आणि सॅम माणेकशॉ यांनी भारतातली सर्वात मोठी दंगल रोखून दाखवली.
भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून जनरल सॅम माणेकशॉ यांना आपण सगळे ओळखतो. ते निडर सेनानी टर होतेच पण त्यांची आणखी एक ओळख हजरजबाबी स्पष्टवक्ता अशी देखील होती. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बांगलादेश युद्धावेळी आपली कठोर मत सुनवायला ते मागे पुढे पाहत नसत.
पण हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा माणेकशॉ यंग ब्रिगेडीयर होते.
दुसऱ्या महायुद्धात दाखवलेल्या पराक्रमामुळे सम माणेकशॉ यांची चर्चा ब्रिटीश आर्मीमध्ये सुद्धा होती. त्यामुळे कमी वयातच माणेकशॉ यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. ते गोरखा रेजिमेंटमध्ये कमांडींग ऑफिसर होते पण त्यांना संपूर्ण भारताच्या मिल्ट्री ऑपरेशन्स विभागाचा डिरेक्टर करण्यात आल होत.
तो काळ धामधुमीचा होता. भारत पाकिस्तान फाळणीमुळे देशात सगळीकडे स्फोटक वातावरण बनलं होत. अजूनही बरीच संस्थाने भारतात विलीन व्हायची होती. जर यातील एकही संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन झाले तर भारतीय सुरक्षिततेला मोठा धोका होणार होता.
सरदार पटेल हे देशाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री होते.
संस्थानाचा विषय त्यांच्या अखत्यारीत येत होता. माणेकशॉ यांचं रिपोर्टिंग थेट पटेलांना होतं. रोज सकाळी लवकर सरदार पटेलांच्या घरी त्यांचे सेक्रेटरी व्ही.पी.मेनन आणि माणेकशॉ यांची मिटिंग भरायची. सरदार पटेल आपल्या हातात एक लिस्ट घेऊन बसायचे. त्यातील एखाद नाव घेऊन म्हणायचे,
“व्ही.पी. मला बडोदा पाहिजे.”
लगेच व्ही.पी.मेनन त्या संस्थानकडे फ्लाईटने रवाना व्हायचे, सोबत माणेकशॉ यांना सुद्धा पाठवायचे. व्ही.पी.मेनन गोड बोलून प्रसंगी माणेकशॉ यांच्या करवी सैन्याची भीती दाखवून संस्थानिकांना भारतात सामील होण्यास राजी करवून घेत होते.
सर्वात आणीबाणीचा प्रसंग काश्मीरच्या विलीनीकरणावेळी आला. तिथले महाराजा हरिसिंग यांना स्वतंत्र राहायचं होत पण पाकिस्तानने घुसखोरी करून काश्मीर गिळंकृत करण्याचा डाव मांडला होता. व्ही.पी.मेनन आणि माणेकशॉ हे तेव्हा श्रीनगरमध्ये उपस्थित होते.
त्यांनी प्रचंड समजावून सांगितल्यावर अखेर महाराजा हरिसिंग भारतात सामील होण्यासाठी तयार झाले व विलीनीकरणावर सही केली.
दुसऱ्या दिवशी माणेकशॉ दिल्लीला पोचले पण तेवढ्यात त्यांना लष्करप्रमुख सर रॉय बुचर अगदी सकाळी त्यांना न्यायला आले. मंत्रीमंडळाची मिटिंग होती आणि काश्मीरमधील परिस्थितीच रिपोर्टिंग पंतप्रधानांना करायचं होतं. त्या मिटिंग गव्हर्नर जनरल माउंटबॅटन, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग होते. काश्मीर प्रश्नावर खडाजंगी सुरु होती.
माउंटबॅटन यांनी माणेकशॉ यांना काश्मीरमध्ये नेमक काय सुरु आहे हे विचारलं. माणेकशॉ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता खरी सिच्युएशन सांगितली. पाकिस्तानी सैन्य अतिरेक्यांना घेऊन अगदी श्रीनगरच्या जवळ येऊन पोहचलं आहे, थोडा जरी लेट केला व श्रीनगरच विमानतळ आपल्या हातून गेलं तर लष्करसुद्धा काही मदत करू शकणार नाही.
पंडीत नेहरू मात्र अजूनही लष्करी कारवाईसाठी तयार होत नव्हते.
शेवटी सरदार पटेलांनी त्यांना रागाच्या भरात थेट सवाल केला,
“जवाहर, तुला काश्मीर हवं आहे कि नको आहे?”
पंडीत नेहरूंनी होकाराची मान हलवली. मग सरदार पटेल थेट माणेकशॉ यांच्याकडे वळून म्हणाले,
“तुला तुझ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. काश्मीरवर लष्करी कारवाई करा.”
सरदार पटेल आणि माणेकशॉ यांच्यातील संबंध हे असे परस्पर विश्वासाचे होते. याच काळात बंगालमध्ये फाळणीमुळे हिंदू मुस्लीम दंगल जोरात पेटली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये हजारो जणांचा मृत्यू झाला होता. एक दिवस लष्करप्रमुखांचा माणेकशॉ यांना फोन आला की,
“लगेच निघ. तुला कलकत्याला नेण्यासाठी विमान तयार आहे.”
माणेकशॉ यांना कळेना की नेमक काय झालं आहे. त्यांनी लष्करप्रमुखांना विचारलं की,
“Why me sir?”
जनरल सर रॉय बुचर म्हणाले, “because the sardar wants you.”
ब्रिगेडियर माणेकशॉ कलकत्याला पोहचले तेव्हा तिथे सरदार पटेल हे तिथले मुख्यमंत्री बी.सी.रॉय यांच्यासोबत मिटिंग मध्ये होते. माणेकशॉ यांना मुख्यमंत्र्यांनी थेट विचारलं,
“मी तुमच्याशी कोणतेही वाद, युक्तिवाद करू इच्छित नाही. मी एकच प्रश्न विचारणार त्याच मला थेट उत्तर द्या. जर मी लष्कराच्या हातात परिस्थिती सोपवली तर तुम्ही बंगाली लोकांना मारणार? आणि दंगल थांबवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील?”
माणेकशॉ आपल्या नेहमीच्या स्पष्टवक्तेपणाने म्हणाले,
“सर १०० लोक आणि एक महिना !”
बीसी रॉय हे रागाने लालबुंद झाले. पण शेजारी असलेल्या सरदार पटेलांनी हस्तक्षेप केला.
“Thousands are being killed. Go and kill them. Take over.”
दुसऱ्याच दिवशी संपूर्ण कलकत्यात आर्मी तैनात करण्यात आली. अवघ्या काही दिवसात सगळी परिस्थिती निवळली. एकही रक्त न सांडता ब्रिगेडियर सम माणेकशॉ यांनी भारतातली सर्वात मोठी दंगल शांत केली होती. पुढे जेव्हा वल्लभभाई पटेलांची माणेकशॉ यांच्याशी भेट झाली तेव्हा ते त्यांना गुजराती मध्ये म्हणाले,
“तू त्या दिवशी खोट का बोललास?”
सम माणेकशॉ यांनी प्रश्नार्थक नजरेने वल्लभभाईकडे पाहिलं. तेव्हा ते दिलखुलास हसले आणि माणेकशॉ यांच्या पाठीवर शाबासकी देत म्हणाले,
” दंगल थांबवायला १०० जणांना माराव लागेल अस म्हणालास आणि एकालाही मारलं नाहीस. वेल डन !!”
हे ही वाच भिडू.
- चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले होते, “लोकशाहीमध्ये पंतप्रधान सर्वात मोठे नसतात, तर”
- नेहरूंच्याही आधी सरदार पटेलांनी फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता..?
- सॅम माणेकशॉ यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या जवानांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या.