सरदार पटेल बनलेल्या परेश रावल यांच्या पायावर पटेल साहेबांच्या ड्राईव्हरने डोकं ठेवलं

परेश रावल हे विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध असले तरी अनेक चांगल्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. अगदी ‘संजू’ मध्ये परेश रावल यांनी सुनील दत्त यांची भूमिका उत्तम पद्धतीने रंगवली. माझ्यासारख्या तरुण पिढीला सुनील दत्त यांचं व्यक्तिमत्व फक्त ऐकुन माहीत होतं. पण दत्त साब कसे असतील हे परेश रावल यांनी जिवंत डोळ्यासमोर उभं केलं.

परेश रावल यांचा बॉलिवुड मधील अत्यंत महत्वाचा सिनेमा, जो कदाचित फार कमी जणांना ठाऊक असावा. हा सिनेमा म्हणजे १९९३ साली आलेला ‘सरदार’.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचं नाव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा. या सिनेमात सरदार पटेलांच्या प्रमुख भूमिकेत परेश रावल. परेश रावल अभिनय किती उत्कृष्ट करतात हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे सरदार पटेलांच्या भूमिकेसाठी त्यांची निवड ही योग्य होतीच.

पण खरी अडचण होती, परेश रावल यांचं सरदार पटेलांसारखं दिसणं. अशावेळी एक मराठमोळा किमयागार परेश रावल यांच्या मदतीला आला. त्याचं नाव विक्रम गायकवाड.

एखादा चरित्रपट किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं.. जेव्हा बायोपिक बनवला जातो, तेव्हा तो बघण्यासाठी सिनेमातला कलाकार हा त्या भूमिकेसाठी योग्य वाटला पाहिजे. ज्या व्यक्तीवर तो बायोपीक आहे, त्या व्यक्तीसारखा तो कलाकार जर दिसत नसेल तर आपण त्या सिनेमाशी पटकन जोडले जात नाही.

प्रकाश बाबा आमटेंच्या भूमिकेत नाना पाटेकर प्रकाश आमटें सारखे दिसत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला सिनेमाशी असलेला कनेक्ट निघून जातो. पण नाना पाटेकर यांचा अभिनय सरस असल्याने त्यांनी साकारलेली भूमिका नंतर आवडू लागते. असे अपवाद वारंवार घडून येत नाहीत. त्यामुळे चरित्र भूमिका साकारताना तो कलाकार त्या भूमिकेसारखा दिसणं हे सुद्धा गरजेचं असतं.

अशावेळेस महत्वाची व्यक्ती असते ती रंगभूषाकार म्हणजे मेकअप आर्टिस्ट.

आज बॉलिवुड सह मराठी तसेच अन्य भाषिक सिनेमांमध्ये स्वतःच्या हातांनी कलाकारांचा चेहरामोहरा बदलणारे मेकअप आर्टिस्ट म्हणजे विक्रम गायकवाड. विक्रम गायकवाड यांची ज्या सिनेमापासून व्यावसायिक रुपात सिनेसृष्टीत एन्ट्री झाली, तो पहिला सिनेमा म्हणजे ‘सरदार’.

दिग्दर्शक होते केतन मेहता. आणि सरदार पटेलांच्या भूमिकेत परेश रावल.

श्रेष्ठ मेकअपमन बबनराव शिंदे हे विक्रम गायकवाड यांचे गुरू. त्यांना बघूनच विक्रमला अगदी लहान वयात रंगभूषा करण्याची गोडी लागली. अगदी काही क्षणात बबनराव माणसांचं रूपडं बदलायचे. या गोष्टीचं विक्रमला फार अप्रूप वाटायचं. एकदा बबनराव नसताना विक्रमने ‘आग्र्याहून सुटका’ नाटकातल्या कलाकारांचा मेकअप केला.

आणि अगदी लहान वयात एक रंगभूषाकार म्हणून विक्रमच्या करियरची सुरुवात झाली.

नाटकातील कलाकारांना मेकअप करणारा विक्रम सिनेमात कसा आला, याची कहाणी मोठी रंजक आहे. एकदा नाटकातील एक कलावंत विक्रमच्या घरी आला. त्याला एके ठिकाणी ऑडिशनला जायचे होते. विक्रमने त्याला दाढी केस लावले, नमाजाची टोपी त्याच्या डोक्यावर घातली. आणि खान अब्दुल गफार खान चं रूप त्या कलावंताला दिलं.

हा कलाकार थेट श्याम बेनेगल यांच्या ऑफिसमध्ये गेला. त्या कलाकाराचं रूप श्याम बेनेगल बघतच राहिले. त्यांनी मेकअप कोणी केलाय हे विचारलं. कलाकाराने विक्रमचं नाव सांगितलं.

श्याम बेनेगल यांनी विक्रमला मुंबईत येण्याचं आमंत्रण दिलं.

विक्रम गायकवाड मुंबईत आले. आणि याचदरम्यान केतन मेहता ‘सरदार’ सिनेमाच्या शूटिंगची तयारी करत होते. सेटवर अनेक लोकप्रिय मेकअपमन आले होते. परेश रावल यांना सरदार पटेलांच्या व्यक्तिरेखेत बदलण्यासाठी सर्वजण शर्थीचे प्रयत्न करत होते.

विक्रम गायकवाड सेटच्या बाहेरून आतली सर्व गडबड पाहत उभे होते.

आत असणारे इतर मेकअपमन हे अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करत असल्याने त्यांच्या तुलनेत विक्रम गायकवाड नवखे. त्यामुळे आत जायला विक्रम धजावत नव्हता.

इतक्यात परेश रावल खोलीच्या बाहेर आले. त्यांनी विक्रमला बघितलं. त्यांनी विक्रमची विचारपूस केली आणि आतमध्ये का येत नाही असं विचारलं. विक्रमने सर्व सांगितलं. अखेर परेश रावल यांनी केलेल्या आग्रहामुळे आणि केतन मेहता यांनी केलेल्या सूचनेनुसार विक्रम गायकवाड यांना मेकअप करण्याची संधी मिळाली.

समोर निष्णात मेकअप मन. हजारो माणसं तिथे हजर. अशा लोकांसमोर विक्रमला परेश रावल यांच्या चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला.

विक्रम यांनी अजिबात वेळ न दवडता कामाला प्रारंभ केला. त्यांच्या खिशात मेणाचा गोळा होता. मेकअप करण्यासाठी लागणारं गरम पाणी नव्हतं. पण तक्रार करायला उसंत नव्हती.

जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून त्यांनी २० मिनिटात परेश रावल यांना विक्रमने तयार केलं. परेश रावल तयार होऊन बाहेर आले. कोणाची काही प्रतिक्रिया नव्हती.

त्यावेळी तिथे सरदार पटेलांचा ९२ वर्षांचा ड्रायव्हर हजर होता. परेश रावल यांना पाहताच पुन्हा सरदारसाहेब आपल्यात आले, असा भास होऊन त्या ड्रायव्हरने परेश रावल यांच्या पायावर डोकं ठेवलं.

या प्रसंगामुळे विक्रमला त्याच्या कामाची पोचपावती मिळाली. स्वतः परेश रावल यांनी विक्रमला नमस्कार केला. जो विक्रम गायकवाड सुरुवातीला रूमच्या बाहेर होता, त्याला नंतर परेश रावल यांच्या शेजारची रुम देण्यात आली.

आज आमिर खान असो , रणबीर कपूर असो वा मराठीतला सुपरस्टार सुबोध भावे. अनेकांना विक्रम गायकवाड या किमयागाराचं महत्व ठाऊक आहे. त्यामुळे मेकअप करायला बसताना विक्रमच्या रंगभूषेवर कलाकार डोळे झाकून विश्वास ठेवतात.

आज अनेक तरुण मुलं रंगभूषा या कलेला एक करियरचा पर्याय म्हणून निवडत आहेत, याचं बहुतांश श्रेय विक्रम गायकवाड यांना आहे!

विक्रम गायकवाड यांनी रणबीर कपूरला संजय दत्त बनवलं. दाक्षिणात्य स्टार मामुटीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं रूप दिलं. सुबोध भावेला बालगंधर्व, लोकमान्य, काशिनाथ घाणेकर ही रूपं दिली.

तज्ञ मेकअपमन जिथे हरले अशा परेश रावल यांच्यामधून सरदार वल्लभभाई पटेल लोकांसमोर आणण्याची किमया साधली. एकूणच विक्रम गायकवाड हे खऱ्या अर्थाने एक किमयागार आहेत !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.