सारेगम कारवाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांची भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी

शाळेत असताना प्रत्येकाला इंग्रजीच्या पेपरात ‘माय सेल्फ’ नावाचा निबंध लिहायला यायचाच. आपल्याबद्दलचा फाफट पसारा लिहायला कधी बोअर व्हायचं नाही. आता सगळ्यांचा गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी पैज लावून सांगते प्रत्येकाच्या निबंधात एक ओळ हमखास असणार ती म्हणजे ‘आय लव्ह म्युझिक’.

आता ती ओळ सोप्पी होती म्हणून कि काय, पण तरी गाणं हा सगळ्यांच्या जीवश्च कंठश्च विषय. म्हणजे आता सुद्धा १० जणांचे सोशल मीडिया अकाउंट जर पहिले तर आपल्या बायोमध्ये म्युझिक लव्हर लिहिणारे निदान ८ मंडळी तरी सापडणार.

कारण म्युझिक हा एकुलता एक असा मित्र आहे, जो आपल्या म्हणण्यानुसार आपल्याला पाहिजे त्या झोनमध्ये घेऊन जातो. फक्त करायचं काय… मोबाईल घ्यायचा, त्याला हेडफोन जोडायचे, प्लेलिस्ट उघडायची आणि कानात हेडफोन घालून डोळे मिटून गप्प राहायचं, बस्स…

आता लिहिता लिहिताच एक सिरीयस विषय कि, आजच्या या डिजिटल जमान्यात गाणी सुद्धा मोबाईल पुरती मर्यादित झालीयेत. ज्या जुन्या गाण्याच्या कॅसेट आणि डीव्हीडी मिळायच्या त्यांची जागा मोबाईलमधल्या गाण्यांच्या अ‍ॅप्सने घेतलीये आणि रेडिओ तर काय मार्केटमधून गायब होऊन फक्त आठवणींपुरता उरलाय.

तसं या सगळ्या गोष्टींमुळे तरुण पिढीला काही फरक पडत नाही म्हणा, कारण त्यांना जे पाहिजे, जे ऐकायचंय ते एका सर्चवर मिळून जातंय. त्यात कंपन्यासुद्धा तरुणाईचा विचार करूनच आपलं पुढचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात. पण भिडू विषय उरतो तो जुन्या पिढीच्या. या डिजिटल जमान्यामुळं त्यांचा जमान्यातल्या जुन्या गोष्टी सुद्धा मागे पडल्यात. आणि हीच गोष्ट हेरली सारेगम इंडियानं.

सारेगम इंडिया भारतातली जुनी आणि फेमस म्युझिक कंपनी. म्हणजे पार स्वातंत्र्याच्या आधीची. जुने सिंगर, त्यांची गाणी आणि सारेगमच्या डीव्हीडी आणि कॅसेट हे एक वेगळं कॉम्बिनेशन असायचं. पण जसे मोबाईल आले तसं या कंपनीचं मार्केट सुद्धा डाऊन झालं.

पण झुकेग नहीं… ही कन्सेप्ट पुष्पाच्या आधीच लागू करत कंपनीने स्वतः एक वेगळं मार्केट तयार केलं ते म्हणजे ‘सारेगम कारवा…’

म्हणजे झालं काय नवनवीन टेक्नॉलॉजीमूळं कंपनीचे जुने प्रोडक्ट मार्केटमधून बाहेर पडले आणि कंपनी फक्त युट्युब चॅनेल आणि म्युझिक प्रमोशनपुरती मर्यादित झाली. अशा परिस्थितीत २०१५ साली विक्रम नेहरा यांची सारेगम इंडियामध्ये एमडी म्हणून नियुक्ती झाली. मार्केटमध्ये पुन्हा ओळख तयार करायची म्हटल्यावर काहीतरी नवीन आणावं लागणार हे नेहरा यांच्या डोक्यात होतं.

यासाठी नेहरा यांनी ‘द वॉम्ब’ या एजन्सीच्या मदतीने देशात मार्केट रिसर्च करायला सुरुवात केली. याच दरम्यान रिसर्च टीम पोहोचली कानपुरमध्ये, तिथे एक वयस्कर महिला बोलता बोलता बोलून गेली कि, विविधभारतीचे जुने दिवस लय भारी होते. पुढचं गाणं कोणतं लागणारे हे माहित नव्हतं त्यामुळं प्रत्येक गाणं ऐकायला एक सस्पेन्स आणि वेगळा आनंद असायचा.’ आता लांब कशाला आपल्या घरातच बघा ना मोठ्यांकडून ऐकायला मिळतच, ‘आमच्या काळात काय गाणी होती… ‘

विक्रम नेहरा यांनी हिच गोष्ट पकडली कि, जुन्या पिढीचा गाण्यांसोबतचा संबंध तुटलाय. त्यामुळं त्यांनी नवीन पिढीला जरा साईड लाईन करत जुन्या पिढीवर फोकस केला. त्यात अनेक रिसर्च नवनवीन अपडेट घेतल्यानंतर सारेगम कारवाची कन्सेप्ट समोर आली.

स्पेशली जुन्या पिढीसाठी बनवलं जातंय म्हणून या कारवाचा लूक जुन्या ट्रान्सिस्टर रेडिओ सारखाच ठेवण्यात आला, पण त्याचे फीचर्स मात्र नवीन होते. म्हणजे गाणी त्या गायकाच्या नावाने साईडला डिस्प्ले होतील. त्यात नेहरा यांनी आपल्या बॉसच्या म्हणण्यावरून एफएम सुद्धा जोडला.

हे सगळं झाल्यावर प्रश्न होता गाण्यांचा. कुठली आणि किती गाणी टाकायची  यावर भरमसाठ चर्चा झाल्यावर, सगळा डेटा गोळा झाल्यानंतर ५००० गाणी निवडण्यात आली. आणि त्यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे अमीन सयानी यांच्या गीतमाला कार्यक्रमाचा भाग यात अ‍ॅड केला गेला. कारण सयानी यांचा आवाज आजही लोकांच्या मनात तसाच आहे. हा सल्ला नेहरा यांना त्यांच्या वडिलांनी दिला होता.

आता जुन्या पिढीसाठी प्रॉडक्ट आणतोय म्हटल्यावर ते वापरायला सोपं असलं पाहिजे. याच विचारानं कारवाला टच स्क्रीनची स्टाईल न देता जुन्या काळात असायची तशी गोल बटणं ठेवली.

बरं सगळंच काही जुन्या पिढीसारखं न ठेवता तरुणांचा सुद्धा याकडे कल वाढावा म्हणून ब्लूटूथ, यूएसबी अशा फॅसिलिटी सुद्धा जोडण्यात आल्या. एकूण काय आतून आधूनिक आणि बाहेरून जुन्या रेडीओ सारखा फील, त्यातले स्पीकर सुद्धा आताच्या सारखे नाहीत, पण जून्या काळापेक्षा चांगल्या क्वालिटीचे. आणि या सगळ्या गोष्टी जोडून २०१७ साली सारेगम कारवा लॉन्च करण्यात आलं.

सारेगम कारवाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी. कंपनीला माहित होतं आपलं प्रॉडक्ट जरा ओल्ड फॅशन आहे म्हटल्यावर तरुण लोक याकडे जास्त वळणार नाहीत आणि जुने लोक ते स्वतःहून काही घेणार नाही. त्यामुळं कंपनीनं आधी कारवाचं मोठं मार्केटिंग करायचं नाही असं ठरवलं. त्यामुळे कंपनीने आपल्या युट्युब चॅनेलवर त्याच्या जाहिराती दाखवायला सुरुवात केली, आणि काही जाहिराती रेडिओवर केल्या.

कंपनीला आपल्या या प्रॉडक्टबद्दल थोडी धास्तीच होती. त्यामुळे त्यांनी वर्षभर टीव्हीच्या जाहिरातीवर खर्च न करता पहिल्या वर्षीचं टार्गेट फक्त एक लाख कारवाची विक्री एवढं ठेवलं. ज्याची किंमत ५ हजार रुपये होती. पण कंपनीचं टार्गेट मागं पडलं कारण १ लाख नाही तर तब्बल ३ लाख ६० हजार कारवा विकले गेले.

कंपनीसाठी ही मोठी अचिव्हमेंट होती, ज्यामुळे कंपनीला तब्बल २१६ कोटींचा फायदा झाला. यानंतर कंपनी फुल फॉर्ममध्ये आली. आणि २०१८ मध्ये कारवानं मार्केटमध्ये खरी एन्ट्री मारली. कंपनीने याच वर्षी टीव्ही जाहिरात सुद्धा करायला सुरुवात केली.

बरं हे सारेगम कारवा जेवढं युनिक होतं, तेवढ्याच त्याच्या जाहीराती सुद्धा इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे कसं एखादं गाणं आपण केव्हा ऐकतो जेव्हा ते आपल्याला कुठेतरी रिलेट झालेलं असतं, आणि तेच आपल्याला पुन्हा जुन्या आठवणीत घेऊन जातं. हीच थीम कारवानं मार्केटींगमध्ये वापरली.

त्यात जाहिरातींमध्ये कारवा एक भेटवस्तू म्हणून दाखवण्यात आलं, म्हणजे जसं की आपण आधीच म्हंटल तरूण मंडळी हे प्रॉडक्ट स्वतः वापरणार नव्हते आणि वयस्कर मंडळी स्वतः साठी ते काय घेणार नव्हते, म्हणून सारेगमनं जनरेशनला जोडणारं प्रॉडक्ट म्हणून ते प्रेझेंट केलं. जे तरुणांकडून वयस्कर लोकांना गिफ्ट म्हणून दिलं जाईल, अशी भारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली.

यासाठी सोशल मीडियावर एक प्रकारेे  कॅम्पेन सुरु केलं. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारची विक्री त्यांनी सुरू केली. आज एकट्या कारवानं सारेगमला पुन्हा वेगळी ओळख निर्माण करुन दिलीये आणि जुन्या पिढीची आवडही जपलीये.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.