संथ वाहते कृष्णामाई या एका गाण्यामुळे राज्याचं भाग्य बदलणारी योजना बनली….

पाणी आडवा – पाणी जिरवा. १९७० च्या दशकात राज्याचं भाग्य बदलणारी योजना अस्तित्वात आली होती. आजही या योजनेचे महत्व १ टक्का देखील कमी झालेले नाही. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेतून या योजनच्या माध्यमातून राज्यभरात जलक्रांतीची बीज रोवली गेली. १९७२ च्या दुष्काळात तर या योजनेने चांगलाच मदतीचा हात दिला होता.

मात्र वसंतराव नाईक यांना या योजनेची बीज सापडली होती ती एका चित्रपटाच्या गीतामध्ये.

वसंतराव नाईकांचा जन्मच मुळात एका शेतकरी कुटुंबात झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर पिढीजात शेतीचे संस्कार झाले होते. म्हणूनच यशवंतराव चव्हाणांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद दिले होते. पुढे मुख्यमंत्री झाल्यावरही वसंतराव नाईकांनी आपले सर्व लक्ष शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काय करता येईल या कामी खर्ची घातले.

मी महाराष्ट्राला अन्नपाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं नाही तर मला फासावर लटकवा हे ते फक्त बोलले नाहीत तर त्यांनी हरितक्रांतीतून हे सिद्ध करून दाखवलं. ज्वारी एकाधिकार योजना, कापूस एकाधिकार योजना, रोजगार हमी अशा योजना आणल्या. पाऊस पडला तर ते अक्षरशः मंत्रालयात पेढे वाटायचे. एकूणच काय तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे स्वप्न ते पूर्ण काळ जगले.

शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो चमत्कार करून दाखवतो हा त्यांचा आवडता सिद्धांत होता.

वसंतराव आपल्या भाषणात सांगायचे,

जमीन पावसाच्या पाण्याने भिजवा, ते जमत नसेल तर डोक्यावरून पाणी आणा, तेही जमत नसेल तर घामाने जमीन भिजवा पण जमीन ओली करा.

पाण्याच्या बाबतीमधील अशीच ते मुख्यमंत्री असताना १९६७-६८ च्या आसपासची गोष्ट.

नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या चित्रपट निर्मात्यांनी ‘संथ वाहते कृष्णामाई’ हा चित्रपट काढला होता. याच चित्रपटात याच नावाच एक गीत ग. दि. माडगुळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं. दत्ता जावडेकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर फडके म्हणजे बाबुजींच्या दमदार, भारदस्त आवाजातील ते गीत होतं.

या गीताची एक ध्वनीमुद्रिका माडगूळकरांनी वसंतरावांना ऐकवली. त्यातील खालील ओळी त्यांना खूप आवडल्या.

।। सतत वाहत उदंड पाणी,
कुणी न वळवून आणि राना ।।

ह्या कृष्णामाईच्या उदरात उदंड पाणी आहे, जे वाहून जात आहे, पण कुणाच्याही डोक्यात हा विचार आला नाही की हे पाणी अडवून शेतीसाठी वळवून न्यावे असा त्या ओळींचा भावार्थ होता. वसंतरावांना ओळी भावल्या होत्या. त्यातुनच त्यांनी राज्यभरात जलजागृती करण्याचा विचार बोलून दाखवला आणि महाराष्ट्राच्या खेडो-पाडी हे गीत ऐकवले गेले पाहिजे यासाठी त्यांनी माडगूळकरांना सांगितले.

वसंतरावांच्या याच अस्वस्थतेमधून आजच्या ‘जलसंधारण’ संकल्पनेमधील ‘पाणी अडवा पाणी जिरवा ही जी मोहिम रुजली गेली. उपलब्ध असलेल्या पाण्याचा थेंब न् थेंब शेतीच्या उपयोगात आणला पाहिजे, याचा उत्कट ध्यास त्यांना लागला होता.

वसंतरावांच्या या संकल्पनेला त्यावेळी योग्य न्याय दिला तो तत्कालिन मंत्री शंकरराव चव्हाण यांनी. ते देखील जलतज्ञ म्हणून ओळखले जायचे. शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. नाथसागर सारखी मोठी धरणे बांधली, कालवे काढले. पण जिथे हे शक्य नाही तिथे खेडोपाड्यातील छोट्या छोट्या ओढ्या- नाल्यांना बांध घालून पाणी वाया न घालवू देण्याची खबरदारी त्यांनी घेतली होती.

एकूणच काय तर नाईक – चव्हाण जोडगोळीने एक गाण्यातुन सुचलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेला महाराष्ट्राची भाग्य बदलवणारी योजना बनवलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.