जेव्हा जंटलमन दिसणाऱ्या संजीवकुमारने शोभा डे वर हात टाकला..

शोभा डे या नावाकडे बघण्याच्या अनेकांच्या अनेक नजरा अनेक दृष्टीकोन. राजाध्यक्ष या मराठी कुटुंबात जन्मलेली. एकेकाळची सुपर मॉडेल, सेलिब्रिटी पत्रकार, अनेक बेस्ट सेलर पुस्तकांची लेखिका आणि सध्या ट्विटर व इतर माध्यमातून बिनधास्त मते मांडणारी सोशल कमेंटर.

अनेकांना तीच बोलनं आगाऊ वाटत, तिची मते कित्येकांना पसंत पडत नाहीत. पण कोणाचीही भीडभाड न बाळगता अनेकदा कडू वाटणाऱ्या गोष्टी ती बोलून जाते.

तरुणपणी सुद्धा तिचा स्वभाव तडकफडक व बिनधास्त होता. असाच एक किस्सा तिच्या पत्रकारितेच्या काळातला.

शोभा डे तेव्हा स्टारडस्ट हे ग्लॅमर मॅग्झीन चालवायची. एकदा कुठल्यातरी फिल्म फेस्टिवल साठी शोभा व तिची सहकारी उमा राव या दोघी दिल्लीला आल्या होत्या. या काळात त्यांची भेट फिल्मस्टार संजीव कुमारशी झाली.

संजीव कुमार त्यावेळी यशाच्या शिखरावर होता. शोले, खिलोना, सीता और गीता सारख्या तुफान सुपरहिट सिनेमात त्याने काम केलेलं पण शिवाय आपल्या संवेदनशील अभिनयामुळे दोन राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक अवार्ड्स जिंकलेले.

अमिताभ तेव्हाचा सुपरस्टार असेल तर संजीव कुमार अभिनयाचा बादशहा होता.

त्याच्या पडद्यावरच्या इमेजप्रमाणे त्याची प्रत्यक्ष जीवनातली इमेज सुद्धा सुसंस्कृत , संवेदनशील व बुद्धीजीवी अशी होती. या माणसाच्या हातून विपरीत काही घडू शकणार नाही असंच वाटायचं.

सगळ्यांप्रमाणे शोभा डे सुद्धा संजीवकुमारच्या अभिनयाची फॅन होती.

फिल्म फेस्टिव्हल मध्ये ओळख झाल्यावर संजीवकुमारने त्या दोघींना एका पार्टीसाठी आमंत्रित केले. संजीव कुमार दिल्लीत ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला होता तिथे शोभा व उमा गेल्या.

संजीवकुमारच्या स्युटमध्ये त्या पोहचल्या तो पर्यंत पार्टी सुरुदेखील  झाली होती. तांबारलेल्या डोळ्यांनी एकामागून एक व्हिस्कीचे पेग रिचवणाऱ्या संजीव कुमारकडे बघतच शोभा डेला प्रचंड धक्का बसला. तो पाणी प्यावे तसा व्हिस्की ढोसत होता.

हे नेहमीच असाव या प्रमाणे पार्टीमधील बाकीचे लोक वावरत होते, गप्पा मारत होते. पण अशा पार्टीमध्ये पहिल्यांदाच येणाऱ्या शोभा डे व तिच्या मैत्रिणीला हे सगळ नवीन होतं. ते चुपचाप एका कोपऱ्यात खाण्याची प्लेट घेऊन काय चाललंय हे पाहत उभ्या होत्या.

काही मिनिटातच प्रचंड दारू पिलेल्या संजीवकुमारचा तोल सुटला.

त्याने अत्यंत अश्लील बडबड सुरु केली. झोकांड्या खातच तो उमा राव व शोभा डे यांच्या दिशेने येऊ लागला तेव्हा त्या दोघी घाबरल्या. उमा राव शोभाला म्हणाली,

“चल, ताबोडतोब इथून निघून जाऊ..”

शोभाच्या मनात देखील धोक्याची घंटी वाजली. हातातली खाण्याची प्लेट तशीच ठेवून ती हात धुण्यासाठी बाथरूमच्या दिशेने धावली. तिच्या मागून कोणाची तरी पावले वाजत होती. हात धुवून वर आरशात पाहते तोवर मागे दारात खुद्द  संजीव कुमार येऊन उभा होता.

शोभा म्हणते,

“त्याच्या लालभडक डोळ्यांमधून वासनेचे फुत्कार बाहेर पडत होते. त्याची वखवखलेली नजर माझ्या शरीरावर खिळली होती. मी शांतपणे मागे वळले. एखाद्या माजलेल्या बैलाप्रमाणे तो दार अडवून उभा होता. एक वेळ रस्त्यातला मवाली परवडला, इतक्या घाणेरड्या भाषेत त्याचं बरळण सुरु होतं.”

शेवटी हिंमत करून शोभाने आडदांड संजीवकुमारला दूर ढकलून दिलं. दारूच्या नशेत शिवीगाळ करत असलेला संजीव कुमार लटपटला. काही कळायच्या आत शोभा डे तिच्या मैत्रिणी कडे आले. पार्टीमधल्या कुणाचाही निरोपसुद्धा ण घेता वाऱ्याच्या वेगाने त्या तिथून निघून गेल्या.

शोभा डे आपल्या सिलेक्टिव्ह मेमरी या पुस्तकात म्हणतात,

“त्या दिवशी झालेल्या अपमानापेक्षा एका श्रेष्ठ नटाविषयीचा आमचा भ्रमनिरास अधिक क्लेशकारक होता.ज्याच्या अभिनय सामर्थ्याविषयी आम्हा दोघींना पराकोटीचा आदर होता तो माणूस इतका हलकटपणे वागू शकतो यावर क्षणभर आमचा विश्वासच बसेना. कालांतराने त्याचे ते शब्द मी विसरून गेले पण त्याच्या नजरेतली ती वखवख अजूनही पक्की लक्षात आहे.”

संदर्भ- माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा by शोभा डे

 हे ही वाच भिडू.

 

 

1 Comment
  1. Tushar G says

    शोभा डे या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवेल!! बाई, तू गप्प बस, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवावा असं वाटत असेल तर निदान दुसऱ्या कुठल्या तरी अभिनेत्री किंवा अभिनेत्याचे नाव घ्यायचं होतंस, बाकी उपयोग काही नाही झाला या सवंग लेखाचा

Leave A Reply

Your email address will not be published.