अन्याय कोणावर झाला ?

सरदार वल्लभ पटेल यांच्यावर अन्याय झाला याविषयी खूप लोक लिहिताहेत. नेहरूंच्या ऐवजी सरदार पंतप्रधान व्हायला पाहिजे होते हा एक भावनिक मुद्दा बनवला जातोय. अर्थात सरदार खूप मोठे नेते होते आणि खरोखर लोहपुरूष होते हे सगळ्यांना मान्य आहे. पण पंतप्रधानपद सरदार पटेलांना मिळू शकलं नाही यात त्यांच्या तब्येतीचं कारणही खूप मोठं होतं हे सत्य मात्र समोर येत नाही. 

खरंतर इंग्रजांच्या काळातच नेतृत्व नेहरुंकडे आलं होतं. अर्थात पटेल पंतप्रधान झाले असते तर काय झालं असतं या विषयावर विचार करायला हरकत नाही. पण त्याने आज हाती काय लागणार आहे? 

आज आपण पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते असं म्हणू शकतो. कदाचित त्यांनी नेहरुंपेक्षा वेगळ्या पद्धतीने देश चालवला असता. कारण ते स्वंतत्र विचारांचे होते. त्यांची स्वतःची कार्यपद्धती होती. पण पटेल मोठे होते हे सिध्द करण्यासाठी नेहरुंना छोटं ठरवायची काही गरज नसते. कारण अशी तुलनाच मुळात अन्यायकारक आहे. दोघांवरही. आणि अशा तुलनेतून पुढच्या अनेक तुलनांचा जन्म होतो. 

त्यात सगळ्यात महत्वाची तुलना येते ती पटेल आणि अडवाणी यांची. 

कारण पटेल यांच्यावर अन्याय झाला असं म्हणायचं तर अडवाणी यांच्यावर तर घोर अन्याय झाला असं म्हणावं लागेल.

जसे पटेल गृहमंत्री होते तसेच अडवाणी पण आपल्या देशाचे गृहमंत्री. पटेलांनी जसे कॉंग्रेससाठी कष्ट केले तशीच अडवाणींनी दोन खासदारांची भारतीय जनता पार्टी थेट नव्वदीच्या घरात नेली. पटेलांच्या काळात नेहरू लोकप्रियतेच्या लाटेवर होते तसे अडवाणींच्या काळात वाजपेयी लोकप्रिय होते. पटेल पंतप्रधान होतील असं त्याकाळी जसं खूप लोकांना वाटत होतं तसंच अडवाणी पंतप्रधान होतील असं बीजेपी सत्तेवर आली तेंव्हा लोकांना वाटत होतं. पटेल आजारी होते. अडवाणी मात्र ठणठणीत होते. पण बीजेपीने वाजपेयींचा चेहरा पुढे केला. अडवाणी यांनी वाजपेयींचं नाव सुचवलं तरी अडवाणींची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिली नव्हती. अर्थात वाजपेयींच्या काळात त्यांना उप पंतप्रधान बनून समाधान मानावं लागलं. ज्या पदाला तसा काही अर्थ नसतो.

पण त्या काळात अडवानींना लोहपुरुष म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. पण अडवाणी यांची शोकांतिका वाजपेयी यांच्या नंतर सुरु होते. ते अचानक नेतृत्वाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. निदान राष्ट्रपतीपद देणं शक्य असूनही बीजेपीने त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं. पटेलांवर अशी वेळ आली नव्हती. म्हणून पटेल आणि अडवाणी यांची तुलना केली तर जास्त अन्याय अडवाणी यांच्यावर झालाय हे लक्षात येतं. 

नेहरू आणि पटेल यांच्यात वाद असल्याच्या कितीही गोष्टी समोर आल्या तरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नेहमी आदराने वागवलं. अडवाणी ज्याप्रकारे व्यासपीठावर असूनही मोदी त्यांना साधं हात मिळवण्याचं सोडा नमस्कार करण्याचं सौजन्य सुद्धा दाखवत नाहीत हे जगाने पाहिलंय. नेहरू पटेलांचा काळ असा नव्हता. खरंतर काश्मीर प्रश्नात आज आपण जास्तीत जास्त गुरफटत चाललोय. पंजाबमध्ये घुसून बॉम्बस्फोट होताहेत.

अशावेळी अडवाणी यांचा अनुभव महत्वाचा आहे. त्यांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. पण अडवाणी एकाकी पडलेत. पाडले गेलेत. एक पक्ष उभा करणारा नेता अश्या प्रकारे अडगळीत फेकला गेलाय. आणि त्या नेत्याने उभी केलेली फळी एका शब्दानेही त्याच्या समर्थनासाठी उभी राहू शकत नाही हे प्रचंड दुर्दैवी आहे. 

कॉंग्रेसने पण नरसिंहरावांना अडगळीत टाकलं होतं. पण आधी ते निदान पंतप्रधान तरी झाले होते. गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती इंदिरा गांधी यांच्यानंतर कॉंग्रेसमध्ये फार सन्मान मिळवू शकली नाही. अपमानाच्या या घटना राजीव गांधीच्या काळात देखील घडल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री अंजैय्या यांचा झालेला हैद्राबाद विमानतळावरचा अपमान आणि त्यातून तेलगु देसम पार्टीचा उदय, पुढे केसरी, नरसिंहराव असे कित्येक उदाहरणे लोकांच्या लक्षात आजही आहेत. ती कॉंग्रेसची संस्कृती बनली.

पण कॉंग्रेसची संस्कृती बीजेपी आत्मसात करेल असं वाटलं नव्हतं. तेही कॉंग्रेसच्या दोन पावलं पुढे जाऊन. 

गुजरातच्या सरदार पटेलांचा पुतळा उभा केला गेला ही महत्वाची गोष्ट आहे. पण गुजरातमधून निवडून येणाऱ्या अडवाणी यांच्यावर मात्र बीजेपीने फार वाईट वेळ आणली. सरदार पटेल आणि अडवाणी यांच्या कर्तृत्वाची तुलना होऊ शकत नाही. सरदार थोर नेते होते तसेच मोठे स्वातंत्र्यसैनिक होते. पण सरदार पटेलांवर अन्याय झाला याचा शोध लावणार्यांना अडवाणी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल सुद्धा घ्यावी वाटू नये हे आश्चर्यकारक आहे.

दुसऱ्याच्या पक्षातल्या नेत्यांची आयात करणे बिजेपीची गरज आहे. त्या बदल्यात आपल्या निष्ठावान लोकांना किती दिवस राबवत ठेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्यांच्या पक्षातले महापुरुष आयात करून त्यांचे पुतळे उभे करण्यात पण चूक नाही, कारण अटलजी सोडले तर एवढे देशव्यापी लोक अजून बीजेपीकडे नाहीत.

प्रश्न फक्त एवढाच आहे की ही आयात करताना त्यांच्या नावाने भांडणं लावण्यात काही अर्थ नाही. त्यांच्यावर अन्याय झाला ही भावना असणे वेगळी गोष्ट आहे. पण त्यांच्यावरच्या अन्यायाच्या निमित्ताने विभाजन तयार करणे देशाला परवडणारे नाही. आणि स्वतःच्या पक्षात अडवाणी यांच्यासारखं ढळढळीत अन्यायाचं जिवंत उदाहरण असताना तरी पटेल नेहरू असा फुटीचा डाव मांडू नये. पटेलांना हा देश पहिल्यापासून लोहपुरूष म्हणून ओळखतो. फक्त दुसरे लोहपुरूष अशी ज्यांची प्रतिमा निर्माण करण्यात येत होती त्यांचं काय ?

अडवाणींचा दरारा वाटावा असं एकेकाळी पक्षाला वाटत असताना आज अचानक फक्त सहानुभूती त्यांच्या वाट्याला आलीय. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.