तुकडोजींच्या भजनाने प्रेरित होऊन गावच्या गावे ब्रिटिशांवर हल्ला करू लागली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुढाकारातून आणि प्रेरणेतून अनेकी ग्रामविकासाची कामे झाली. लोक स्वतःहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ लागली. केवळ लेखणीच्या जोरावर त्यांनी गावच्या गाव गोळा करून प्रचंड जनसमुदाय देशासाठी लढण्यास सज्ज केला.

जे राष्ट्रासाठी लिहितात, चालतात बोलतात , आयुष्य खर्ची घालतात , मृत्यू आला तरी ज्यांच्या मनात नसते खंत ते म्हणजे राष्ट्रसंत.

१९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मोठं योगदान होतं. चले जाव आंदोलनाच्या काळात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, वर्ध्यातील आष्टी, अमरावती जिल्ह्यातील यावली बेलोडा यासारखी गावच्या गाव तुकडोजींच्या भजनाने स्वतंत्रलढ्यासाठी पुढे सरसावली. प्रबोधन करताना त्यांच्या वाणीतून देशभक्तीचे पडणारे उच्चार तरुण मनाला त्वेषाने लढण्यास उत्स्फूर्त करायचे. गावोगावी जाऊन , मजुरांच्या तांड्यावर जाऊन त्यांनी जनजागृती केली.

तरुण मुलांना बलोपासनेचे महत्व पटवून देऊन देशाला परकीयांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ताकद महत्वाची आहे असं पटवून देऊन भजनरुपी त्यांनी लोकांना सांगितलं. १९४२च्या रणसंग्रामात तुकडोजींच्या आवाहनाने अनेक लोकांनी ब्रिटिश सरकारवर हल्ला चढवला अनेक इंग्रज अधिकारी रेकॉर्डसहित जाळून टाकले , यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले, देशासाठी ते खर्ची पडले ते तुकडोजींच्या क्रांतीरूपी प्रेरणेतून.

ब्रिटिश लोकांच्या हत्येने इंग्रज सरकार पेटून उठलं. या लोकांना भडकवून देणाऱ्या माणसाला ते शोधू लागले आणि त्यांना कळलं कि हि सामान्य लोकं जीवावर उदार होऊन लढण्यास कारणीभूत आहेत तुकडोजी महाराज. यावर ब्रिटिश सरकारने तुकडोजींना पकडा असं फर्मान जरी केलं, त्यांच्या अटकेसाठी योजना आखण्यात आली, इंग्रज गोटात खलबतं चालू झाली. तुकडोजी महाराज पकडल्यानंतर इथल्या लोकांची ताकद कमी होईल असा होरा इंग्रज सरकारचा होता.दुसऱ्या दिवशी तुकडोजी महाराजांना जेरबंद करा अशा सूचना गुप्तपणे जारी करण्यात आल्या.

मात्र हि खबर इतकी गुप्त असतानाही तुकडोजी महाराजांनी आदल्या रात्री आपल्या नोंदवहीत सगळ्या प्रचाराची माहिती लिहून काढली होती. मला तुरुंगात टाकल्यानंतर कोण काय भूमिका घेईल, आंदोलने अधिक आक्रमक कशा प्रकारे करता येईल, प्रचाराचं स्वरूप कसं असेल अशी सगळी काटेकोर माहिती त्यांनी लिहून ठेवली.

चंद्रपूर जिल्ह्यात चातुर्मास शिबिरात तुकडोजी महाराज लोकांना प्रबोधन करत बसले होते. तोच त्यांच्या संपूर्ण आश्रमाला इंग्रजांनी घेराव घातला. तीन जीपगाड्या त्यांना पकडण्यासाठी आल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांना पाहून तुकडोजींचे सहकारी त्यांना प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावले मात्र तुकडोजींनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या सेवेत असलेले अधिकारी शर्मा पुढे आले आणि त्यांनी तुकडोजींना वंदन केले. जे अधिकारी तुकडोजींना पकडण्यासाठी आले होते तेच वंदन करताना पाहून लोकांना त्यांच्या शक्तीचा अंदाज आला. ते नम्रपणे स्वाधीन झाले.

नागपूरच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळला. अनेक लोकांनी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आंदोलनाच्या धमक्या देणार आल्या. यामुळे इंग्रज अधिकारी घाबरले त्यांनी नागपुरातून तुकडोजींना दुसऱ्या ठिकाणी धाडले पण लोकांचा राग तसाच होता. तुकडोजींच्या अनुयायांनी सरसकट धमकी दिली कि ५ डिसेम्बर १९४२ला जर महाराजांची सुटका झाली नाही तर आंदोलन तीव्र करू, शेवटी इंग्रजांनी तुकडोजी महाराजांना सोडलं.

त्यांना सोडवण्यासाठी एक इंग्रज अधिकारी त्यांच्या तुरुंगात आला आणि तो मोठ्या गुर्मीत म्हणाला कोण हे तुकडोजी महाराज ? त्यावेळी तुकडोजी महाराज कपडे धुवत होते, अधिकाऱ्याने बाकी पोलिसांना सांगितलं कि क्लास वन कैद्यांना तुम्ही कपडे का धुवायला लावतात ? तेव्हा त्या अधिकाऱ्याला उत्तर मिळाला कि तुकडोजी महाराज स्वतःच काम स्वतः करतात. यावर तो अधिकारी वरमला आणि त्याने सन्मानाने तुकडोजी महाराजांना सोडवून बाहेर आणलं.

तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल राष्ट्रपती भवनमध्ये भजन गात असताना डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत हि पदवी दिली.

१९०९ ते १९६८ या आपल्या जीवनकाळात प्रचंड ग्रामविकास कामे त्यांनी केली, भजनांमधून, साहित्यातून जनजागृती केली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.