एवढी मोठी पोलिस अकादमी सरदार पटेलांनी उभी केली, पण स्वतःच नाव दिलं नाही.

लोहे जैसी हिम्मत है, लोहे सा जज़्बा अपना,
आंखों में लिए चलते हैं हम लौहपुरूष का सपना…

हैद्राबादच्या अल्हाददायक वातावरणात, दऱ्या-खोऱ्यांमधली दाट हिरवाईमध्ये अंगावर शहारे आणणाऱ्या आवाजात, नव्याने सेवेत येणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांची ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी करायची ही मंत्रणा. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श आणि त्यांच्या सारखी पोलादी इच्छाशक्ती घेऊन हे अधिकारी देशभरात पोलिस सेवेत रुजू होतात.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांतून आणि संकल्पनेतून स्थापन झालेली हि एवढी मोठी पोलिस प्रशिक्षण अकादमी. आज जरी ती त्यांच्याच नावानं उभी असली, तरी हे स्वतःच नाव मात्र त्यांनी दिलेलं नाही. ते दिलं इंदिरा गांधी यांनी. 

स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट. देशभरात पोलिस अधिकाऱ्यांची ट्रेनिंग ही आप-आपल्या राज्यातील पोलिस ट्रेनिंग कॉलेजेसमध्ये होतं असायची. कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता. इतर राज्यात काम कसं चालत, तिथल्या पोलिसांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? याचा अजिबातच अता-पता नसायचा.

१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाला प्रमाण मानून देशाचा कारभार चालू झाला, देशातील वेगवेगळी संस्थान विलीन होऊ लागली होती, संघराज्य पद्धत आली. सरकार सीमेपासून अंतर्गत सुरक्षाव्यवस्था मजबूत करत होती. या सगळ्यात अग्रभागी होते, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. 

पटेलांच्या मते देशाच्या सांघिक व्यवस्थेला आणखी मजबुती देण्यासाठी देशात ऑल इंडिया पातळीवरच्या परीक्षा होणं आणि त्यातून सर्वोत्तम अधिकारी निवडलं जाणं आवश्यक आहे. सोबतच यातून निवड झालेल्या सर्वांचं प्रशिक्षण देखील एकाच ठिकाणी व्हावं.

ज्यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीची, परंपरांची आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या आव्हानांची निवड झालेल्या भावी अधिकाऱ्यांना माहिती होईल. देशाच्या एकात्मतेशी कुठेही तडजोड होऊ शकणार नाही. आणि याच ऑल इंडिया पातळीवरील परीक्षेमधून ‘इंडियन पोलिस सर्व्हिसची’ निर्मिती झाली. 

पुढे सरदार पटेलांच्या प्रशिक्षणाबाबतच्या संकल्पनेतून १५ सप्टेंबर १९४८ रोजी राजस्थानातील माउंट अबुमध्ये ‘सेंट्रल पोलिस ट्रेनिंग कॉलेज’ची स्थापना झाली. 

आता माउंट अबु का? तर तिथं सैन्य वापरत नसलेली काही बॅरेक्स होती. जी पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोगी पडणार होती, आणि ऐनवेळी तात्काळ दुसरं ठिकाण उभं करणं शक्य नव्हतं. त्यामुळे माउंट अबुची निवड झाली.

स्थापना दिनाच्या आपल्या पहिल्या भाषणात सरदार पटेल म्हणाले होते, 

देशातील या प्रकारची ही पहिली संस्था आहे, आपल्याकडे मागे वळून पाहण्याची कोणतीही उदाहरणे नाहीत परंतु भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांसाठी ही एक प्रेरणादायक संस्था बनावी. स्वतः तयार होणे आणि इतरांना घडवणे आवश्यक आहे.

त्यानंतर पुढे एक वर्षभरातच सैन्यच्या अधिकाऱ्यांना एम.इ.एस बिल्डिंग आणि परत हवी होती. त्यामुळे या पोलिस ट्रेनिंग कॉलेजला कधी राजपुताना हॉटेलच्या भाड्याने घेतलेल्या इमारतीमध्ये तर कधी अबु लॉरेन्स स्कुलमध्ये फिरावं लागतं होतं. १९७४ पर्यंत अशीच परिस्थिती होती.

या दरम्यान १९६७ मध्ये तत्कालिन सरकारनं सेंट्रल पोलिस ट्रेनिंग कॉलेजच नामांतर ‘नॅशनल पोलिस अकादमी’ असं केलं.   

१९७१ मध्ये सरकारने देशातील प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी डॉ. माधव सदाशिव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने सादर केलेल्या आपल्या अहवालामधील अनेक शिफारशींपैकी एक असलेली शिफारस म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने हि संस्था देशाच्या मध्यभागी स्थलांतरित करणे.

सरकारने ही शिफारस स्विकारत १९७५ साली हैदराबादमध्ये २७७ एकरवरच्या अवाढव्य आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या हिरव्यागार अशा कॅम्पसमध्ये स्थलांतरित केलं.

तत्पूर्वी १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पटेलांच्या कार्याचा गौरव आणि ही अ‍ॅकॅडमी उभी करण्यामागचं त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आणि २५ व्या स्मृतीवर्षात अ‍ॅकॅडमीच नाव सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अ‍ॅकॅडमी असं नाव दिलं. 

सरदार वल्लभभाई पटेल यांनी मनात आणलं असतं तर स्वतःच्या संकल्पनेतून उभं राहिलं म्हणून ते या अकादमीला स्वतःच नाव देखील देऊ शकले असते. मात्र देश घडवणाऱ्या पटेलांचा भविष्याने गौरव केला. आणि तो आज देखील चालू आहे.

आजवर या अकादमीमधून जवळपास ६६ बॅचेस आणि त्यातुन ४ हजार ९९९ अधिकारी पासआऊट झालेत. पटेलांच्या त्याच अंगावर शहारे आणणाऱ्या मंत्रणेसोबत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.