ब्रिटिशांविरोधात द्वेष दाखवलाय म्हणून सरदार उधम पिक्चरची ऑस्करवारी हुकली

जालियनवाला बाग, हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. १३ एप्रिल १९१९ या दिवशी झालेल्या या हत्याकांडानं भारतीयांच्या मनावर कधीच भरून न येणारी जखम केली आहे. या घटनेवर आधारित ‘सरदार उधम’ हा पिक्चर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरलाच, पण भारताकडून ऑस्करमध्ये जाण्याच्या शर्यतीतही होता.

सरदार उधम ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आणि ‘कूझांगल’ नावाचा तमिळ पिक्चर ऑस्करला गेला.

आता सरदार उधम हा पिक्चर भारताकडून ऑस्करला का गेला नाही याचं कारण समजल्यावर आम्ही पण हँग झालो. 

भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश ठरवणाऱ्या ज्युरीमधले सदस्य इंद्रदीप दासगुप्ता यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सरदार उधम शर्यतीतून बाहेर पडण्याचं कारण सांगितलं. ते म्हणतात, ‘सरदार उधम हा पिक्चर थोड्या जास्ती लांबीचा असला, तरी तो जालियनवाला बाग घटनेवर परखड भाष्य करतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या अनसंग हिरोवर भव्य चित्रपट बनवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. चित्रपटाची निर्मितीही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे आणि चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीही कौतुकास पात्र आहे. पण या चित्रपटातून पुन्हा भारतीयांचा ब्रिटीशांबद्दल द्वेष व्यक्त होतो. जागतिकीकरणाच्या या युगात हा द्वेष धरून राहणं योग्य नाही.’

या ज्युरीमधले आणखी एक सदस्य, सुमित बसू यांनी सांगितलं की, ‘कॅमेरावर्क, एडिटिंग, साऊंड, डिझाइन आणि त्या काळातलं चित्रण आणि चित्रपटाच्या एकूण गुणवत्तेसाठी सरदार उधम पिक्चर अनेकांना आवडला. माझ्यामते चित्रपट ऑस्करसाठी न जाण्यास चित्रपटाची लांबी हा एक मुद्दा आहे. त्याचा क्लायमॅक्स फार लांबला आहे, त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांची खरी वेदना जाणवण्यासाठी दर्शकाला खूप वेळ लागतो.’

सरदार उधम पिक्चरमध्ये नक्की काय आहे?

स्वातंत्र्यसैनिक उधम सिंग यांच्या आयुष्यावर या पिक्चर आधारित आहे. उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूत्रधार असणाऱ्या मायकेल ओडवायरवर लंडनमध्ये जाऊन गोळी झाडली आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला.

ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्याचं चित्रण या चित्रपटात आहे. साहजिकच यात ब्रिटिशांविषयी भारतीय जनतेच्या असणाऱ्या तीव्र भावना आहेत. तरीही इंग्रजांप्रती द्वेष दिसत असल्याचं कारण देत भारताकडून हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पाठवला गेला नाही.

चाहत्यांनी सोशल मीडियावर ज्युरी मंडळावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. चित्रपटातून सत्य दाखवण्यात गैर काय, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. थोडक्यात ऑस्करच्या पडद्यावर स्वातंत्र्यसैनिकाची गोष्ट झळकण्याची संधी यावर्षी तरी हुकली आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.