एकेकाळी संतोषी माता म्हणून त्यांच्या पोस्टरची पूजा केली जायची पण शेवट अत्यंत दुर्दैवी होता.

सिनेमा क्षेत्र हे असं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं की उमेदीच्या काळात चांगलं काम करून आणि भरपूर पैसा कमवून ठेवणे जेणेकरून म्हातारपणात सिनेमा जरी नाही मिळाला तरी साठवलेल्या पैशातून उदरनिर्वाह होऊ शकतो. नाहीतर मागच्या काही काळात आपण असे अनेक अभिनेते,अभिनेत्री, गीतकार,गायक पाहिले ज्यांचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला.

असाच एक किस्सा आहे संतोषी माता या ऐतिहासिक सिनेमातल्या लीड रोलमध्ये असलेल्या अनिता गुहा यांचा. शेवटच्या काळात आजारपण आणि नैराश्य याने ग्रासून त्या गेल्या होत्या पण शेवटच्या काळातही त्या म्हणाल्या होत्या की माझे अंत्यसंस्कार करताना माझा चांगला मेकअप करा. तर जाणून घेऊया काय होता हा किस्सा.

१९७५ चं साल होतं. बॉलिवूडच्या दृष्टीने हे साल ऐतिहासिक होतं. शोले आणि दिवार या दोन सिनेमांसोबत अजून एक सिनेमा रिलीज झाला होता तो म्हणजे जय संतोषी माँ. या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई केली.

बरेच रेकॉर्ड तर तोडलेच शिवाय शोले सारख्या हिट सिनेमाला चांगलीच टक्कर दिली होती. जय संतोषी माँ या सिनेमाने त्या काळात ५ करोडची कमाई केली होती. या सिनेमात संतोषी मातेचं पात्र साकारलं होतं अनिता गुहा यांनी.

पडद्यावर संतोषी माताचं पात्र साकारल्याने अनिता गुहा यांना इतकी प्रसिद्धी मिळाली होती की पूर्ण भारतभर त्यांचा बोलबाला झाला होता. इतकंच नाही तर सिनेमावेडे आणि देवीच्या भक्तांनी अनिता गुहा यांच्या पोस्टरला पुजायला सुरवात केली होती. याही पेक्षा वाढीव म्हणजे अनिता गुहा याच ओरिजिनल संतोषी माँ आहेत अशी धारणा लोकांची झाली होती.

अनिता गुहा या ६०-७० च्या दशकातल्या सगळ्यात जास्त प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आपल्या सिनेमाच्या काळात त्या सगळ्यात जास्त यशस्वी जरी असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. अनिता गुहा यांनी अभिनेते माणिक दत्त यांच्या सोबत विवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर माणिक दत्त यांचं निधन झालं. अनिता गुहा या कधीही आई बनू शकल्या नाही.

अनिता गुहा यांना शेवटपर्यंत या गोष्टीचं दुःख होतं की सारा देश त्यांना आईच्या मायेने पूजतो नेमकं त्यांनाच आई होता आलं नाही. पतीच्या निधनाने त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत गेला. त्यांना सतत नैराश्य असल्याचं जाणवू लागलं होतं. या नैराश्याच्या काळातच त्यांना ल्युकोडर्मा या आजाराने गाठलं. त्यांच्या सगळ्या शरीरावर पांढरे डाग दिसून येऊ लागले.

अनिता गुहा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या जेव्हा शाळेत होत्या तेव्हापासूनच त्यांना मेकपची प्रचंड आवड होती. याच मेकअपच्या कारणावरून त्यांना बऱ्याचदा मारही खावा लागला होता. मेकअपची आवड असलेल्या अनिता गुहांना ल्युकोडर्माने ग्रासल्यानंतर त्यांना मजबुरीने कायमस्वरूपी जास्त मेकअप करून राहणं भाग पडलं.

२० जून २००७ रोजी अनिता गुहांचं निधन झालं. आपल्या शेवटच्या काळात ल्युकोडर्मा आणि नैराश्याने त्या इतक्या खचल्या होत्या की त्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगून ठेवलेलं होतं की अंत्यसंस्कार करण्याच्या आधी माझा मेकअप करा जेणेकरून माझ्या चेहऱ्यावरचे पांढरे डाग लोकांना दिसायला नको. त्यांच्या या इच्छेनुसार तस करण्यातही आलं होतं. देशाची संतोषी माता असलेल्या अनिता गुहा यांच्या वाट्याला शेवटी असे दुर्दैवी दिवस आले होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.