नेहरूंच्याही आधी सरदार पटेलांनी फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता..?

 

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती ही अनेक भारतीयांसाठी भळभळती जखम राहिलेली आहे. त्यामुळेच फाळणीनंतर आज इतक्या वर्षांनी देखील अनेकांना या कटू आठवणी हेलावून सोडतात. फाळणीने दिलेल्या जखमा अजूनदेखील भरलेल्या नाहीत.

फाळणीच्या प्रस्तावाचा स्वीकार करणं हे त्या काळातील भारतीय नेत्यांना खचितच सोपं नव्हतं. पण परिस्थितीच अशी ओढावली गेली होती की हा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय राष्ट्रीय नेत्यांकडे दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. म्हणूनच भारताच्या फाळणीचा स्वीकार करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी देखील अतिशय जड अंतकरणाने हा प्रस्तव स्वीकारला होता, कारण भारताची फाळणी ही एक अपरिहार्य आवश्यकता होता. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे कटू सत्य पचवायलाच लागणार होतं.

फाळणीचा विषय जेव्हा कधी निघतो त्यावेळी हिंदुत्ववाद्यांकडून कायमच फाळणीचं खापर जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्यावर फोडण्यात येतं. फाळणीसाठी नेहरूंना जबाबदार धरून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. (सध्याच्या काळात तर कुठल्याही गोष्टीसाठी नेहरूंना जबाबदार धरण्याची एक फॅशनच भारतीय राजकारणात रूढ होऊ लागलीये.) पण त्याचवेळी भारताच्या फाळणीचा स्वीकार जवाहरलाल नेहरू यांच्याही आधी सरदार वल्लाभभाई पटेल यांनी केला होता, ही गोष्ट हिंदुत्ववादी लोक जाणीवपूर्वक लपवून ठेवतात.

भारताच्या फाळणीतील सरदार पटेल यांच्या भूमिकेविषयी व्ही.पी. मेनन यांनी लिहून ठेवलंय. व्ही.पी. मेनन हे फाळणीची योजना तयार करणाऱ्या लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासोबत काम करत होते. मेनन यांच्यानुसार भारताच्या फाळणीच्या कल्पनेचा स्वीकार सरदार पटेल यांनीच सर्वप्रथम डिसेंबर १९४६ मध्ये केला होता.

सरदार पटेल यांनी फाळणीचा स्वीकार करेपर्यंत नेहरू या विषयी काय भूमिका घ्यावी याबाबतीत गोंधळलेले होते. सरदार पटेलांनी फाळणीचा स्वीकार केल्यानंतर जवळपास ६ महिन्यांनी नेहरूंनी फाळणीस मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.

व्ही.पी. मेनन यांच्याव्यतिरिक्त फाळणीचे विरोधक असणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी देखील ‘इंडिया विन्स फ्रीडम’ या पुस्तकात सरदार पटेलांच्या फाळणीतील भूमिकेविषयी लिहिलंय.

अबुल कलाम आझाद लिहितात की “भारताच्या फाळणीची आवश्यकता का आहे या प्रश्नावरील सरदार पटेलांचं उत्तर ऐकून मला एकाच वेळी दुःखही झालं आणि आश्चर्याचा धक्का देखील बसला. पटेल म्हणाले की आपल्याला पटो किंवा न पटो पण आता भारतात २ राष्ट्रांचं अस्तित्व असेल”

अर्थात पटेलांनी देखील हा निर्णय काही खूप आनंदाने घेतला नव्हता. भारताची फाळणी ही एक अप्रिय परंतू अपरिहार्य आवश्यकता होती. म्हणूनच दूरदृष्टी असलेल्या पटेलांनी राजकीय शहाणपणातून फाळणीच्या प्रस्तावाचा स्वीकार करण्याचा व्यवहार्य निर्णय घेतला होता.

मोहम्मद अली जिनाः यांच्या हेकेखोरपणाचं परिपाक म्हणून भारताची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान ही २ वेगवेगळी राष्ट्रे अस्तित्वात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.