्पना त्यांना कशी सुचली हे सांगितलं.

झालं असं होतं की कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर इतरांप्रमाणे डॉ. भोसले देखील मेडिकलमध्ये सॅनिटायझर खरेदी करायला गेले होते. तेव्हा त्यांना १५० ml ची सॅनिटायझर बाटली ५५० रुपयाला घ्यायला लागली. एवढी किंमत कशी काय वाढली हा प्रश्न त्यांना पडला.

अभ्यास केल्यावर एक महत्वाची महिती त्यांच्या लक्षात आली की सॅनिटायझर बनवण्यासाठी लागणारे आयसोप्रोफाईल अल्कोहोल हे भारतात चीन मधून तैवान मार्गे येते. भारतात आयसोप्रोफाईल अल्कोहोल साठी चीनची मक्तेदारी असल्या प्रमाणे आहे.

चीन मध्ये कोरोना आल्यापासून त्यांच्याशी असणारी आयात निर्यात थांबली आणि याचा फटका सॅनिटायझर निर्मितीला बसला. त्याचा पुरवठा थांबला आणि किंमती गगनाला भिडल्या.

तसं पाहायला गेलं तर डॉ. भोसले हे साखर आयुक्तालयात को जनरेशन आणि डिस्टीलरी हा विभाग सांभाळतात. हँड सॅनिटायझरशी त्यांचा थेट संबंध हात धुण्यापुरताच. पण आपल्या खात्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा करता येईल हे डॉ. भोसलेंच्या डोक्यात नेहमी चालू असायच.

मधल्या काळात भारत शासनाच्या इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसीवर काम करायची त्यांना संधी मिळाली होती आणि त्या निमित्ताने पेट्रोल मध्ये इथेनॉल वापरण्यापासून इतर कोणते उपयोग करता येतील याचा अभ्यास झाला होता.

यातूनच त्यांच्या लक्षात आलं, साखर कारखान्यात तयार होणाऱ्या इथेनॉलमधून हँड सॅनिटायझर बनवता येऊ शकतात.

आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे हेे सॅनिटायझर बाजारातल्या
सॅनिटायझर इतकेच परिणामकारक देखील आहेत याची खात्री करून घेतली होती.

तिथून सगळं चित्रच पालटलं.

महाराष्ट्राचे साखर आयुक्त सौरभ राव यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे साखर कारखान्याना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी मिळावी यासाठी दिल्लीत जाऊन प्रयत्न केले. त्यांची रास्त मागणी केंद्र सरकारला पटली आणि तातडीने आदेश देण्यात आले.

एफडीएने अख्या भारतभरातील साखर कारखान्याना सॅनिटायझर निर्मितीचा परवाना दिला.

गेल्या शनिवार पासून महाराष्ट्रात 45 साखर कारखाने सॅनिटायझर बनवू लागले आहेत. काही दिवसातच त्यांनी 5 लाख लिटर सॅनिटायझर बनवले आहे

शिवाय याचा निर्मिती खर्च सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही प्रचंड कमी आहे.

याचा परिणाम म्हणून येत्या काळात मोठमोठ्या हॉस्पिटल पासून ते कॉर्पोरेट कंपन्या, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी अगदी वाजवी दरात हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाणारे सहकारी साखर कारखाने सध्या आचके देत आहेत. हँड सॅनिटायझर निर्मिती सारखे बाय प्रॉडक्ट्स त्यांना नवं संजीवनी देतील हे नक्की.

फक्त भारतातच नाही तर अमेरिकेतही दोन दिवसांपूर्वी इथेनॉल पासून सॅनिटायझर बनवण्याच्या कल्पनेला पाठिंबा देण्यात आला आहे आणि येत्या काळात तिथेही स्वस्त दरातल्या या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.