सापशिडीच्या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलीय?

कोरोना व्हायरस आला आणि सगळ्या जगभरात आवाहन केलं गेलं की घर सोडून बाहेर पडू नका. शाळा कॉलेज बंद करण्यात आले. बऱ्याच ऑफिसेस ना सुट्टी देण्यात आली. एकंदरीत सगळ्या जगाला सक्तीची विश्रांती देण्यात आली.

दिवसभर घरात बसायची सवय मोडली होती आणि पब्जी वगैरे तर आपल्याला जमत नाही. मग काय माळ्यावरून जुने बैठे गेम्स बाहेर काढले गेले. यात सगळ्यात फेमस गेम म्हणजे सापशिडी.

मे महिन्याच्या सुट्टीत सगळी भावंडं जमली की सापशिडी, ल्युडो, पत्ते, लपंडाव हे खेळले जायचे. खऱ्या सापांपेक्षाही या सापांची जास्त भीती वाटायची. आजही वाटते.

पण मुळात प्रश्न पडतो की सापशिडी चा शोध कोणी लावला असेल?

आता आपली गुलामगिरीची मानसिकता झाली आहे त्यामुळे सापशिडी चा शोध सुद्धा इंग्लंड अमेरिकेत लागलाय अस वाटण साहजिक आहे. पण हा तुमचा गैरसमज आहे.

सापशिडीचा शोध आपल्या महाराष्ट्रात लागलाय आणि तो ही आपल्या संत ज्ञानेश्वरांनी !

ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले, पसायदान लिहिले, अनिष्ठ रूढीपरंपरावर प्रहार केला, समाजप्रबोधन केले हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण त्यांनी सापशिडी खेळाचा शोध लावला हे मात्र नवलच आहे.

इतके वर्ष वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारे इतिहास संशोधक याना माहिती होती मात्र थेट पुरावे नव्हते. सर्वसामान्य जनता तर यापासून अनभिज्ञ होते. मात्र डेन्मार्क जेकॉब यांनी काही वर्षांपूर्वी ही माहिती उलगडली.

डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉ. एरीक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘इंडियन कल्चरल ट्रेडिशन’ या संकल्पने अंतर्गत मध्ययुगात काळात भारतात खेळले जाणारे खेळ हा विषय संशोधनासाठी घेतला. यातच त्यांच्या लक्षात आलं की तेराव्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

त्यांनी भारतात येऊन या बद्दलचं संशोधन सुरू केलं.

तेव्हा त्यांना अनेक जुने सापशिडी पट मिळाले पण योग्य संदर्भ मिळत नव्हता. ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याबद्दल कुठे उल्लेख नव्हता.

अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे जेकब यांनी विचारणा केली असता मंजुळ यांनी डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपटा’चा उलगडा झाला.

जेकॉब यांना डेक्कन कॉलेजमध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले आहेत.

मोक्षपट हा पहिला सापशिडीपट होता. अस म्हणतात की भिक्षा मागायला गेल्यावर घरात राहिलेल्या लहानग्या सोपानदेव आणि मुक्ताई यांचे मन रमावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आणि त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथानी या खेळाचा शोध लावला.

लहान मुलांना खेळातुन चांगले संस्कार मिळावेत यासाठी याची निर्मिती केली असावी.

मोक्षपटाचे दोन्ही पट २० बाय २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. त्यातील शिडी हि सद्गुणांचा प्रतीक तर साप हा दुर्गुणांचा प्रतीक म्हणून दाखवला आहे, चांगल्या कृत्याने मोक्ष प्राप्ती तर दुष्कृत्याने पुनः जन्म चक्रात अडकणे असा त्याचा अर्थ होतो म्हणून साप असलेल्या आकड्यावर गेल्यावर पुन्हा सुरुवात करावी लागते तर शिडी मिळाली कि आपणांस आपल्या लक्षाच्या जवळ जाण्यास मदत होते.

ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती नाथ, सोपानदेव, मुक्ताई हे सर्व भावंडं हा खेळ खेळत असत. पुढे भारत भरात या खेळाचा प्रसार झाला.

जेव्हा इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धिबळ, ल्युडो प्रमाणे ते या खेळाला देखील इंग्लंड मध्ये घेऊन गेले आणि तिथे या याचं नाव ठेवलं, स्नेक अँड लॅडर

व्हिक्टोरियन इंग्लिश प्रमाणे त्यात थोडे बदल ही करण्यात आले. आणि आज आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळतो. पण त्याची मूळ संकल्पना, त्याचे शोधकर्ते हा सगळा विस्मृतीत घालवून बसलो आहे.

संदर्भ- “व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर- हिस्ट्रि टाइमलाईन”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.