नामदेवांनी चोखोबांची अस्थी शोधली आणि विठुरायाच्या महाद्वारात त्यांची समाधी उभारली..

‘ तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती ।। ’
खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय.

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाचं नाव म्हणजे संत चोखामेळा. संत चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला. संत नामदेव महाराजांच्या संतमेळ्यातील ते संतकवी होते. जातीने महार असल्यामुळे त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. पण ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.

मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. चंद्रभागेत अंघोळ करून आणि विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून आपल्या नित्याच्या कामाला ते सुरवात करत असे. मंदिराच्या बाहेरून दर्शन घेत असताना लोकं त्यांची चेष्टा करत असायचे आणि म्हणायचे ,

पांडुरंग दिसत नाही तर त्याची भक्ती कशाला करतो, जर विठ्ठलाचं तुझ्यावर इतकं प्रेम असत तर त्याने तुला थेट गाभाऱ्यात नेलं नसतं का ?

यावर चोखामेळांनी समर्पक उत्तर द्यायचे,

ज्याप्रमाणे सूर्य आकाशात राहून सगळ्यांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे पांडुरंग मंदिरात राहून माझ्यावर त्याची कृपादृष्टी ठेवत असतो.

अभंगामधून त्यांनी विठ्ठलावरील प्रेम, भक्ती, सोबत अस्पृश्य म्हणून समाजाने दिलेला त्रास आणि त्यामधून सोडवणूक करण्याचे परमेश्वराकडे केलेले निवेदन आदी विषय मांडले आहेत. तसेच संत चोखामेळांच्या अभंगांचे प्रतिबिंब संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून दिसून येते. संपूर्ण कुटुंब अशिक्षित असूनही त्यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती.

चोखामेळांना प्रवेश वर्ज्य असूनसुद्धा त्यांनी मंदिरात प्रवेश केला त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याने आणि लोकांनी चोखोबांना मंदिरातून बाहेर काढलं. आणि या गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा सुनावली कि आता चोखोबांना पंढरपुरात राहता येणार नाही त्यांना भीमा नदीच्या पलीकडे राहण्याचं सांगितलं.

आपल्या कुटुंबासोबत चोखामेळा चंद्रभागेच्या पलीकडे राहू लागले, आणि तिथूनच ते विठ्ठलाची सेवा करत असे. लिंबाच्या झाडाखाली बसून ते विठ्ठलाला जाब विचारत कि विठ्ठला मी खरंच इतका पापी आहे का कि मला तुझी भेट घडत नाहीए, तुझ्या मंदिराला मला प्रदक्षिणा घालता येत नाहीए. संसारामध्ये दैन्य , दारिद्र्य असल्याने ते अस्वस्थ होते , पुढे त्यांना संतसंग लाभला आणि ते अभंग लिहू लागले.

गावगाड्याच्या शिवाशिवीच्या वातावरणात त्यांची घुसमट होत होती. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी होत्या पण प्रत्यक्ष भगवंत त्यांच्यासोबत होते. जातीय विषमता, वर्णव्यवस्था, उच्चनीचता या गोष्टींमध्ये चोखामेळा होरपळून निघाले होते. आपल्या अभंगांमधून त्यांनी जातिव्यस्थेवर प्रहार केला. भेदाभेद अमंगळ म्हणून त्यांनी जातीय विषमतेवर टीका केली. त्यांचे अभंग अनंत अभ्यंग भट हे लिहीत असत.

इसवी सण १३३८ मध्ये मंगळवेढ्यातील किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असताना ते बांधकाम अचानक कोसळलं. या भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत संत चोखामेळांसमवेत अनेक मजूर मृत्युमुखी पडले. या घटनेने सगळीकडे हाहाकार सुरु झाला. या प्रचंड गदारोळात चोखोबांच्या अस्थी सापडेना.

या घटनेचं अतोनात दुःख संत नामदेवांना झालं त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या ढिगाऱ्याखाली अस्थी शोधणं सुरु केलं. असं सांगितलं जात की ते तिथली प्रत्येक अस्थी उचलत आणि कानाला लावत, ज्या अस्थीतून विठ्ठलाचा जयघोष ऐकू येत असे ती संत चोखामेळा यांची अस्थी होती. अशा प्रकारे सगळ्या अस्थी नामदेवांनी गोळा केल्या आणि त्याची पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारात समाधी बांधली असं चरित्रकार सांगतात.

संत चोखामेळांनी लिहिलेले अभंग हे एकप्रकारचे मूक आक्रंदन होते. संत चोखामेळा हे संत नामदेवांना गुरु मानत असे, त्यांचे अभंग आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

चंदनाच्या संगे बोरिया बाभळी

हेकळी टाकळी चंदनाची  ||१||

संतांचिया संगें अभाविक जन

तयाच्या दर्शनें तेचि होती  ||२||

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा

नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा  ||३||

पंढरपुरी वास्तव्यास असताना आणि तिथे काम करत असताना ते अभिमानाने सांगायचे कि,

मी विठू पाटलाचा बलुतेदार आहे.

त्यांच्या विठ्ठलभक्तीची ओढ प्रत्येकाला आकर्षित करते. पुढे संत चोखामेळांच्या जीवनावर चित्रपटही आले.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.