आयुष्यात पानाची टपरी काय शिकवते ? सिल्व्हर जिंकलेल्या संकेत सरगरची गोष्ट वाचून कळेल

दिवसभर राज्यपालांचं वक्तव्य हाच मुद्दा चर्चेत होता, मग एक बातमी आली की, सांगलीच्या संकेत सरगरनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. ५५ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये संकेतनं सिल्व्हर मेडल जिंकलंय.

सगळ्या देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण संकेतचं कौतुक करतोय. देशाला मेडल जिंकून देणं ही साहजिकच प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या स्टेटसवर संकेतचे फोटो आहेत, गडी ट्विटर ट्रेंडिगवर एक नंबरला आहे.

आपल्या मराठी मातीतल्या पोरानं एवढं मोठं मैदान मारलंय म्हणल्यावर, त्याची गोष्ट तर सांगायलाच हवी.

संकेत सरगरची गोष्ट सांगण्याआधी त्यानं विजय कसा मिळवला हे पाहायला पाहिजे…

संकेतनं ५५ किलो वजनी गटात २४८ किलो वजन उचलून सिल्व्हर जिंकलं, आता एवढं वाचून आपल्याला वाटतं की, ५५ किलो वजनाच्या पोरानं एका फटक्यात २४८ किलो वजन उचललंय, पण गणित असं नसतंय. वेटलिफ्टिंगमध्ये दोन प्रकार असतात, स्नॅच आणि क्लीन अँड जर्क. स्नॅच म्हणजे झटक्यात वजन उचलायचं, तर क्लीन अँड जर्क म्हणजे वजन उचलायचं, ते खांद्यावर घ्यायचं, तसाच तग धरायचा आणि मग वजन खाली टाकायचं. दोन्ही प्रकारात स्पर्धकांना ३ चान्स मिळतात, त्यात बेस्ट ऑफ थ्री निवडून तोच अंतिम निकालात काऊंट केला जातो.

संकेतनं स्नॅचमध्ये १०७, १११ आणि ११३ असं वजन उचललं, क्लीन अँड जर्कमध्ये १३५ किलोचा पहिला अटेम्प्ट दिला, त्यानंतर संकेतनं दोन्ही प्रयत्नांमध्ये १३९ किलो वजन उचललं खरं, पण दुखापतीमुळे त्याला अटेम्प्ट क्लिअर करण्यात अपयश आलं. त्यामुळे स्नॅचमध्ये ११३ आणि क्लीन अँड जर्कमध्ये १३५ हे दोन्ही बेस्ट अटेम्प्ट काऊंट होऊन त्याच्या नावापुढे २४८ किलो वजन लागलं. 

या प्रकारात गोल्ड मेडल जिंकलेल्या मलेशियाच्या बिन कासदान मोहम्मद अनिक यानं २४९ किलो वजन उचललं. दुखापत झाली नसती, तर एका किलोनं त्याचं गोल्ड मेडल हुकलं नसतं.

आता वळूयात संकेतच्या गोष्टीकडे

सांगलीतला अहिल्यादेवी होळकर रस्ता, भाग तसा वर्दळीचा. या रस्त्याला संकेत पान शॉप आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या चहाच्या टपरीवर तुम्हाला हमखास गर्दी दिसणार. ही टपरी आहे संकेतच्या कुटुंबाची. त्याचे वडील महादेव सरगर १९९० च्या सुमारास सांगलीला आले, त्यांची साधी फळाची गाडी होती. गाठीला पैसा नव्हता, पण कष्ट करायची ताकद खूप. पै-पै साठवून त्यांनी पानाची टपरी टाकली. पुढं घराला हातभार लावता यावा म्हणून चहा, वडापाव, पोहे विकणारी एक गाडीही सुरू केली.

घराचं अर्थचक्र तर सुरू होतं, पण महादेव यांची खेळाची आवड मागं पडली. त्यांनी एक दिवस १२ वर्षांच्या संकेतला घेतलं आणि घराजवळच्या दिग्विजय व्यायामशाळेत संकेतला नेलं. वेटलिफ्टिंगसाठी ही व्यायामशाळा चांगलीच नावाजलेली होती, तिथल्या नाना सिंहासने आणि स्वतः वेटलिफ्टर असणाऱ्या मयूर सिंहासने यांचं नावही चांगलंच गाजत होतं.

संकेत होता १२ वर्षांचा, त्याला फक्त एकच गोष्ट समजली की, आपल्याला उद्यापासून सकाळी ६.३० वाजता इथं प्रॅक्टिसला यायचंय.

सुरुवातीच्या दिवसात तो यायचा, प्रॅक्टिस करायचा आणि जायचा. मग हळूहळू त्यानं स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. पण त्यासाठी तो अशी ठराविक तयारी करायचा नाही. एक गोष्ट होती की त्यानं प्रयत्न करणं सोडलं नव्हतं.

संकेत ९ वीमध्ये असताना एका स्पर्धेत उतरला, वजन उचललं आणि सिल्व्हर जिंकलं. त्या विजयानं त्याला आनंद तर झाला, मात्र समाधान काय मिळालं नाही. त्याला जाणीव झाली की, अजून थोडे प्रयत्न केले असते, तर आपल्याला गोल्ड जिंकता आलं असतं. तो त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता.

स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीत संकेत सांगतो, ‘माझ्या वडिलांनी माल एक गोष्ट सांगितली होती. जर काहीतरी बनायचं असेल, तर कष्ट करावे लागतील. नाहीतर पुन्हा दुकानावर बसावं लागेल.’

पण मुळातच संकेतला दुकानात बसायची लाज वाटायची नाही. वडिलांवर कामाचा ताण असला किंवा ते बाहेर असले तर, तो पानाची टपरी किंवा नाष्ट्याची गाडी दोन्ही सांभाळायचा. सकाळी प्रॅक्टिस करुन झाली की संकेत गाडी सांभाळायचा, लोकांना नाश्ता वाढायचा आणि पानंही लाऊन द्यायचा.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो, त्या पॉईंटनंतर आपल्या आयुष्याचं ध्येय बदलतं

संकेतच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट आला, २०१८ मध्ये पानाच्या टपरीवर. बरोबर ५ वर्षांपूर्वीची कॉमनवेल्थ स्पर्धा. आजच्यासारखा तोही दिवस वेटलिफ्टिंगच्या स्पर्धांचा होता. भारताचा आघाडीचा वेटलिफ्टर गुरुराजा पुजारी वजन उचलत होता. संकेत त्यावेळी एका कस्टमरचं मसाला पान लावत होता, त्याचे हात कात चुना लावत होते पण डोळे आणि डोकं टीव्हीत घुसलेलं.

बघता बघता पुजारीनं सिल्व्हर मारलं आणि त्याचक्षणी संकेतला जाणवलं. ‘पुढच्यावेळी आपल्याला मेडल जिंकायचंय.’ त्यानं कॉमनवेल्थमध्ये जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आणि वजनीगटापासून तयारीपर्यंत प्रत्येक गोष्ट बदलली.

(विशेष म्हणजे आज ५५ किलो वजनी गटात संकेतनं सिल्व्हर जिंकलंय, तर ६१ किलो वजनी गटात पुजारीनं ब्रॉंझ मारलंय.)

त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्सच्या दृष्टीनं संकेत ४९ किलो वजनी गटाऐवजी ५५ किलो वजनी गटातून खेळू लागला. वजन वाढवल्याचा फायदा त्याला ट्रेनिंग आणि डाएटमध्येही झाला. मेहनतही वाढली कारण स्वप्न मोठी झाली होती.

२०२० मध्ये कोलकातामध्ये नॅशनल गेम्स झाल्या, तिथं संकेतनं ५५ किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं. मात्र वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याला अटेम्प्ट क्लिअर करता आले नाहीत, कॉमनवेल्थचं स्वप्न काहीसं अवघड झालं. मात्र सिंगापूर ओपनमध्ये मोठा स्कोअर करुन जागा पक्की करायची संधी होती, त्यानं त्या स्पर्धेत एकूण २५६ किलोचा स्कोअर करत, कॉमनवेल्थ रेकॉर्ड केलं आणि बर्मिंगहॅमच्या स्पर्धांमध्ये आपली जागा नक्की केली.

या स्पर्धेत एकूण २४८ किलोचा स्कोअर करत संकेत ५५ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडलचा मानकरी ठरलाय.

कुठल्याही खेळात एखादा चॅम्पियन प्लेअर मिळाला की त्याच्या यशाचा फॉर्म्युला काय असा प्रश्न विचारला जातो, संकेतनं ‘स्पोर्टस्टार’ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या यशाचं गणित उलगडलं होतं.

“टपरीवर काम करणं हे सुरुवातीला मला दडपण वाटायचं, पण मी खेळ आणि काम कसं मॅनेज करायचं हे त्यातूनच शिकलो. त्या कामानं मला लोकांपुढं कसं वावरायचं, लोकांशी कसं बोलायचं हे शिकवलं. कधीकधी दिवसभरात तीन-चारशे लोकांशी माझं बोलणं व्हायचं, प्रत्येकाची मागणी वेगळी असायची पण त्यामुळं माझी एकाग्रता वाढली. अनेक गोष्टी एकत्र कशा मॅनेज करायच्या हे शिकलो आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला जमू लागलं.”

ना कुठलं मोठं मेंटल ट्रेनिंग, ना कसला गवगवा… पोरगं नॅशनल जिंकून आल्यावरही न लाजता पान टपरीवर बसलं आणि तिथून धडे घेत आज कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडलपर्यंत पोहोचलं, हाच त्याच्या यशाच्या फॉर्म्युला होता.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.